नुकतीच ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ची (आययूसीएन) अद्ययावत लाल यादी (रेड लिस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. या लाल यादीमध्ये जगातील वेगवेगळ्या प्रजातींचा त्यांच्या नैसर्गिक परिसंस्थेतील अधिवासाच्या अद्ययावत परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पातळीवर वर्गीकरण करण्यात येते. या यादीमध्ये केवळ भारतामध्ये आढळणार्या ‘लेसर फ्लोरिकन’ (तणमोर) या पक्ष्याला ‘संकटग्रस्त’श्रेणीमधून ‘अतिसंकटग्रस्त’ श्रेणीमध्ये हलवण्यात आले आहे. विलुप्तीच्या एक पाऊल मागे उभ्या असणार्या या पक्ष्याविषयी...
मुंबई (अक्षय मांडवकर) - 'तणमोर’ म्हणजेच ’लेसर फ्लोरिकन’ ( lesser florican ) या भारतात प्रदेशनिष्ठ असलेल्या पक्ष्याचे अस्तित्व आणि त्याच्या अधिवासाला लागलेले ग्रहण सुटता सुटत नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण, आता ’इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’च्या अद्ययावत लाल यादीत (रेड लिस्ट) या पक्ष्याच्या जगातील अस्तित्वाची नोंद ही ’अतिसंकटग्रस्त’ (क्रिटिकली इनडेंजर्ड) श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. पूर्वी हा पक्षी ’संकटग्रस्त’ (इनडेंजर्ड) श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला होता. या सर्व घटनाक्रमांमध्ये धोक्याची सूचना म्हणजे ही पक्षी प्रजात वाचवण्यासाठी आपल्याकडे फक्त काही वर्षे उरलेली आहेत. कारण, ’अतिसंकटग्रस्त’ श्रेणीनंतर पुढची श्रेणी ही विलुप्तीची आहे. तणमोरांच्या ( lesser florican ) संख्येमध्ये झालेली घट ही त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला गवताळ अधिवास न राखल्यामुळे झाली आहे. या अधिवासाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने आपण भारतीयांनी आणि आपल्या धोरणकर्त्यांनी ब्रिटिशांच्याच पावलावरच पाऊल टाकले.
विणीच्या हंगामात मादीला रिझवण्यासाठी नर तणमोर पक्षी ( lesser florican ) प्रजननासाठी एक खास प्रकारचे नृत्य करताना गवतामधून हवेत झेप घेतो. याच वेळी तो दिसून येतो. तणमोराच्या याच वर्तनाचा गैरफायदा उचलून ब्रिटिशांनी त्याची शिकार करण्यास सुरुवात केली. प्रजनन हंगामात प्राणी आणि पक्ष्यांना न मारण्याच्या ब्रिटिश नियमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातच हा पक्षी विलुप्तीच्या दिशेने वाटचाल करत राहिला. त्यात स्वातंत्र्यानंतरही ज्येष्ठ पक्षीअभ्यासक ’बर्ड मॅन ऑफ इंडिया’ डॉ. सलीम अली यांनीदेखील ब्रिटिशांची क्लृप्ती वापरून या पक्ष्याची शिकार होत असल्याची नोंद केली. परिणामी या पक्ष्याचे अस्तित्व विलुप्तीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले. ब्रिटिशांनी तणमोरांची (lesser florican ) शिकार करण्याबरोबरच आणखी एक वाईट गोष्ट केली, ती म्हणजे या पक्ष्याच्या अधिवास असणार्या गवताळ प्रदेशाची ’वेस्ट लॅण्ड’ म्हणून नोंद केली. जेणेकरुन या जमिनीवर आर्थिकदृष्ट्या उत्पादक उद्योगांना प्रोत्साहन दिले जावे. खेदाची गोष्ट म्हणजे, आपण भारतीयांनीदेखील हाच पूर्वग्रहदूषितपणा ठेवून गवताळ प्रदेशांचे संवर्धन करण्याच्या प्राधान्यक्रमांना कमी करण्यास अनुमती दिली. परिणामी, आजमितीस गवताळ प्रदेश हे संरक्षण करण्यासाठी भारतातील सर्वात कठीण वन्यजीव अधिवास बनले आहेत.
