सामान्य माणसाच्या जगण्याची वेदना हाच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू : भारत सासणे

    15-Jan-2022
Total Views | 228

Bharat-Sasane
 

लातूरमधील उद्गीर येथे आयोजित ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कथाकार आणि साहित्यिक भारत सासणे यांची एकमताने नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने भारत सासणे यांनी त्यांच्या साहित्यकृतींपासून ते संमेलनापर्यंत विविध विषयांना स्पर्श करत दै. ‘मुंबई तरुण भारत’शी केलेली ही खास बातचित...
 
 
 
अतिशय गांभीर्याने लेखन करणार्‍या मराठीतील लेखकांमध्ये आपले नाव अग्रगण्य आहे. साहित्याशी एकनिष्ठता, इमान राखून, निरंतर आशयसंपन्न लेखन करणार्‍या एका अस्सल साहित्यिकाची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाणकारांमध्ये तर आनंदाचे वातावरण आहेच. शिवाय मराठवाड्याशी आपला खास ऋणानुबंध असल्याने उद्गीर आणि परिसरातील रसिकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. तेव्हा सर्वप्रथम याविषयी काय भावना व्यक्त कराल?
मला अतिशय आनंद झाला. पहिल्यांदा माझी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा दि. २ जानेवारीला साडेअकरा वाजता मला निवड समितीचा फोन आला. विशेष बाब म्हणजे, मला सांगण्यात आलं की, ही निवड सर्वानुमते, सर्व घटक संस्थांच्यावतीने- कुठलीही कटूता न येता, स्पर्धा न होता, कुणालाही न दुखावता चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या वातावरणात झाली आहे. हे ऐकल्यावर त्याचे खरोखर एक वेगळेच समाधान दाटून आलं. आपण म्हणताय त्याप्रमाणे गांभीर्यपूर्वक लेखन करणार्‍या माझ्यासारख्या लेखकाची निवड होणे, याबद्दलच्या प्रतिक्रिया सर्वत्र चांगल्या उमटत आहेत. समाजमाध्यमांतून, प्रत्यक्ष भेटून, फोन-संपर्क करून सर्वसामान्य वाचक, लेखक, समीक्षक, माझे चाहते, संपादक असे साहित्याशी संबंधित सर्वच घटक आनंद व्यक्त करीत आहेत. त्यामुळे एक आनंदाचं वातावरण असल्याचं नक्कीच जाणवतंय!
 
 
 
एखादा लेखक आशयसंपन्न लेखन करतो, वर्षानुवर्षे रसिकांमध्ये लोकप्रिय असतो, अनेक मान-सन्मान-पुरस्कार मिळवतो, आपणासही अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही आपण भूषविले आहे. पण, लेखकाच्या एकूणच साहित्यिक कारकिर्दीवर खर्‍या अर्थाने मानाचा मुकूट म्हणजे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे हे अध्यक्षपद! तेव्हा या मानाच्या पदाबद्दल आपले काय विचार आहेत?
हो, हे सत्यच आहे की, हे फार मोठं असं मानाचं पद आहे. म्हणून त्या पदाचा आनंद जसा मोठा आहे, तशीच त्याबरोबर येणारी जबाबदारीही तितकीच मोठी आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि अखिल भारतीय मराठीच्या अशा एका सर्वोच्चव्यासपीठावर उभं राहून मला बोलायचं आहे. त्यादृष्टीने सध्या माझं चिंतन सुरू आहे. कोणत्या स्वरूपाचे विचार व्यक्त व्हायला पाहिजे, याविषयी मनन करतो आहे. ‘अध्यक्षीय भाषण’ ही जबाबदारीची आणि महत्त्वपूर्ण बाब असते. या भाषणाच्या माध्यमातून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने माझा रसिकांशी उत्तम संवाद व्हावा, असं मला वाटतं आणि तसा माझा प्रयत्न असेल.
 
 
 
Bharat-Sasane2
९५व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांची त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी मुलाखत घेताना अमृता खाकुर्डीकर



