जोशी-बेडेकर महाविद्यालयामध्ये ‘ऑनलाईन’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

    11-Jan-2022
Total Views |

Joshi Bedekar College
 
 
 
 
ठाणे : ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला राजकीय नेतृत्व वैश्विक ते स्थानिक - आव्हाने व संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन आभासी पद्धतीने बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. विभूती पटेल, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, मुंबई महापालिकेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, भाजप राज्य उपाध्यक्ष माधवी नाईक, महिला राजसत्ता आंदोलनाचे भीम रासकर, मुंबई विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजेश खरात, मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे डॉ. मृदुल निळे आदी मान्यवर संवाद साधणार आहेत.
 
 
 
सदर परिषद सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येईल. झूम व युट्यूब लिंकवर परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय परिषदेत स्त्रियांच्या राजकीय नेतृत्वाची संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे, तसेच या विषयाशी संबंधित निवडक संशोधन पत्रिकाही सादर केल्या जाणार आहेत. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिषदेचे आयोजन राज्यशास्त्र विभागातर्फे विभाग प्रमुख उपप्राचार्या डॉ. प्रियंवदा टोकेकर, उपप्राचार्या संगीता दीक्षित व इतर प्राध्यापकांनी केले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे रवींद्र साठे व देवेंद्र पै यांचे सहकार्य या परिषदेसाठी लाभले आहे.