किरण मानेंचा टप्प्यात 'कार्यक्रम' झालाय का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2022   
Total Views |

Kiran mane





'स्टार प्रवाह' या प्रसिद्ध वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून कलाकार किरण माने यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. प्रामुख्याने मोदी विरोध याला कारणीभूत आहे, असा कयास मानेंनी बांधायला सुरू केला आणि त्यात ते यशस्वी ठरले. त्याहूनही विशेष म्हणजे मानेंच्या या चकव्यात आघाडीची प्रसिद्धी माध्यमेही डोळ्यावर पट्टी बांधून सहज फसली. किरण माने एक हुशार कलाकार पण राजकीय भूमिका घेता घेता कधी राजकारण्यांसाठी भूमिका घेणारे 'कल्लाकार' बनले हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही.


सोशल मीडियावर इनबॉक्समध्ये प्रत्येकाशी जाऊन झगडत बसल्याने आपण कुणीतरी मोठे तत्ववेत्ते झालो. माझ्या नेत्याचे समर्थक कसे सच्चे इतरांचे अंधभक्त, भक्ताड आणि नाही नाही त्या शिव्याशाप देऊन पोरांना वाट्टेल त्या भाषेत उत्तर देण्यात किरण माने माहीर बनले. ज्यांच्यासाठी हे करत होते त्यांच्या समर्थकांनी मानेंना अगदी डोक्यावर घेतले. बघा कशी भक्तांची बिनपाण्यानं करतोय, असे म्हणत कमेंट बॉक्समध्ये आसूड ओढू लागले. 


गैरवर्तनामुळेच त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलंयं, असे स्पष्टीकरण निर्मात्यांनी दिलं आणि मानेंची पोलखोल झाली. आता मालिकेचे शुटींग बंद वैगरे पाडण्याच्या खोट्या बातम्याही मानेच पसरवू लागले. त्यावर राजकीय पोळी भाजणार नाहीत ते राजकारणी कसले. मानेंच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेस उतरला आणि त्यांच्यावर कसा अन्यायच झाला याबद्दल आकांडतांडव सुरू केले. हा सगळा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे म्हणत नाव न घेता भाजपवर बोट ठेवले. मंत्री जितेंद्र आव्हाडांपासून ते राष्ट्रवादीतील मंडळींनी मानेंची तळी उचलली. या प्रकारानंतर मानेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचीही माहिती आहे.


मानेंवर ही वेळ का आली ?


याचे साधे आणि सरळ उत्तर निर्मात्यांनीच देऊन टाकले आहे. "मानेंची हकालपट्टी ही पूर्णपणे प्रोफेशनल कारणांमुळेच झाली आहे. कुठल्याही राजकीय दबावापोटी हा निर्णय घेतलेला नाही, त्यांच्या सेटवरील वर्तणूकीबद्दल यापूर्वीच इशारा दिला होता. त्यात सुधारणा न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.", असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. निर्माते आणि चॅनल याबद्दल लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करतील, तेव्हा माने निरुत्तर होतील.


हवा डोक्यात गेली का ?


सरकारविरोधात काहीही वक्तव्य केले की ते आपसूकच प्रसिद्ध होतात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करुन काहींनी आपली कारकिर्द घडवली. मानेंनाही त्यापैकीच एक व्हायचे होते. आपल्या विशिष्ट नेत्यांना खुश करण्यासाठी मोदीविरोधाची सीमा गाठली. मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींचे गंभीर प्रकरण उघड झाले होते. त्यावेळी केवळ खिल्ली उडवून क्षणिक आनंद मिळवण्यात मानेंसारख्यांनी धन्यता मानली. या प्रकारात आपल्या देशाच्या प्रमुखाची पंतप्रधानपदाची सुरक्षा धोक्यात होती, इतकी सरळ सोपी गोष्टही विरोधाच्या चष्म्याआड दिसू शकलेली नाही.




मानेंची असभ्य भाषा...


किरण मानेंच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मजकूर आणि पोस्टमध्ये त्यांचे धार्मिक फोटो वापरले जातायंतं. पण त्याच किरण मानेंच्या अर्वाच्च भाषेचे स्क्रीनशॉट्सही याचवेळी फिरू लागलेत. मानेंनीही या प्रकाराबद्दल जणू कबुलीच दिली आहे. माझ्याशी हुज्जत घालणाऱ्यांशी आम्ही याच भाषेत उत्तरे देतो, अशा प्रतिक्रीया ते ज्याला त्याला देत सुटलेत.


सोयीस्कर भूमिका


चुकीला चूक आणि बरोबर म्हणणाऱ्यांच्या मागे समाजही आपसूक उभा राहतो. मात्र, राष्ट्रवादी वगळता अन्य कुठल्याही पक्षाने मानेंना समर्थन दिलेलं नाही. माने पूर्वीपासूनच पवार समर्थक असल्याने हे अशक्य नाही. परंतू, ज्या ज्यावेळी भूमिका घेण्याची वेळ आली त्यावेळी सोयीस्कर मौन बाळगण्यात माने आघाडीवर होते. महाराष्ट्रातील साधू हत्याकांड, अनिल देशमुखांची अटक, बलात्काराची प्रकरणे, परिक्षांसंदर्भातील घोळ, लॉकडाऊनमुळे संकटात असलेले रंगकर्मी, सचिन वाझे-अनिल देशमुख प्रकरण याबद्दल अभिव्यक्त होणाऱ्या मानेंकडे मुद्देच नव्हते. भाजप आणि संघाविरोधात बोलण्यासाठी त्यांना रात्रीअपरात्री सोशल मीडियावर गरळ ओकण्यासाठी उर्जा कमी पडत नसे. आजही पडत नाही. कंगना रणौत असो वा अर्णब गोस्वामींची अटक या प्रकरणांचा असूरी आनंद घेण्यात धन्यता मानली.