आपलं विपुल म्हणावं इतकं लेखन प्रसिद्ध आहे. कथासंग्रह, दीर्घ कथासंग्रह, कादंबरी, शिवाय नाटक अशा विविध साहित्यप्रकारांतून आपण अतिशय शैलीदारपणे व्यक्त झाला आहात. पण, त्यातही ’दीर्घकथा’ लिखाणाचा आपल्याला प्रदीर्घ अनुभव. तेव्हा, दीर्घकथांचा हा साहित्यिक प्रकार आपल्याला अधिक जवळचा का वाटतो?
अगदी बरोबर! मी दीर्घकथा जास्त लिहिल्या आहेत. तो माझा आवडता रूपबंध आहे. पण, साधारणपणे मी जेव्हा लिहायला सुरुवात केली, तेव्हा आधी लघुकथाच लिहिल्या. पण, नंतर नंतर तो ‘फॉर्म’ मला माझ्या एकूण अभिव्यक्तीसाठी पुरेसा वाटेना. म्हणून मी काहीतरी असं शोधत होतो की, ज्यात मुक्तपणे व्यक्त होता येईल. जे कादंबरीच्या जवळ जाईल, पण ती कादंबरीही नसेल. कथा असेल, पण ती लघुकथा नसेल. यादृष्टीने मला दीर्घकथेने आकर्षित केले. माझ्या आधीही काही ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिक दीर्घकथा लिहीत होते. म्हणजे जी. ए. कुलकर्णी यांनी तर दीर्घकथा लिहिल्या आहेतच, पण आणखीही काही लेखक या ‘फॉर्म’मधून कथामांडणी करीत होते. म्हणूनच माझा असा दावा तेव्हाही नव्हता आणि आताही नाही की, मी दीर्घकथा प्रस्थापित केली. परंतु, एक मात्र नक्की की, एकूण साहित्यनिर्मितीच्या मानाने दीर्घकथेकडे फारच दुर्लक्ष झाले आणि त्याकडे मी विशेष लक्ष वेधले. कारण, मला लिहिताना जाणवत होते की, लघुकथेपेक्षा जास्त असं सांगायचं असेल, लघुकथेत मावत नाही अशा विस्तीर्ण मानवी दुःखांचं प्रकटीकरण आणि त्यातली बहुव्यामिश्रता मांडायची असेल, तर त्यासाठी ‘दीर्घकथा’ हा सर्वोत्तम प्रकार आहे. म्हणून मी या माध्यमातून जाणीवपूर्वक लिहित राहिलो. लिहिताना पुढे पुढे यात दडलेल्या शक्ती मला अधिकच प्रत्ययाला आल्या. त्या शक्ती म्हणजे, बहुकेंद्री असं वातावरण यात निर्माण करता येतं, काळाचा एक मोठा पट विणता येतो, माणसाच्या जगण्याच्या छोट्या छोट्या अनेक लढाया असतील किंवा मोठमोठे संघर्ष असतील, ते सर्व या विस्तृत अशा रूपबंधात विविध पात्रांच्या रूपात बांधता येतात. हे जाणवल्याने काहीशा दुर्लक्षित अशा या साहित्यप्रकारात प्राण फुंकावेत, तसं माझ्याकडून घडत गेलं.
 
 
 
 
साधारण सन १९८०च्या सुमाराला मी लेखन सुरू केलं. त्यास वाढता प्रतिसाद बघता सन १९९० पर्यंत ‘दीर्घकथा’ हा ‘फॉर्म’ मी नव्याने रूढ केला, अशी मान्यता समीक्षेनेच माझ्या नावावर नोंदवली आहे. दिवाळी अंक त्यावेळी एक मोठं प्रस्थ होतं, आजही आहे. त्यातून मुख्यतः माझ्या दीर्घकथा प्रसिद्ध झाल्या. एक बाब इथे आवर्जून लक्षात आणून देणं आवश्यक आहे, ते म्हणजे दिवाळी अंकांच्या अनुक्रमणिकेत ‘कथा’ या शीर्षकांतर्गतच दीर्घकथाही समाविष्ट असे. या अनुषंगाने मी याबाबत माझी ठाम भूमिका मांडली. दूरदर्शनवर एका मुलाखतीतविद्याधर पुंडलिकांच्या साथीने या मुद्द्यावर बोलताना दीर्घकथा म्हणजे कथा-कादंबरी या प्रकारातून फुटून निघालेला वेगळा असा रूपबंध असून हा स्वतंत्र कोंभ जपला पाहिजे. त्याचा वेगळा साहित्यप्रकार मानून या अभिव्यक्तीचा आदर केला जावा, सरसकट तिला ‘कथा’ न म्हणता ’दीर्घकथा’ असा वेगळा ठसठशीत उल्लेख असावा, असा आम्ही आग्रह धरला. विशेष म्हणजे तो पुढे मान्य झाला आणि त्यानंतर दिवाळी अंकातून ’दीर्घकथा’ असे शीर्षक असलेला वेगळा विभाग छापला जाऊ लागला. आणि त्यानंतर दीर्घकथेचं आणि माझं नातं अधिक घट्ट झालं! मला याचं जास्त समाधान आहे की, वाचक यानिमित्ताने जागृत झाला. रसिक जाणकार वाचकाची समज वाढली. ‘दीर्घकथा’ हा वेगळा स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून त्याचा अनुभव कसा घ्यावा, त्या स्वरूपात कसं बघितलं पाहिजे, हे वाचकांचं महत्त्वाचं ‘एज्युकेशन’ या निमित्ताने झालं. त्याचवेळी मराठीशिवाय इतर भाषांमध्ये सुद्धा दीर्घकथा समोर येत होती. हिंदीमध्ये ’लंबी कहानियाँ’ म्हणून लेखन करणार्‍या उदय प्रकाशसारख्या लेखकांनी अन्य भाषांमधील दीर्घकथेच्या व्याख्येबद्दलचा संभ्रम सांगताना म्हटलं आहे की, मी ’लंबी कहानी’ लिहिली तर तिला आमचे वाचक ‘कादंबरी’ समजतात. सुदैवाने मराठी समीक्षेत गाडगीळांपासून अनेकांनी दीर्घकथेची उचित व्याख्या केली. त्यामुळेच माझ्या नंतर दीर्घकथा आवर्जून लिहिणार्‍या लेखकांनी याबाबत असं नेमकेपणे म्हटलंय की, ‘दीर्घकथा ही मराठी साहित्याने अन्य भाषांना दिलेली देणगी आहे.’ हे विधान फार महत्त्वाचं आहे. त्याची सत्यासत्यता पडताळून पाहिली पाहिजे; पण तूर्तास तरी याचं श्रेय नकळतपणे माझ्यापर्यंत मराठी समीक्षेने आणून ठेवलं आहे. अर्थात, तसा माझा मात्र कोणताच दावा नाही.
 


