मुंबई (विशेष प्रतिनिधी) - शनिवारी रात्री रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधून जिवंत खवले मांजराची (pangolin) तस्करी उघडकीस आली. वन विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून जिवंत खवले मांजर (pangolin) हस्तगत केले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा कोकणात खवले मांजराची तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील भोर वरंध घाट येथे खवले मांजराची (pangolin) तस्करी होणार असल्याची माहिती साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना मिळाली होती. त्यानुसार भाटे यांनी भोरचे वनक्षेत्रपाल दत्ता मिसाळ यांना कळवून त्याठिकाणी सापळा रचला. तसेच भाटे यांनी बनावट ग्राहक म्हणून तस्करांशी संवाद सुरू ठेवला. वन विभागाच्या एका माणसाला या विक्रीसाठी येणाऱ्या लोकांच्यात शिताफीने सामील करण्यात आले. त्यानंतर या माणसासोबत आरोपींनी शनिवारी सकाळी वाई ते भोर आणि पुढे महाड ते टोळ गावापर्यंत प्रवास केला. सरतेशेवटी टोळ गावातील ज्या घरात जिवंत खवले मांजर (pangolin) ठेवले होते तिथे ही मंडळी पोहोचली.
त्याआधारावर वनक्षेत्रपाल महाड राकेश साहू, वनक्षेत्रपाल भोर दत्ता मिसाळ आणि इतर वनरक्षकांनी त्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शुभम प्रशांत ढहाणे (२५, सातारा), सुरज संतोष ढहाणे (२३, सातारा), सुनील भाऊ वाघमारे (३२, महाड), देवदास गणपत सुतार (४७, माणगाव), सतीश कोंडीराम साळुंखे (२३, महाड) यांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडे जिवंत खवले मांजर (pangolin) सापडले. या मध्ये वनक्षेत्रपाल महाड राकेश साहू, वनक्षेत्रपाल भोर दत्ता मिसाळ, मानद वन्यजीव रक्षक तथा रोहन भाटे, वनपाल भोर एस.आर.खट्टे, वनरक्षक भोर एस.के.होतराव, पि.डी. गुरेटे, के.पी.वेढे, के एम.हिमोणे , एस.एस. थोरात,व्ही.आर.आडगळे, ए.एस.पवार, वनरक्षक महाड एस.एम.परदेशी,आर.ए.पाटील, एस.एस.जाधव हे सर्वजण कारवाही मध्ये सहभागी होते. खेड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड आणि रायगड, पोलादपूर, पालगड, मंडणगड या भागातून गेल्या सहा महिन्यांमध्ये वनविभागातर्फे खवले मांजर तस्करी संबंधी केली गेलेली ही चौथी कार्यवाही आहे.