तणमोर पक्ष्याविषयी
तणमोर ( lesser florican ) हा साधारण कोंबडीएवढा आकाराचा छोटा पक्षी आहे. त्याचा आकार 45 सेंमी आहे. तणमोराचे नर आणि मादी हे दिसायला सारखेच मातकट रंगाचे त्यावर तुटक काळ्या रेषा असलेले असतात. मात्र, विणीच्या हंगामात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजूने एक तुरा येतो. तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. या पक्ष्याचे शेपूट आखूड असते. पावसाळी हंगामात या पक्ष्यांच्या विणीचा काळ असतो. या काळात नर हा मादीला रिझवण्यासाठी साधारण चार फुटांच्या उड्या मारतो. याच वेळी तणमोराचे ( lesser florican ) नर दृष्टिपथात येतात. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसल्याने तो जमिनीवर घरटे बांधतो आणि त्यामध्ये साधारण दोन ते चार अंडी घालतो. गवताळ माळराने, सोबत कोरडवाहू शेती यासारख्या अधिवासांमध्ये हा पक्षी राहतो. अत्यंत सावध, लाजाळू असल्याने क्वचितच दिसतो.
गवताळ प्रदेश म्हणजे ?
पृथ्वीवर हवामानाप्रमाणे गवताळ प्रदेशाचे दोन प्रकार आढळतात. एक म्हणजे उष्ण कटिबंधातील आणि दुसरे म्हणजे समशीतोष्ण कटिबंधामधील. पृथ्वीच्या एकूण भूपृष्ठापैकी साधारण 25 टक्के भूपृष्ठ हे गवताळ जमिनीने व्यापलेले आहे. पृथ्वीवरील उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधामधील भागात साधारण 500 ते 1,300 मिमी दरम्यान पाऊस पडतो. या पावसामुळे सच्छिद्र जमिनीवर गवताळ प्रदेशांची निर्मिती होती. पर्जन्यामुळे निर्माण होणारे वन आणि वैराण प्रदेशादरम्यान गवताळ प्रदेश असतात. भारतासारख्या मोसमी पावसाच्या हवामानात नैसर्गिक गवताळ प्रदेश फार कमी प्रमाणात आढळतात. मात्र, भारतामध्ये हवामान आणि मृदा यांमधील भिन्नतेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गवताळ भूमी परिसंस्था आहेत. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाबरोबर गवताला फूट येते. उन्हाळ्यातील शुष्क काळात गवत वाळून जाते. त्यामुळे गवताळ प्रदेशाचे स्वरूप हंगामी असते. भारतात पाळीव गुरांना खाद्य म्हणून ग्रामीण भागांमध्ये चराऊ कुरणे आणि गायरान राखण्याची पद्धत आहे. बर्याचशा गवताळ प्रदेशांचा उपयोग पाळीव पाण्यांसाठी चराऊ कुरण म्हणून केला जातो.
तणमोरांचे सर्वेक्षण
1980 आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) आणि नंतर ’सलीम अली पक्षीशास्त्र व प्रकृती विज्ञान केंद्रा’ने (सेकॉन) तणमोरांच्या संख्येचे व्यापक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार 1982 मध्ये तणमोरांच्या नरांची अंदाजित संख्या 2,187 होती. जी 1989 साली 60 टक्क्यांनी घसरुन 836 नर तणमोरांवर आली. 1994 मध्ये ती 1,103 होती आणि 1999 साली त्यामध्ये 32 टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या 1,765 झाली. 2010 मध्ये जीवशास्त्रज्ञांनी सर्वेक्षण करताना 1999 चे सर्वेक्षण लक्षात घेऊन 3,530 नर तणमोर असल्याचा अंदाज लावला होता. तेव्हा प्रत्यक्षात 1,246 नर तणमोर नोंदवले गेले. त्यानंतर 2014-15 मधील सर्वेक्षणात अंदाजे 1,091 नर तणमोर पक्षी नोंदवण्यात आले. 2017 मध्ये ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’, ‘द कॉर्बेट फाऊंडेशन’, राज्य वन विभाग यांच्या सहभागाने ’भारतीय वन्यजीव संस्थे’ने (डब्ल्यूआयआय) तणमोरांचे मोठे सर्वेक्षण केले. ज्यामध्ये नर तणमोरांची संख्या 300 ते 700 दरम्यान नोंदवण्यात आल्याचे म्हटले आहे.