Bharat-Sasane1
  मसाप सत्कार समारंभ
 
 
आपल्या संपूर्ण लेखनाला एक गूढतेचं वलय आहे. मानवी मनाची गुंतागुंत, व्यामिश्रता, भावना आणि बुद्धी यांचा संघर्ष, बौद्धिक एकटेपण, त्या एकटेपणातून येणारं एकप्रकारचं तुटलेपण हे वाचकाला विद्ध करून जातं... ही सगळी शैली ग्रेसच्या कवितेसारखी वाटते, अनेकदा यातलं गद्य काव्यमय होत जातं.. तशीच तुमची शैली जीएंच्या कथेच्या जवळ जाणारी गूढ-गहन अशी वाटते. तेव्हा आपल्या साहित्यावर ग्रेस आणि जीएंचा प्रभाव आहे का?
याबाबत असं सांगता येईल की, काही समीक्षकांनी अशी मांडणी केली आहे की, जीए, ग्रेस, चि. त्र्यं.खानोलकर या साहित्यिकांपासून अशा अमूर्त शैलीतील लेखकांचा एक धागा माझ्यापर्यंत आला आहे. अगदी जबाबदार अशा मराठी समीक्षकांनी ही टिप्पणी केली आहे. समीक्षेने केलेली ही नोंद महत्त्वाची आहे. ते कितपत मान्य करायचं किंवा नाही करायचं, हा चर्चेचा विषय असू शकतो; पण हा धागा माझ्यापर्यंत आला आहे, हे नक्की! आता यानंतर मुद्दा येतो तो माझ्यावर जीएंचा प्रभाव आहे का... तर याबाबत सुद्धा समीक्षेने सुरुवातीला भरपूर चर्चा केली आहे. विशेषतः भारत सासणेंची कथा जीएंच्या शैलीच्या अंगाने जाते का, याचा शोध घेताना, जशा जशा माझ्या दीर्घकथा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या, तेव्हा समीक्षकांनी स्वतःच काही बाबी अगदी स्वच्छपणे स्पष्ट केल्या. या तुलनेत जीएंच्या कथेत व्यक्त झालेल्या मानवी दुःखाचं मूळ हे नियतीने निर्माण केलेल्या परिस्थितीच्या तळाशी दडलंय आणि भारत सासणेंच्या कथेत मानवी दुःखाचं मूळ हे माणसाच्या स्वतःच्या वर्तनात दडल्याचं चित्रण आलंय. हा असा निर्वाळा मिळाल्याने जो काही फरक आहे, तो इथेच अगदी स्पष्ट झाला आहे. त्यामुळे जीएंचा तो प्रभाव किंवा तुलना यातून माझी कथा बाहेर आली. तिचं स्वतंत्रपणे मूल्यमापन झालं. माझ्या कथेतली पात्र ’नियतीवादाच्या छायेतून बाहेर पडून मानवी दुःखाची निर्मिती ही माणूस आपल्या वर्तन-व्यवहातून करतो’ हा माझा सिद्धांंत समीक्षेने महत्त्वाचा मानून मला जीएंपेक्षा वेगळं मानलं, तेव्हा ही तुलना आपोआप थांबली, याचं मला समाधान आहे. कारण, आपल्या सुखदुःखाचा कर्ता माणूस हा स्वतःच आहे, ही माझी भूमिका सर्वस्वी वेगळी आहे. म्हणून अशी तुलना खरं तर होऊ नये, असं मला वाटतं. एखाद्या ‘स्कूल’चा, एखाद्या ‘ग्रुप’चा असा मी नसल्याने, तो शिक्का मी नेहमी नाकारत आलो आहे. वास्तविक इथे प्रत्येकजण सुरुवातीला पूर्वसुरींकडून काहीतरी संचित घेत असतोच. जीएंचीफिलोसॉफी, चि. त्र्यं. खानोलकरांची भाषा, ग्रेस यांची विलक्षण काव्यमयता यांचा माझ्यावर नकळत प्रभाव असेल; पण तो धागा घेऊन माझी वाट मात्र माझी स्वतःची स्वतंत्र आहे, वेगळी आहे, असं मला वाटतं. कुणाच्यातरी प्रभावाखाली वाटचाल करणं, यापेक्षा आपला नवा रस्ता तयार करणं, यातच लेखनाचं मर्म आहे!
 
