मुंबई : महापालिका क्षेत्रातील भायखळ्याच्या 'मुस्तफा बाग' परिसरातील लाकडाच्या गोदामाला सोमवार, दि. ११ जानेवारी रोजी सकाळी भीषण आग लागली होती. सोमवारी पहाटे लागलेल्या या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी त्यात सुमारे १७ ते १८ दुकाने जाळून खाक झाली आहेत. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे ही आग विझवण्यात यश आले होते. दरम्यान, भायखळ्यातील या आग प्रकरणाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. ज्या परिसरात ही आग लागली होती, त्या परिसरातील जळून खाक झालेली दुकाने ही अनधिकृतरित्या उभारण्यात आली होती आणि अशा प्रकारच्या अनधिकृत उभारणीमुळेच आगीची घटना उद्भवली, असा आरोप भाजप नेत्यांच्या वतीने करण्यात आला आहे.
विद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच : भाजपचा दावा
'भायखळ्याच्या मुस्तफा बाग परिसरात आगीमुळे भस्मसात झालेली दुकाने भोवताली उभ्या असलेल्या ग्लोरिया गर्ल्स कॉन्व्हेंट स्कूल या शाळेच्या जागेवर उभारण्यात आलेली आहेत. सदरील दुकाने ही अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली आहेत. या दुकानांमुळे शाळेला देखील विविध अडचणींचा सामना करावा लागतो, हे वास्तव आहे. अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या दुकानांच्या दाटीवाटीमुळे या विद्यालयातील विद्यार्थिनींना दररोज मोठ्या असुविधेला सामोरे जावे लागत आहे. मुळात एखाद्या विद्यालयाच्या जागेवर इतक्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असताना प्रशासन काय करत होते ? हा आमचा सवाल आहे. विद्यालयाच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या दुकानांना महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अभय आहे. तेव्हा विद्यालयाच्या जागेवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या या दुकानांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा भाजपतर्फे या विरोधात आंदोलन करण्यात येईल,' असा इशारा भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिला आहे.
आगीत शाळेचे नुकसान
सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे लगतच्या ग्लोरिया गर्ल्स कॉन्व्हेंट स्कूल या शाळेचेही मोठे नुकसान झाले आहे. आग लागली त्या दिवशी शाळेतील विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शाळेत बोलाविण्यात येणार होते, मात्र पहाटे लागलेल्या या आगीमुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली. सुदैवाने विद्यार्थिनी शाळेत पोहोचण्यापूर्वी हा प्रकार घडला. दुर्दैवाने मुली आणि संबंधित शिक्षक - कर्मचारी शाळेत असताना जर हा प्रकार घडला असता आणि त्यातून काही जीवितहानी झाली असती तर त्याची जबाबदारी कुणाची होती ? स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका की राज्य सरकार ? याचे उत्तर प्रशासनाने देणे आवश्यक आहे,' अशी संतप्त भावना विद्यार्थिनींच्या पालकांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना व्यक्त केली आहे.
अतिक्रमणे तात्काळ हटविणे आवश्यक : पालकांची भूमिका
'आग लागलेली लाकडाची गोदामे ही अनधिकृतरित्या उभारली गेली आहेत असा आमचा आरोप आहे. केवळ आम्हीच नाही तर या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांची देखील हीच भूमिका आहे. या अनधिकृत दुकाने आणि अतिक्रमण केलेल्या जागेच्या विरोधात शाळा विरुद्ध दुकान मालिक यांच्यात न्यायालयात कायदेशीर लढाई सुरु आहे. एक पालक म्हणून आमची ही मागणी आहे की आमच्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाळा व्यवस्थानपनासोबतच सरकार आणि प्रशासनाचे देखील कर्तव्य आहे. कुठल्याही शाळेपासून २०० मीटरच्या भागात अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बाबींना निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तरीही शाळेच्या परिसरात अशा प्रकारे लाकडी गोदामे उभारण्यासाठी कुणी परवानगी दिली हा सवाल अनुत्तरित आहे. त्यामुळे एक पालक म्हणून आमची मागणी आहे की आमच्या मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करता प्रशासनाने संबंधित दुकानांवर आणि अतिक्रमण धारकांवर योग्य ती कारवाई करावी.'
- सतीश खांडगे, पालक