तणमोरांचे अधिवास क्षेत्र
तणमोर ( lesser florican ) हा भारतीय उपखंडात प्रदेशनिष्ठ असणारा पक्षी आहे. नेपाळच्या तराई प्रदेशात हे पक्षी एकेकाळी विपुल प्रमाणात होते. परंतु, आता या भागात ते फार क्वचितच आढळतात. तसेच तणमोरांना पाकिस्तानमध्ये देखील पाहिले गेले आहे आणि बांगलादेशामधूनही त्यांच्या नोंदी आहेत. ’बीएनएचएस’च्या जून 2020 साली प्रकाशित झालेल्या अहवालानुसार गुजरात, दक्षिण-पूर्व राजस्थान, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्हा आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात तणमोर पक्ष्यांचे
( lesser florican ) प्रजनन क्षेत्र सीमित झाले आहे. यामध्ये राजस्थानमधील अजमेर, भीलवाडा, टोंक आणि प्रतापगड जिल्ह्याच्या लगतच्या क्षेत्राचा समावेश आहे. तर गुजरातमधील वेलावदार काळवीट अभयारण्य, भावनगरचा परिसर, सुरेंद्रनगर, अमरेली, राजकोट, जुनागढ येथील काही ठिकाणांचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेशातील सैलाना अभयारण्य, सरदारपूर अभयारण्य, धार, पेटलावाडा, झाबुआ, जिरान, नीमच, आंध्र प्रदेशातील रोलपाडू अभयारण्य, महाराष्ट्रातील अकोला, वाशीम आणि कर्नाटकातील बिदर या प्रदेशांचा समावेश आहे. या प्रदेशातील तणमोरांच्या ( lesser florican ) संख्येतील चढउतार हे थेट पर्जन्यमान आणि प्रजनन हंगामाशी संबंधित आहेत. या प्रदेशांमध्ये तीव्र आणि दीर्घकाळ दुष्काळ पडल्यास तिथून ही प्रजात नामशेष होण्याची शक्यता आहे.
संवर्धनामागील समस्या
’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’कडून राज्यस्थानमधील अजमेर आणि आसपासच्या परिसरात तणमोर पक्ष्यांविषयी आम्ही अभ्यास केला. त्यावेळी स्थानिकांच्या मतांनुसार अजमेर परिसरात 300 तणमोर असण्याचा कयास होता. मात्र, प्रत्यक्ष अभ्यासानंतर याठिकाणी 30 ते 40 नर तणमोर असल्याचे आमच्या लक्षात आले. तणमोर हा पक्षी एकाच परिसरात प्रजनन करतो आणि त्यानंतर हिवाळी स्थलांतर करतो. स्थलांतरानंतर पुन्हा प्रजनन केलेल्या परिसरातच परततो. त्यामुळे त्यांचे अधिवास राखणे आवश्यक आहे. मात्र, अजमेरमधील बरेच गवताळ अधिवास आता शेतीसाठी वापरले जात आहेत. अशा परिस्थितीत तणमोर हे शेतजमिनींमध्येच घरटी बांधत असल्याचे नोंदवण्यात आले आहे. अशावेळी कीटकनाशके, यंत्रसामुग्री आणि भटके कुत्र्यांमुळे तणमोरांना, त्यांच्या अंड्यांना आणि पिल्लांना धोका निर्माण होतो. तसेच गवताळ प्रदेशात वेडीबाबूळसारख्या आक्रमक वनस्पतींची संख्या जोमाने वाढत आहे. गुजरात, राज्यस्थानशिवाय दख्खनच्या पठार प्रदेशात तणमोरांचा कायमस्वरुपी अधिवास असण्याची शक्यता आहे. पण ती संख्या कमी असेल. अशा परिस्थितीत त्यांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन करणे ही समस्या आहे.