 
 
आपल्या काही कथांवर आधारित नाटक आणि चित्रपटही प्रदर्शित झाले. ’सूर्योदय’ चित्रपटाला तर कथेसाठीचा पुरस्कारही आहे. मकरंद अनासपुरे यांनी आपल्या एका कथेवर ‘काळोखाच्या पारंब्या’ या नावाने चित्रपटही प्रदर्शित केला आहे. असं माध्यमांतर झाल्याने ती कलाकृती अधिकाधिक रसिकप्रेक्षकांपर्यंत पोहोचते, हे खरं. तेव्हा तुमच्या कथेचं असं रूपांतरण तुम्हाला कसं वाटतं?
होय, माझ्या काही कथांचं असं माध्यमांतर झालं आहे. त्याचा अर्थातच एक लेखक म्हणून आनंद आहे. माझ्या ’नवा सूर्योदय’ या कथेवर ‘सूर्योदय’ नावाचा चित्रपट आला आणि त्यासाठी मला चित्रपट विषयक मानाचा कथेसाठीचा पुरस्कारही मिळाला. आणखीही एक-दोन प्रयत्न असे झाले. त्यापैकी दूरदर्शनसाठी सुमित्रा भावे यांनी ’मूर्खाने सांगितलेली गोष्ट’ या माझ्या कथेवर केलेली टेलीफिल्म बरीच चर्चेत होती. सुमित्रा भावे यांच्या निधनानंतर दूरदर्शनने ती फिल्म पुन्हा नुकतीच दाखवली आणि आता मकरंद अनासपुरे यांनी माझ्या कथेवर केलेला ‘काळोखाच्या पारंब्या’ सुद्धा बर्‍याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजतो आहे. पुण्याच्या ‘पिफ महोत्सवा’त पण त्याला काही पुरस्कार मिळाले. पण, आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगायचं तर कथेच्या अशा रूपांतरणाचं सर्वस्वी समाधान लेखकाला मिळतंच असं नाही. माझी कथा त्या माध्यमातील लेखक/ दिग्दर्शकाला कशी समजली,अंतिमतः दृश्य काय दिसलं, त्याने कोणत्या दृष्टीतून पाहिलं, मला जे म्हणायचंय; याबाबत त्यांचं आकलन काय, यावर सगळं हे दृश्यात्म रूप अवलंबून असतं. त्यातील मर्यादा, अडचणी या गोष्टी लेखकाच्या हाती उरत नाहीत. कथेतला कोणता मुद्दा त्यांना प्रकर्षाने मांडावासा वाटला, याचा निर्णय ते करतात. तो त्यांच्या माध्यमाचा विचार करून असेल. पण, आतापर्यंत सिनेमा करणार्‍यांनी माझ्या कथेतील गहिरेपण आणि अंगभूत विलक्षण नाट्य आवडल्याचं सांगूनच कथा निवडल्या, त्याचा अर्थात आनंद आहे. जे असे दोन-तीन प्रयत्न झाले, ते काही अगदीच असमाधान देणारे नव्हते, एवढं मी म्हणेन.
 
 
 
लेखनाचं सार्थक नेमकं कशात असतं, म्हणजे, सामान्य वाचकांचं प्रेम, समीक्षकांकडून योग्य दखल, विविध पुरस्कार की, आत्मिक समाधान? ज्याला आपण ‘स्वान्त सुखाय’ म्हणतो तसं. नेमक्या कोणत्या प्रेरणा तुम्हाला लिहितं करतात?
हा फार महत्त्वाचा, खूप छान, पण उत्तर द्यायला मात्र तितकाच अवघड असा प्रश्न आहे. लेखनाची सार्थकता किंवा लेखकाचं सार्थक नेमकं कशात आहे, हे ठरवणं अवघड असतं. कारण, ते संमिश्र असतं. पण, याबाबत मी नक्की सांगू शकतो की, पुरस्कार-समीक्षकांची मान्यता - इतर सर्व मानमान्यता या अनुषंगिक बाबी आहेत, ते मुख्य हेतू नसतात. लेखक त्यासाठी म्हणून कधी लेखणी उचलत नाही. कदाचित तो यातून स्वतःचा शोध घेतो आणि त्या शोधातून त्याला काही व्यक्त करायचं असतं. त्या अर्थाने लेखक एका प्रतिसृष्टीचा मालक आहे. आपल्या पुराणांमध्ये परशुराम किंवा अन्य कुणी प्रतिसृष्टी निर्माण केली, असे उल्लेख आहेत. मी म्हणेन की, लेखकसुद्धा त्याच्यापेक्षा कुणी वेगळा नाही. कारण, तोही पात्र निर्माण करतो, त्या पात्रांच्या माध्यमातून एकसुखदुःखाची दुनिया साकारतो जणू प्रतिसृष्टी निर्माण होते. यात लेखकाचं सार्थक काय, त्याची प्रतिज्ञा काय, तर... हे जे काही जीवन खर्‍या जगात अस्तित्त्वात आहे, तेच मी इकडे प्रतिबिंबित करतो. प्रत्यक्षात इथे वावरणारा हा जो कोणी सामान्य माणूस आहे, तोच माझ्या नवनिर्मितीचे प्रयोजन ठरतो. त्याच्या भोवती भावभावनांचे जे गूढ वलय आहे, ते मला टिपता येईल का, हा सामान्य माणूस मला नेमका सापडू शकेल का, मी त्याचं जगणं खर्‍या अर्थाने मांडू शकेल का, यादृष्टीने लेखकाच्या विचारांचा जो प्रवास सुरू होतो, तिच त्याच्या लेखन सार्थकतेची सुरुवात असते. माझी लेखनप्रेरणा सामान्य माणूस हाच आहे. या मातीतला रस घेऊन टवटवीत होऊन तो जगतो, त्यातूनच साध्याशा जगण्यातही तो कित्येकदा ‘ग्रेट’ ठरतो. माणसातलं हे माणूसपण हीच मुख्य प्रेरणा मला लिहितं करते. सामान्य माणसाच्या जगण्याची वेदनाच माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. त्यातूनच मला अनेक कथा सूचत जातात. मला जे दिसतं ते इतरांना दिसेलंच असं नाही, म्हणून मला जे दिसलं, ते मांडण्याची माझी प्रतिज्ञा आहे.
 
