आज दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचा हा दिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणूनही देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्वामी विवेकानंदांच्या सर्वसमावेशक धर्मविचारांचे या लेखातून केलेले हे चिंतन...
भारतीय अध्यात्म विचार आणि धार्मिक तत्त्वांचा समाजाला ऊर्जितावस्था मिळवून देण्याकरिता आणि त्याच्या सर्वांगीण उत्थानाकरिता सुयोग्य वापर करणार्या, महनीय भारतसंततींच्या यादीत स्वामी विवेकानंदांचा अग्रक्रम लागतो, याबाबत संदेहाला जागा नाही असं मला वाटतं. उण्यापुर्या चाळीसेक वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या ज्ञान आणि सेवासिद्धीच्या बळावर, पर्वतासम असाध्य वाटणार्या आव्हानांचं चूर्ण-विचुर्ण केलं आणि हिंदू धर्मातल्या विशाल मानव्याचं जगतासमोर पुण्याहवाचन केलं. स्वामीजींनी उद्धृत केलेला उपनिषद आणि एकूण वेदांचा अर्थ व त्यायोगे आलेली हिंदू धर्म, भारतधर्माची मांडणी त्यांच्या अनेक व्याख्यांनामधून, पत्रांमधून स्पष्टपणे समोर आली असली तरीही आजच्या भारतीय जनसामान्यांना पूर्णपणे त्याची जाण आहे, असं चित्र अजून तरी नाही. विवेकानंदांना हिंदू धर्म, भारत आणि एकूण जागतिक पटलावरील इतर धर्मांबाबत काय वाटत होतं ते किमान संक्षेपात मांडण्याची या प्रसंगी गरज आहे, असं मला वाटतं.
भारतीय वेदवेदांगे, उपनिषदे आणि नंतरहून निर्माण झालेल्या पुराणांच्या सखोल अभ्यासानंतर स्वामीजींनी जे चिंतन मांडलं आहे, ते भारतीय सभ्यतेचा भाग असणार्या , हिंदूधर्मीय व हिंदू धर्माचा अभ्यास करू पाहणार्या इतर धर्मीय अभ्यासकांनी वाचायलाच हवं. या देशाच्या संस्कृतीचं अध्ययन करण्यासाठीची म्हणून ती एक पूर्वअटच असली पाहिजे आणि ते तसं का असावं, याची अगदी मुद्देसूद कारणमीमांसाही आपल्याला मिळते. विवेकानंदांना राष्ट्र, प्राचीन हिंदू धर्म, वेद आणि वेदान्तविचार यांचा नितांत, परंतु डोळस अभिमान होता. सखोल अभ्यासातून आलेलं चिंतन, प्रखर आणि प्रसंगी तीक्ष्ण होणारी समीक्षादृष्टी याद्वारे त्यांनी मांडलेलं प्राचीन हिंदू धर्माचं खरंखुरं मानवी, सहिष्णू अवकाश पुनःश्च मोकळं झाल्याचं दिसतं. ’उत्कट भव्य तेंचि घ्यावे’ या उक्तीनुसार त्यांनी अप्रस्तुत असणार्या कर्मकांडावर, पुरोहितशाहीवर टीका करत ज्ञानकांडाकडे वळून, त्याचं अध्ययन करण्याचं आवाहन केलं. भारतीय लोक हे उपनिषदांच्या सार्थक करू पाहणार्या शिकवणीकडे दुर्लक्ष करून नव्याने निर्माण झालेल्या पुराणकथा आणि कर्मकांडात अधिक अडकून पडले आहेत, याचं त्यांना शल्य होतं, हे त्यांच्या अनेक पत्रांमधून आपल्याला स्पष्टपणे कळतं. मुळात आजच्या घडीला धार्मिक उन्माद प्रकट करणारे आणि सरकसकट धर्मच नाकारणारे दोन प्रवाह (ढोबळमानाने) असं ध्रुवीकरण झाल्याचं आपण पाहतो आहोत. या पार्श्वभूमीवर स्वामी विवेकानंदांचे सर्वसमावेशक धर्मविचार, सामाजिक आणि राजकीय विचार आजही आपल्याला लागू पडतात आणि पक्षपात बाजूला ठेवून त्यांचा संयत विचार करण्याची आवश्यकता आज अधिक वेगाने येऊन ठेपली आहे.
