आर्थिक पुनर्प्राप्तीविरुद्ध तिसरी लाट

    16-Jan-2022   
Total Views | 110

Financial-recovery
 
 
 
कोरोना महामारीने जसे मानवाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही हतबल केले, तसेच त्याचे परिणाम हे विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवरदेखील मागील दोन वर्षांत प्रकर्षाने दिसून आले. सन २०२० मध्ये जगभरात कोरोनाने डोके वर काढले, तेव्हापासून ते आता ‘ओमिक्रॉन’च्या रूपाने दाखल झालेल्या तिसर्‍या लाटेपर्यंत कोरोनाचे आर्थिक जगतावरील परिणाम हे बहुतांशी सामान्यजनांसाठी तरी चिंताजनक म्हणावे लागतील. महामारीच्या संसर्गजन्य आजारांमुळे देशांच्या आर्थिक घड्या कशा आणि कोणत्या पातळीपर्यंत बिघडू शकतात, याचे उदाहरण कोरोनामुळे अख्ख्या जगाने अनुभवले. आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आहे, यात शंका नाही. मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे, सध्या ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग वेगवान असला तरी त्याची मारकशक्ती कोरोना विषाणूच्या मागील अवतारांपेक्षा कमी असल्याचे दिसते. असे असताना कोरोनाचा जोरदार फटका बसल्यानंतरही गेल्या दीड-दोन वर्षांत मोठ्या कंपन्यांच्या नफ्यात मात्र विक्रमी वाढ झाली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशातील चार हजारांहून अधिक सूचीबद्ध कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात ५७ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आणि हा नफा तब्बल ५.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. या कंपन्यांच्या नफ्याचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) गुणोत्तर देखील २.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे, जो गेल्या दहा वर्षांचा नवा विक्रम आहे. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे, देशातील सर्वात मोठ्या ५०० कंपन्यांचे निकाल आहेत. त्यांच्या नफ्यात विक्रमी ७५ टक्के वाढ झाली आहे आणि हा आकडा ६.२२ लाख कोटी रु. तर याच वर्षात त्यांच्या उत्पन्नाचा वेग २.५ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
 
 
 
‘फॉर्च्युन इंडिया’ या बिझनेस मासिकानुसार, चालू आर्थिक वर्षात ही गती कायम राहाण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ‘लिस्टेड’ कंपन्यांचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांच्या वर पोहोचला होता. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’च्या अहवालानुसार, या वर्षी कंपन्यांच्या नफ्यात ३४ टक्के आणि पुढील वर्षीही १५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. हा चमत्कारिक नफा तेव्हा होत आहे, जेव्हा गेल्या आर्थिक वर्षात ‘जीडीपी’ वाढण्याऐवजी ७.३ टक्क्यांनी घसरला होता. पण, या वर्षी जीडीपीत ९.५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. ‘एचडीएफसी’ बँकेच्या अहवालात असे म्हटले आहे की, ‘ओमिक्रॉन’ जीडीपीला सुमारे ०.३ टक्क्यांंनी हानी पोहोचवू शकते, तर ‘रेटिंग एजन्सी’ ‘इक्रा’च्या अंदाजानुसार, हा तोटा ०.४ टक्के असू शकतो. तिसरे मूल्यांकन ‘इंडिया रेटिंग’चे आहे. यानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेला ०.१ टक्के नुकसान होऊ शकते. संपूर्ण जगाची परिस्थिती पाहिली तर असे दिसते की, अमेरिकेत एका दिवसात एक दशलक्ष कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत आणि ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. जर आपण या देशांच्या लोकसंख्येची भारताशी तुलना केली तर आपल्याला या भयाण चित्राच्या विशालतेची कल्पना येईल. यामुळे जगभरातील केंद्रीय बँका आणि अर्थमंत्र्यांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाश्चात्य देश ज्या पद्धतीने नोटा छापून वितरित करत आहेत, त्यामुळे आता सर्वच देशात महागाईचे भूत जागृत झाले आहे. याला सामोरे जाणे हे या बँकांचे मुख्य काम आहे. म्हणजेच आता पैशाच्या पुरवठ्यावर त्यांचे नियंत्रण आहे.
 
 
 
अमेरिकेची सेंट्रल बँक, फेडरल रिझर्व्हने तर हे काम नियोजित वेळेच्या तीन महिने आधी सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. युकेमध्ये या सरावाला सुरुवात झाली आहे. पण, चीनच्या अर्थव्यवस्थेने अशी कोणती जडीबुटी खाल्ली आहे की, जगभरातील संकटांचा कोणताही परिणाम तेथे दिसत नाही. या प्रश्नाचे एक उत्तर असे आहे की, चीनमध्ये काय होते ते शोधणे शक्य नाही. एकंदरीतच कोरोनाची तिसरी लाट ही आर्थिकदृष्ट्या जगाला आर्थिक पुनर्प्राप्ती होण्याची स्थिती निर्माण होत असताना दाखल झाली. त्यामुळे या तिसर्‍या लाटेचा सामना करताना जगातील आर्थिक गणिते पुन्हा एकदा ढवळून निघत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसेच या संकटकाळातही कंपन्यांच्या नफ्यात वाढ होत असली तरी दुसरीकडे गरीब आणि मध्यमवर्ग मात्र आर्थिकदृष्ट्या पुरता पिचला आहे. त्यामुळे जगातील आर्थिक असमतोलही पुन्हा एकदा समोर आला आहे.
 
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121