 
  
आपण बालवाचकांसाठीही लेखन केले आहे. ते कसं घडून आलं? काही खास प्रयोजन मनात होतं का? यालाच जोडून विचारायचंय की, अनुवाद करायलाही तुम्हाला आवडतात. तेव्हा, बालसाहित्य आणि अनुवाद लेखन यामागची तुमची भूमिका सांगा.
अनुवादाबद्दल आधी सांगतो. झालं काय की, माझं बरंचसं आयुष्य मराठवाड्यात गेलं. तिथे उर्दूचं फार प्राबल्य आहे. मला या भाषेचं खूप आकर्षण होतं. अतिशय समृद्ध अशी ती एकेकाळची राजभाषा होती. तिच्यातलं साहित्य, काव्य समजून घ्यायचं तर ती मूळातून शिकावी, असं वाटलं. शब्दांचे अर्थ किंवा व्याकरण नीट व्याख्येसह शिकल्याशिवाय कोणतीही भाषा नीट समजत नाही. म्हणून उर्दूचा पद्धतशीर, शिस्तीने अभ्यास करावा, अशी बरेच दिवसांपासून माझी इच्छा होती. खरं तर (पान ४ वरून) बर्‍याच उशिरा मी उर्दू शिकलो. सिनेमा, गाणी यातून आपल्या कानावर उर्दू भाषा पडते खरी, पण तेवढ्याने खरा अभ्यास होत नाही, पण एक ओळख मात्र होते. खरे तर ही एक अतिशय गोड अशी भारतीय भाषा आहे. ती शिकलो तर एक नवा दरवाजा आपल्या व्यासंगासाठी आणि लेखनासाठी उघडला जाईल, हा हेतू होता. त्यात अनेक दिग्गज लेखक कवींचं लेखन फार ताकदीचं आहे. प्रथम मी त्यातल्या छोट्या छोट्या कथा वाचल्या. त्याचे मराठीत अनुवाद करायला लागलो. बरेच माझे समकालीन लेखक, कवी मित्र मला तिथे मिळाले. त्यातून देवाणघेवाण वाढली. माझ्याही मराठी कथांचे अनुवाद ते करायला लागले. त्यांच्या कथा मी मराठीत आणायला सुरूवात केली. अशा आठ-दहा कथा मी उर्दूतून मराठीत आणल्या. एका उर्दू कादंबरीचा मी केलेला मराठी अनुवाद ‘साधना प्रकाशना’ने प्रसिद्ध केला आहे. ‘दरवाजे खोल दो हे’ १९६० साली उर्दूत लिहिलेलं नाटक माझ्या वाचनात आलं. तेव्हा जाणवलं की, काळाशीही निगडित, आजच्या भोवतालाशी सुसंगत असं हे नाटक आहे. त्याचा मी लगेच सरळ अनुवाद केला. ‘साधना प्रकाशना’ने तोही प्रकाशित केला आहे. या सगळ्याच अनुवाद प्रपंचाचा हेतू हाच की, एखादा चांगला विचार मराठीत आणणं, जे अजून आपल्या साहित्यात उपलब्ध नाही ते मूल्य आपल्या भाषेत प्रकट करून त्यावर भाष्य मांडणं आणि मराठी वाचकांसाठी उर्दूचं हे सुंदर दालन खुलं करणं.
 