कोलंबोत झालेल्या सत्कारास दिलेल्या एका संक्षिप्त उत्तरात ते म्हणतात की, “या देशाला सशक्तपणे मार्गक्रमण करत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर त्याचं धार्मिक अधिष्ठान शाबूत राहिलं पाहिजे.” पण, स्वामीजींना नेमका कसा धर्म अपेक्षित आहे, याचा अंदाजच अनेकांना नाही आणि बुद्धिवादी गटांना अनेकदा ’धर्म’ या शब्दाचंच वावडं असल्याने त्या वाटेला न जाता केवळ टीकेची एक लकेर सोडून जाणं ते पसंत करतात. सर्वांना समानत्व बहाल करणारा, मानव्याची भूमिका ठेवून विशाल हृदयाने सर्वांना आपलंसं करणारा, विज्ञानवादी आणि दारिद्य्र निर्मूलन करत काय, वाचा आणि मानस समृद्ध करणारा हिंदू धर्म त्यांना अपेक्षित आहे. “पश्चिमी देशात कार्य करताना अदृश्य असणार्या अंतःस्थशक्तीपेक्षा माझी मातृभूमी, माझे लोक आणि त्यांच्या सदिच्छा मला अधिक बळ देतात,” असं ते स्पष्टपणे लिहितात. “पुढची ५० वर्षे कुठल्याही देवदेवाधिकांना न पूजता भारतमातेच्या चरणी आपलं समर्पण द्या,” म्हणणार्या या योद्धा संन्याशाला समाज हेच एक ’जागृत दैवत’ वाटत होतं, त्याच्या सेवेत आपलं जगणं धन्य करण्याच्या वाटेवर सर्वांनी चालावं ही त्यांची कळकळीची इच्छा होती. धर्म म्हणजे कर्मकांड, उन्माद, पुरोहितशाही नसून सर्वांगीण सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगती असं सरळसोपं तत्त्व त्यांनी आपल्या पदरात घातलं आणि आपण मात्र त्याची उपेक्षा केली. पूर्वेकडील देशांत भ्रमण करीत असता ते जपानमध्ये उतरले. तिथली प्रगती, स्वच्छ शहरं, उद्यम समाजाची पराकाष्ठा पाहून स्वामी प्रचंड प्रभावित झाले. आपल्या देशातल्या दारिद्य्र, जुनाट समजूती, धार्मिक निरक्षरतेमुळे झालेलं नुकसान त्यांच्या नजरेसमोरून गेल्या आणि त्यांचं मन हेलावलं. त्यासंदर्भात त्यांनी १८९३ साली लिहिलेलं पत्र आजही आपल्याकडील अवस्थेला लागू पडतं आणि हे असं असणं क्वचितच चांगली बाब नाही.
सर्वधर्म परिषदेनंतर जगभरात, त्यातही पश्चिमी देशांत स्वामींना अमाप लोकप्रियता मिळाली. त्यांची अनेक व्याख्याने जागोजागी होऊ लागली, पश्चिमी समाज त्यांना ऐकण्यासाठी गर्दी करू लागला. एकंदर भारत आणि हिंदू धर्माबाबत बोलताना, मूळ अध्यात्मविचार मांडत असताना गरजेच्या ठिकाणी ते ख्रिस्ती मिशनर्यांच्या दुटप्पी भूमिकांवरही टीका करत. भारतात लाखो रुपये खर्च करून प्रार्थनास्थळे उभारणार्या मिशनर्यांना मात्र मूर्तिपूजा करणारा, दारिद्य्रात खितपत पडलेला उपाशी मनुष्य दिसत नाही, याची खंतही त्यांनी पश्चिमी समाजासमोर बोलून दाखवली. इतर धर्मीयांसारखा लालसा, आक्रमकता आणि लबाडीच्या जोरावर हिंदू धर्माने कधीही प्रसार, प्रचार केला नाही याचा सप्रमाण इतिहास ते त्यांच्या ओजस्वी वाणीतून सर्वांसमक्ष ठेवत. ’सत्य असत्याशी...’च्या तत्त्वाचे ते वाहक होते आणि त्यामुळेच ते निर्भय, निडर होते, तसेच आत्यंतिक प्रेमळ आणि प्रामाणिक होते. त्यांच्या ससंदर्भ भाषणांनी पश्चिमेतील अनेक वृत्तपत्रे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करू लागली. ’न्यूयॉर्क हेराल्ड’ने तर, ज्या देशात असे संन्यासी धर्ममार्गावर इतके पुढे निघून गेले आहेत त्या ठिकाणी मिशनरींना पाठवणे हा शुद्ध मूर्खपणा असल्याचं जळजळीत प्रतिपादन केलं. अर्थात, विवेकानंदांबाबत अपप्रचार करणारी मंडळीही भारतात कार्यरत होती. पण, वैचारिक विरोध असूनही बिपीनचंद्र पाल, अॅनी बेझंट यांसारख्या समाजधुरीणांनी त्यांच्या पश्चिमदिग्विजयाचं कौतुक करत हे अपप्रचार हाणून पाडले. सांगण्याचा मुद्दा हा की, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या आर्थिक, सामाजिक परिघात पुढारलेल्या देशांतील जनतेला भगवे कपडे धारण केलेल्या एका संन्याशाचं इतकं वेड का लागावं? मला वाटतं याचं उत्तरही विवेकानंदांच्या धार्मिक व सामाजिक मांडणीत आपल्याला मिळतं.