- सुजीत नरवडे, शास्त्रज्ञ, बीएनएचएस
महाराष्ट्रामध्ये क्षमता
तणमोरांच्या अधिवासासाठी आवश्यक असणार्या गवताळ प्रदेशांचा मोठ्या प्रमाणात र्हास झाला आहे. वीजवाहक तारांचाही या पक्ष्यांना धोका आहे. हे पक्षी स्थलांतरादरम्यान रात्रीही प्रवास करत असल्याने वीजवाहक तारांमध्ये अडकून त्यांचा मृत्यू होतो. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुसार वीजवाहक तारांवर ’बर्ड डायव्हर्टर’ बसवणे आवश्यक आहे. या आदेशाचे अवलंबन गुजरात, राजस्थानबरोबरीनेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही करणे गरजेचे आहे. कारण, याच राज्यांमध्ये हे पक्षी हिवाळी स्थलांतर करतात. महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात घेतल्यास गेल्या वर्षभरामध्ये राज्यातून तणमोर पक्ष्यांच्या नोंदी समोर आल्या आहेत. राजस्थानमध्ये ’सॅटेलाईट टॅग’ केलेला ’रवी’ नामक नर तणमोर पक्षी औरंगाबादमध्ये स्थलांतरित झाला होता. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्येही एका मादी तणमोर पक्ष्याचे छायाचित्र ’कॅमेरा ट्रॅप’मध्ये कैद झाले होते. याशिवाय सोलापूरमधूनही एक मादी तणमोर पक्ष्याचा बचाव करण्यात आला होता. पूर्वीच्या नोंदीनुसार नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यासह नागपूर, अकोला आणि इतर काही ठिकाणे ही तणमोर पक्ष्यांची मुख्य प्रजनन क्षेत्र होती. सद्यपरिस्थितीत अहमदनगर, सोलापूर, नाशिक, बीड, अकोला, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, पुणे, लातूर, यवतमाळ, वाशीम आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तणमोर पक्ष्याला आवश्यक असणारा गवताळ अधिवास काही प्रमाणात शिल्लक आहे. याठिकाणी तणमोरांचा कायमस्वरुपी अधिवास असण्याची शक्यताही आहे. त्यासाठी या परिसरांमध्ये अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
- केदार गोरे,संचालक, ’दी कॉर्बेट फाऊंडेशन’
लोकसहभागातून संवर्धन महत्त्वाचे
तणमोर पक्ष्याला आवश्यक असणारा राज्यातील गवताळ प्रदेशांचा अधिवास आपण लोकसहभागातून संवर्धित करणे आवश्यक आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात 2 लाख, 49 हजार हेक्टर क्षेत्र असे आहे, जिथे आपण गवताळ प्रदेश तयार करु शकतो. मात्र, वन विभागाच्या वृक्षारोपणाच्या मोहिमांमुळेगवताळ प्रदेश निर्माण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून वन विभागाने जमिनीच्या वापराबाबत काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. कारण, सरसकट वृक्षलागवड विध्वंसक ठरेल. माणूस आणि पाळीव पशू यांना वेगळे करून जंगलांच्या संवर्धनाचे जे ‘मॉडेल’ राबवले गेले, ते जसेच्या तसे गवताळ प्रदेशांच्या बाबतीत राबवून चालणार नाही. गवताळ प्रदेशांमध्ये नियंत्रित स्वरुपात पाळीव पशूंचा आणि माणसांचा वावरा असावा. गवताळ भागाचे व्यवस्थापन करताना त्याठिकाणी मर्यादित स्वरुपात चराई होत राहील आणि शेण पडून गवतांचे पुनरुज्जीवन होणे राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच नियंत्रित स्वरुपाची चारा कापणीही गरजेची आहे. तणमोरांची प्रजात कशी वाढवायची, याचे ज्ञान स्थानिक लोकांकडे निश्चितपणे आहे. त्यासाठी वन विभाग, स्थानिक संस्था, संशोधक मंडळी आणि स्थानिक लोकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. आज फासेपारधी समाजातले अनेक ज्ञानी लोक तणमोराबद्दल खात्रीलायकपणे सांगू शकतात. त्यांच्याकडून माहिती मिळवून तणमोरांचा अधिवास निर्माण करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये आम्ही काही भागांत शेतजमीन भाड्याने घेऊन तिथे तणमोरांचा अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आलाय.
- कौस्तुभ पांढरीपांडे, कार्यकर्ते, संवेदना संस्था