 
 
आता बालसाहित्याबद्दल सांगतो. मुलांसाठीच्या साहित्याची फार काही बरी स्थिती आपल्याकडे नाही. खरंतर याबाबत गांभीर्याने बोललं गेलं पाहिजे. आज जे काही ‘मुलांसाठी’ म्हणून लिहिलं जातं, त्यावर पुष्कळ आक्षेप आहेत; पण घ्यायला हवेत तसे आक्षेप मात्र घेतले देखील जात नाहीत. अन्य भाषेत त्यामानाने मुलांसाठी चांगलं लेखन होतंय. पण, त्याचा विचार आपल्याकडे झालेला नाही. यातला खरा मुद्दा असा की, प्रतिभावान अशा साहित्यिकाने बालसाहित्य लिहिले पाहिजे, तरच त्यातली संवेदना खर्‍या अर्थाने टिपली जाईल. कल्पनाशक्ती असणारा लेखकच यात खरे रंग भरू शकतो. पण, प्रतिभा नसलेले लेखक जेव्हा असं लेखन करतात, तेव्हा त्यात प्रचारकी औपचारिकता असते, साहित्याचे खरे रंग त्यात उतरत नाही; तर कुठेतरी दुय्यम पातळीवरच हे लेखन थबकून राहतं. अशी पुस्तकं बरीच छापली जातात. मुलांना ती वाचायला दिली जातात, ही चिंतेची बाब आहे. मुलांच्या भावविश्वात प्रवेश करु शकतील अशी चांगली चित्रं नसतात, चांगली छपाई, रंगीत पाने याबाबत खर्चाचे प्रश्न उभे केले जातात. पण, प्रकाशकांच्या या व्यावहारिक अडचणी बालसाहित्यावर विपरीत परिणाम करतात. तसं होता कामा नये. चांगल्या चित्रांची, रंगीत छान पानांची पुस्तकं मुलांना मिळायलाच हवी. तो त्यांचा हक्क आहे. विशेषतः ‘कॉमिक्स’ नावाचा प्रकार मुलांना खूप आवडतो.
 
 
 
अन्य देशांत आणि भाषांमध्ये मुलं ते वेड्यासारखं झपाटून वाचतात. कारण, तिकडे त्याची निर्मिती फार दर्जेदारपणे केली जाते. पण, मराठीत तर हा प्रकार अस्तित्वातच नाही. ‘कॉमिक्स’ वाचण्याचं एक तंत्र आहे. पाढे वरून खाली वाचले जातात, तर पुस्तकातल्या ओळी सरळ आडव्या वाचल्या जातात, त्यानुसार क्रमाने ‘कॉमिक्स’ची रचना असावी. चित्रमाला वाचण्याची त्याला सवय व्हायला हवी. ग्रामीण भागातील मुलांसाठी तर हे उत्तम माध्यम आहे. याबाबत मी ’किशोर’ मासिकाच्या संपादकांशी बोललो. त्यांना ही कल्पना आवडली. आता माझ्या एका पुस्तकावर अशी चित्रकथा मालिका येतेय. दिपक संकपाळ त्याची निर्मिती करीत आहेत. असं वेगळ्या स्वरूपात मुलांना मनोरंजन दिलं पाहिजे. ते यानिमित्ताने होतंय याचा आनंद आहे. पण, याशिवाय मुलांसाठी मी कथेऐवजी थेट कादंबर्‍या आणि नाटकं लिहिली आहेत. त्याचे प्रयोगही रंगभूमीवर झालेत. अजून व्हावेत, अशी माझी अपेक्षा आहे. अशातर्‍हेने मी बालसाहित्याशी आणि बालरंगभूमीशी जोडला गेलो, तर मला आवडतं.
 
 
 