मूळ धर्मग्रंथात असलेली आणि सर्वांभूती समानत्त्व मानणारी आपली परंपराच त्यांनी आहे तशी या समाजासमोर ठेवली. तिच्यात जात्याच असणारी सहिष्णूता आणि पुरोगामीत्व संयतपणे मांडलं.''I go forth to preach a religion, of which Buddhism is nothing but a rebel child and Christianity but a distant eco''” असं ते अभ्यासपूर्वक मांडत. अशी सत्य, सहज आणि सोपी पण प्रभावी मांडणी केल्याने या सर्वांना ते आपसेले वाटत, आचार्य वाटत. स्वामींनी मांडलेल्या धर्म आणि सामाजिक विचारांच्या तत्त्वात संयत आणि वाजवी पुरोगामीत्व आहे, हे तथाकथित डाव्या-उजव्या अशा सर्वांनीच मान्य करणं आता गरजेचं आहे. 'State, Society and Socialism' या त्यांच्या ग्रंथात त्यांनी त्यावेळी जी मांडणी केली आहे, ती केवळ थक्क करणारी आहे. ती काळाच्या किती पुढे आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. ते म्हणतात, ''My whole ambition in life is to set a machinery which will bring noble ideas to the door of everybody and let men and women decide their fate.''
वरील वाक्यातली व त्यांच्या एकंदरच अनेक पुढारलेल्या विचारांमधली आधुनिकता केवळ त्यांच्या संन्याशी असण्याने, हिंदू धर्माच्या प्रचार, प्रसारामुळे अनेक ‘बुद्धिवंत’ म्हणवल्या जाणार्या लोकांनी नजरेआड केली, हे उघड सत्य आहे आणि त्याने तसं त्यांचं व त्यांकरवी समाजाचंही घोर नुकसान झालं आहेच आणि दुसर्या बाजूस स्त्रियांच्या, मागासलेल्या समाजाच्या, दारिद्य्र पोटाशी धरून जीवन कंठणार्या किती लोकांच्या प्रती आपल्या मनात ममत्व आहे हे कर्मकांडात, जातीपातींच्या जुनाट मानसिकतेत अडकलेल्या धर्मवाद्यांनीही चाचपून पाहात आता सुधारणेकडे वाटचाल करणं गरजेचं आहे; अन्यथा शिकागोच्या अंग कापणार्या थंडीत उपाशीपोटी असताना देखील ’सर्वेत्र सुखिन: सन्तु’ म्हणणार्या, कालीकडे ज्ञान, वैराग्य आणि तुमचं आमचं भलं मागणार्या या असाधारण योग्यावर आपण घोर अन्याय करतो आहोत, असंच म्हणावं लागेल.
भारताची वेदोपनिषदांतली सहिष्णू आणि उदार परंपरा आपल्या ठायी अंगीकारण्याच्या वाटेवर असणार्या प्रत्येकाची विवेकानंदांच्या तर्कसंगत आणि स्वाभिमानी विचारांशी भेट होईल. त्यांनी उच्चारलेली पुण्यवाणी जगण्याचे कंगोरे उलगडून दाखवेल. तो मार्गच आपल्याला पुनःश्च जगताच्या शिखरावर नेऊ शकेल असा सार्थ विश्वास वाटतो.
- सौरभ खोत