मानेंची अवस्था मोदीविरोधामुळे?


पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपविरोधामुळे मानेंवर ही वेळ आली का ? , तर याचे उत्तर सरळ शब्दांत नाहीच असे असेल. या प्रकाराला सांस्कृतिक दहशतवाद म्हणत कितीही रेटण्याचा प्रयत्न झाला असेल मात्र, हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरणार नाही. ज्या पक्षाला इतिहासात कधी नव्हे इतक्या प्रचंड मतांनी जनतेने सत्तेत बसवले. स्वातंत्र्यानंतर हिंदूत्व, प्रखर राष्ट्रवादाच्या विचाराने राजकारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर चिखलफेक केल्याने जनताच दुखावेल. आजही याच मुद्द्यांवर मतदान करणारा आणि निवडून आणणारा भारतीय समाज आहे. मोदीद्वेष्ट्यांनी त्यालाच नख लावले आणि कालबाह्य झाले. देशाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या नेत्याबद्दल असे अपशब्द ते बोलू शकतात याचा अर्थ देशात लोकशाहीच आहे... कुठलीही एकाधिकार शाही नाही, हे त्यांच्याच वागण्यातून सिद्ध होते.





मानेंचे म्हणणे काय ?


"काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा!", असे म्हणत मानेंनी याबद्दलची पहिली प्रतिक्रीया दिली होती. सुरुवातीला मोदी समर्थकांवर आसूड ओढणारे माने आता प्रोडक्शन हाऊसलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. सेटवरील कलाकार माझ्याविरोधात बोलतील की काय, अशी भीती त्यांना सतावतेयं. ते म्हणतात, आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू आहे. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत. कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे... करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे 'पोटार्थी' हायेत. (इतके दिवस माने तिथे 'पोटार्थी' म्हणून नव्हे तर 'परमार्थी' म्हणून काम करत होते तर) प्रॉडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे... चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते 'सत्य' सांगतीलच! पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा! बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी!तुका म्हणे रणी...नये पाहो परतोनी !!!", अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. 







मानेंचं काय चुकलं ?


मानेंना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर 'सांस्कृतिक दहशतवाद' ही मोहिम सुरू केल्यानंतर जी प्रसिद्धी मिळाली ती संपूर्ण कारकिर्दीत मिळाली नसती. असो पण एखाद्या वेळेस निर्मात्यांनी समज देऊनही कानाडोळा करत आपलं ते खरं करण्याच्या नादात भूमिका गमावून बसलेल्या मानेंना आता केवळ समोर मोदीसमर्थकच दिसत असतील. सकाळ सायंकाळ विरोधात लिहून साहेबांच्या समर्थकांना खुश करण्याच्या नादात एका प्रचंड मोठ्या जनसमुदायाला नकळत दुखावणं 'ईलास पाटील' यांना महागात पडलं... बाकी किरण माने या प्रकारालाही मोदीच जबाबदार आहेत, असे खापर फोडून पुढे जातील




कल्याण पश्चिम इथे राहणाऱ्या महादेव गोळवसकर यांनी दिलेली प्रतिक्रीया...


कलाकार असो अथवा अभिनेता यांनी नाट्य, चित्रपट,मालिका मधुन भूमीका साकारताना आपण कोण आहोत ,येथे कशासाठी आलो आहोत , आपल्या अभिनयाने आपला रोजगार चालू आहे याचा विसर पडू देऊ नये.मराठी मराठी म्हणून जगत असताना आपल्या माय भगिनींचा अवमान होणार नाही हे तत्व पाळले तर शेवटच्या अंता पर्यंत अभिनेता म्हणून नाव लौकिकाला जागता येईल.असंख्य मराठी अभिनेते -अभिनेत्री आज हयात नाहीत तरीही त्यांचे चाहते तसूभरही मागे हटले नाहीत. त्यांचे प्रेम सतत आपल्या लाडक्या अभिनेत्यावर राहिले म्हणूनच एखाद्या नाटकाचे पाचशे - हजार प्रयोग होतात. हे नाकारून चालणार नाही. तो मी नव्हेच या नाटकातील अभिनेते, आताचे प्रशांत दामले , दिलीप प्रभावळकर ,अशोक सराफ यांच्या कडे आताच्या कलाकारांनी पहावे म्हणजे तुम्ही कुठे आहात ते कळेल.
किरण माने अभिनेत्याला मालिकेतून काढले म्हणून थेट राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार यांची भेट घेतली त्यांच्या समोर आपलं म्हणणं मांडलं आता चेंडू पवार साहेबांच्या कोर्टात आहे.किरण मानेना मालिकेतून काढण्याआधी मालिका निर्मात्यांने अनेकदा सूचना केल्या होत्या पण त्याचे पालन केले नाही म्हणून अखेरचा निर्णय घेतला. आपल्या मुळेच मालिका सुरू आहे,आपण ठरवू ते धोरण आणि बांधु तोरण याच भूमीकेने घात झाला. कंपनील कामगार कधीच कमी पडत नाही. कामगाराची नोकरी गेली तर अख्खं घर रस्त्यावर येते.म्हणून कलाकार असा अथवा अभिनेता प्रेक्षकांना हसवणे एवढेच तुमचे काम आहे.बाकी मौजमजा वगैरे हे प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. म्हणून राजकीय पक्ष अथवा नेते यांच्या आधारे आपण वाटेल ते करू शकतो ही भावना म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी एवढेच म्हणावे लागेल.





@@AUTHORINFO_V1@@