 
तुमच्या समकालीन लेखकांपैकी किंवा पूर्वसुरींपैकी तुमचे स्वतःचे आवडते लेखक कोण किंवा एकूणच सद्य साहित्य प्रवाहाबद्दल काय सांगाल?
आवडीचे म्हणाल तर सर्व भाषांमधले माझे आवडते लेखक आहेत मोंटो, मुन्शी प्रेमचंद, त्यांच्या साहित्यात त्यांनी ज्याप्रकारे मानवी भावभावनांचा तळ गाठला, शोधला तसा इतका विचक्षणरित्या इतर कुठे आढळत नाही. अगदी खोलात जाऊन त्यांनी माणूस शोधला आहे, हे विशेषत्वाने मला भावतं. उर्दूत बरीच दिग्गज मंडळी आहेत, ज्यांनी मोठं काम केलंय. मी त्या सर्वांचा आदर करतो. मराठीत म्हणाल, तर तेव्हा दोन ठळक प्रवाह होते. मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन. त्यात आपल्याकडे उत्तम स्टोरी टेलर होते. उदा. नाथ माधव, ना. ह. आपटे आणि ह. ना. आपटे, नारायण धारप, गो. ना. दातार आणि हाडप हे सगळे माझे आवडते लेखक आहेत. त्यांनी जी अद्भुत सृष्टी साहित्यात निर्माण केली, त्या मनोरंजकतेचं मला कौतुक वाटतं. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचा तो काळ होता. सगळीकडे दमन सुरू होतं. एकीकडे अतीव दुःखमय अशी ती स्थिती होती. अशावेळी परकीयांच्या गुलामगिरीत राहणार्‍या मनाला या मनोरंजनाचा मोठा दिलासा होता. काही सामाजिक संदेश किंवा नकळत प्रबोधनही होतं. त्याकाळच्या सामान्य माणसासाठी हे सगळं फार आवश्यक होतं. ते ओळखून हे साहित्यिक लिहिते झाले होते. पण, आपण मात्र या संबंध साहित्य विश्वाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. त्याचं कारण असं दिसतं की, ते जुनं मराठी आता कोण वाचणार? त्यापैकी रेनॉल्डोवरच्या काही रूपांतरित वगैरे केलेल्या कादंबर्‍या आहेत, मग त्याचं हे मराठी रूपांतरण आता कोण कसलं वाचतंय, या भूमिकेतून याकडे आज पाहिलं जातं. पण, खरं तर कादंबरी रचनेची पायाभरणी या मंडळींनीच केली आहे. कादंबरी वाचायला यांनी आपल्याला शिकवलंय, हे विसरता येणार नाही. त्याकाळातले हे सर्व लोकप्रिय ’मास्टर स्टोरी टेलर’ मला आवडतात. एकेकाळी तुटून पडून लोकं त्यांची पुस्तकं वाचत असत. याचं वाड्.मयीन मूल्य श्रेष्ठ आहे. त्यानंतरच्या काळात चि. त्र्यं. खानोलकर, जीए यांची नावं घ्यावीच लागतील. याशिवाय, ‘ह्यूमन सायकॉलॉजी’वर लिहिणारे गोखलेंसारखे लेखक लक्षवेधक आहेत. खरंतर मराठीतील सर्व प्रमुख मान्यवर लेखकांचं लेखन वाचतच मी घडलो. त्याची यादी फार मोठी आहे. तसंच समकालीनांमध्ये चांगलं लिहिणारे खूप लेखक आहेत. ते सर्वच जवळचे असल्याने कुणा एकाचं नाव घेणं योग्य ठरणार नाही.
 
  
 
अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये साहित्यविषयी काय करता येईल, याचे आपले नियोजन काय असेल? कारण, एक वर्षभर विविध ठिकाणी दौरे करून उपक्रम राबवले जावेत, अशी संमेलनाध्यक्षांकडून अपेक्षा असते, त्यासाठी अनुदानही दिलं जातं, विशेषतः कथाविषयक काही उपक्रम राबवावे असे वाटते का?
हो, नक्कीच! काही नियोजन माझ्या डोक्यात निश्चित आहे. अध्यक्ष होवो न होवो, गेली चार-पाच वर्षं मी राज्यातल्या विविध साहित्य संस्थांमध्ये फिरतो आहे. त्यातून काही गोष्टी लक्षात आल्या आहेत. अशा घटक संस्थांमध्ये काम करणारे बरेच छोटे-मोठे लेखक -कवी असतात. ग्रंथपाल, पदाधिकारी कार्यकर्ते असतात. त्यांना साहित्यात बरंच काही करायचं असतं! लिहिलेली पुस्तकं, राबविलेले उपक्रम संमेलनाध्यक्षांनी येऊन पाहावेत, अशी त्यांची इच्छा असते. मार्गदर्शन, कौतुकाची थाप त्यांना हवी असते. साहजिकच आहे, कारण ते स्वखर्चाने पुस्तकं छापतात. कधी तर खिशातले पैसे घालून उपक्रम राबवतात. म्हणून या सगळ्या कृतींकडे गंभीरपणे बघायला हवं. मी या सर्व गोष्टींची नोंद मनात करून ठेवली आहे. योगायोगाने मी आता या सगळ्या गोष्टींच्या जवळ गेल्याने लोकांच्याही माझ्याकडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करायला मला आवडेल. योगायोगानेच मी ’चालता-बोलता-फिरता’ असल्याने काही अडचण नाही! मी नक्की विविध ठिकाणी दौरे करून उपक्रमात सहभागी होणार आहे. आपण म्हणता तसं कथेबद्दल मला काही करता यावं, असा माझा प्रयत्न असेल. विशेषतःकथेच्या कार्यशाळा घेऊन लेखकांच्या कसदार लेखनासाठी भरीव काही नक्कीच करता येईल. तशी मागणी देखील आहे. यामध्ये साहित्य संस्कृती मंडळ, शासन आणि विविध घटक संस्था याचं सहकार्य घेऊन कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना मी करणार आहे. कारण, अशा मार्गदर्शनाची खरोखर खूप आवश्यकता आहे.
 
 
 
सर, मुलाखतीचा समारोप करताना इतक्यावेळ झालेल्या साहित्यविषयक चर्चेशिवाय महत्त्वाचं विचारावसं वाटतं की, साहित्य संमेलनाचं सध्या जे एक ठरीव साचेबद्ध स्वरूप आहे, म्हणजे, उद्घाटन-अध्यक्षीय भाषण-मुख्य सभामंडपातलं निमंत्रितांचं कवीसंमेलन- चर्चासत्र- परिसंवाद- कवीकट्टा यात येत्या संमेलनात काही वेगळेपण अपेक्षित आहे का, याबाबत काही वेगळा विचार, एखादा बदल आपण सूचवाल का?
होय, नक्कीच मी काही सूचना करू इच्छितो. विशेषतः परिसंवादांचे विषय असे ठेवले जावेत की, ज्यातून चांगली साहित्यचर्चा घडून येईल. उगीचच साहित्यबाह्य गोष्टी त्यात शिरून वाद ओढवले जाऊ नयेत. याशिवाय बालसाहित्यावर विशेष चर्चा किंवा काही कार्यक्रम असावा, वाड्.मयीन दर्जा सांभाळला जाईल, असेच सर्व कार्यक्रम असावेत. कथा-कादंबरी अशा मुख्य साहित्यप्रकारांना स्थान मिळावे, असा आग्रह मी धरणार आहे, नक्की!
 
 
 
एकूणच साहित्यसंमेलनाचा हा सोहळा गोड व्हावा, रसिकांच्या प्रतिसादाने समारंभ यशस्वी व्हावा, नामवंत लेखक-कवींच्या सहभागाने साहित्यानंद भरभरून मिळावा आणि पुस्तक खरेदीचा आनंद रसिक वाचकांनी लुटावा, अशा शुभेच्छा आपणास दै. ‘मुंबई तरूण भारत’ आणि सर्व रसिकांच्यावतीने व्यक्त करते. सध्याच्या आपल्या इतक्या व्यस्त दैनंदिनीतून आपण आमच्यासाठी वेळ दिलात, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
 
 
 
 
मुलाखतीचा समारोप करताना मीना सासणे संवादात सहभागी झाल्या. सासणे यांची संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचा त्यांनी मनःपूर्वक आनंद व्यक्त केला. पतीच्या लेखन प्रवासाच्या त्या अगदी पहिल्यापासून साक्षीदार असून ’पहिला वाचक’ ही त्यांची भूमिका असते. त्याचबरोबर लेखन मजकूर संपादक, प्रकाशक यांच्याकडे पाठवताना मसूदा तपासून बघणे हे काम त्या आवडीने करतात. वाचक-चाहत्यांचा पत्रव्यवहार सांभाळण्यात त्यांची मदत असते. सासणे यांच्या अध्यतेखाली होणारे उद्गीर येथील संमेलन आनंदात संपन्न व्हावे, अशी आशा व्यक्त करून संमेलन यशस्वी होण्यासाठी त्यांनी संयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत सासणे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना आल्या-गेल्यांचे आगत-स्वागत हसतमुखाने करण्यात सध्या त्या मश्गुल आहेत.
मुलाखतकार - अमृता खाकुर्डीकर 
amruta.khakurdikar@gmail.com
 
 
 
भारत सासणे यांचा अल्पपरिचय
*भारत सासणे हे वैजापूरला दि. ४ एप्रिल, २०१० रोजी झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.
*‘बहिर्जी शिक्षण संस्थे’तर्फे व समत येथे दि. ९-१० नोव्हेंबर, २०१४ या काळात आयोजित केलेल्या ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे होते.
*नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे दि. १४ फेब्रुवारी, २०१६ रोजी भरलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
*‘सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ’, जळगाव आयोजित राज्यस्तरीय ‘सूर्योदय मराठी साहित्य संमेलना’चे समारोपीय सत्राचे अध्यक्षपद.
*‘सूर्योदय सर्वसमावेशक मंडळा’च्या वतीने समग्र साहित्य सेवेबद्दल ‘सूर्योदय’ पुरस्कार.
*उद्गीर येथे २०२२ मध्ये होणार्‍या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.
 

भारत सासणे यांची साहित्यसंपदा
*अदृष्ट (दीर्घकथा संग्रह)
*अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह)
*अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह)
*आतंक (दोन अंकी नाटक)
*आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह)
*ऐसा दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह)
*कँप/बाबींचं दुःख (दीर्घकथा संग्रह)
*चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका)
*चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
*जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी)
*चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
*जॉन आणि अंजिरी पक्षी (लेखकाचा पहिला कथासंग्रह)
*त्वचा (दीर्घकथा संग्रह)
*दाट काळा पाऊस (दीर्घकथा)
*दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका)
*दोन मित्र (कादंबरी)
*नैनं दहति पावकः
*बंद दरवाजा (कथासंग्रह)
*मरणरंग (तीन अंकी नाटक)
*राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी)
*लाल फुलांचे झाड (कथासंग्रह)
*वाटा आणि मुक्काम (सहलेखक आशा बगे,मिलिंद बोकील, सानिया)
*विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह)
*शुभ वर्तमान (कथासंग्रह)
*सटवाईचा लेख (पाच भागात -वाटल्या गेलेल्या लेखांचा संग्रह)
*स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह)
*क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह)
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121