महाराष्ट्राला वनसंपत्तीप्रमाणेच सागरीसंपत्तीही लाभली आहे. राज्याच्या किनारपट्टीभागात वेगवेगळ्या स्वरुपाच्या सागरी परिसंस्था आपल्याला पाहायला मिळतात. याच परिसंस्थेमधील एक परिसंस्था म्हणजे ‘खाडी’. कोकण किनारपट्टीला जैवविविधतेने संपन्न अशा अनेक खाड्या लाभल्या आहेत. त्यापैकी दाभोळ आणि आंजर्ले खाडीची ओळख करुन देणारा हा लेख...
रत्नागिरी (क्रांती मिंडे) - कोकण भूमी ही अपार निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. त्याच सौंदर्याचा एक अविभाज्य घटक म्हणजे खाडी. आता खाडी म्हणजे काय? खाडी म्हणजे समुद्र आणि नदी यांचा संगम होऊन मिश्रित होणार्या पाण्याने तयार होणारा भाग. महाराष्ट्र राज्याला लाभलेली किनारपट्टी 720 किमी एवढी आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्र राज्यांतील किनारपट्टीचे जिल्हे. यातील रत्नागिरी या जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या खाड्या म्हणजे ‘दाभोळ’ आणि ‘आंजर्ले.’ दाभोळ खाडीची लांबी 70 किलोमीटर इतकी असून ही खाडी दापोली, चिपळूण, खेड, गुहागर या तालुक्यांमधून वाहते आणि पुढे या खाडीचा वाशिष्ठी नदी सोबत संगम होतो. वाशिष्ठी ही तिवरे गावातून 900 मी. इतक्या उंचावरून वाहते आणि दाभोळ खाडीत समाविष्ट होते. दाभोळ खाडी विस्ताराने खूप मोठी आहे आणि तिच्या विस्ताराइतकीच तिची जैवविधतासुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. आंजर्ले खाडीची लांबी ही सात किमी इतकी असून या खाडीला एक ते दीड किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. पण त्यामानाने आंजर्ले खाडी विस्ताराने लहान आहे. मात्र, जैवविविधता जास्त प्रमाणात आढळते. या खाडीचा दक्षिणेचा भाग हा अरुंद होत खडकाळ भागाकडे वळला आहे, तर उत्तरेकडील भाग हा समुद्रकिनार्याकडे वळला आहे. त्यामुळे तिथे कमी प्रमाणात दलदल पाहायला मिळते. या दोन्ही खाडीच्या किनार्याला दलदलीच्या ठिकाणी काही झाडे वाढलेली दिसतात. अशा झाडांना किंवा वनस्पतींना कांदळवने अथवा खारफुटीची जंगले असे म्हणतात.
नदी आणि समुद्राचे पाणी जिथे एकत्रित येऊन क्षारमिश्रित माती आणि पाणी तयार होते तिथे कांदळवनांची झाडे वाढतात. अशा ठिकाणी एक वेगळीच परिसंस्था तयार होते. याच परिसंस्थेला कांदळवन परिसंस्था असे म्हणतात. दाभोळची खाडी ही कांदळवनाच्या प्रजातींसाठी सर्वात श्रीमंत खाडी म्हणून ओळखली जाते. त्याचे कारण म्हणजे तिथे आढळणार्या कांदळवनाच्या प्रजाती. जवळपास 45 किमी एवढा खाडीचा काठ हा कांदळवन प्रजातींनी बहरला आहे. दाभोळ खाडीअंतर्गत येणारी गावे जसे की, नवसे, ओणी, भाटी, उसगाव, साखरी, कारूळ, उंबरघर, भोपण, पेवे, पांगारी, वडद आणि भडवळे येथे कांदळवनांची 10 ते 15 मी. उंच अशी दाट वृक्ष पाहायला मिळतात. जसे की, तीवर, पांढरी चिपी, कांदळ, मिरची, झुंबर. साधरणत: कांदळ आणि पांढरी चिपी या झाडांची उंची ही सात-आठ मी. इतकी असते. परंतु, पांगारी, साखरी आणि वडद, भडवळे ही गावांमध्ये दहा ते 12 मीपर्यंत उंचीची झाडे पाहायला मिळतात. या भागात सामान्यपणे सर्वत्र आढळणार्या कांदळवन प्रजाती म्हणजे पांढरी चिपी आणि तीवर.
दाभोळ खाडीच्या तुलनेत आंजर्ले खाडीने व्याप्त केलेल्या भागात कमी प्रमाणात कांदळवने आढळून येतात. येथे आढळणार्या कांदळवन प्रजाती जसे की तीवर, कांदळ, झुंबर, मिरची (सुगंधा) आणि पांढरी चिपी आणि इतर सहयोगी प्रजाती. या खाडीमध्ये पांढरी चिपी सर्वत्र पाहावयास मिळते. दाभोळ खाडीमध्ये प्रामुख्याने आढळणारा पक्षी म्हणजे समुद्री काळा बगळा म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला ’थशीींशीप ीशशष हशीेप’ म्हणतात. ढोर बगळा, राखी बगळा, खरबा बगळा, मध्यम बगळा, कवड्या खंड्या असे अनेक पक्षी या भागात सापडतात. पण कुरव पक्ष्याने या खाडीमध्ये कधी दर्शन दिले नाही. परंतु, काही गोष्टी लक्षात घेता समुद्री काळा बगळा हा पक्षी आंजर्ले भागात सापडत नाही. परंतु, कुरव पक्षी हे मोठ्या प्रमाणात आढळून येतात, तर हा बदल तेथील जैवविविधता आणि वातावरणामुळे आहे.
दाभोळ खाडी लगत राहणारे लोक हे भोई, खारवी, कोळी समाजाचे आहेत. या लोकांचे प्रमुख व्यवसाय हा मासेमारी. त्यामुळे हे लोक संपूर्णपणे खाडी वर अवलंबून आहेत. खाडीमध्ये कांदळवनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे या खाडीमध्ये भरपूर प्रमाणात मासेमारी होत असे आणि लोकांचा व्यवसाय हा अगदी पुरेसा होत असे. परंतु, आता पहिले तर कुठे तरी हे चित्र विस्कटल्यासारखे दिसते आहे. कोळी बांधवांच्या व्यवसायाला कुठेतरी पूर्णविराम लागत आहे. त्याचे कारण म्हणजे पर्यावरणमध्ये विकासकामाच्या बहाण्याने तोडली जाणारी खाडी लगतची झाडे, खाडीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी. आंजर्ले खाडीमध्ये या उलट परिस्थिती आहे. याठिकाणी मासेमारी ही भरपूर प्रमाणात सुरू आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या खाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे दूषित कारखान्याचे पाणी सोडले जात नाही. खाडीलगत राहणारे कोळी, खारवी समाजाचे लोक हे अजूनही त्यांच्या पारंपरिक व्यवसायाशी जोडून आहेत. कांदळवनाची जैवविविधता जरी कमी असली, तरी अनेक बाकी गोष्टींमुळे तेथील लोकांना रोजगार हा मिळतो. आडे आणि मुर्डी गावाला धरून आंजर्ले खाडीवर जो पूल बांधला आहे त्यामुळे लोकांना प्रवास करणे सोयीस्कर झाले आहे. आंजर्ले हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात निसर्गाशी निगडित अनेक कार्यक्रम राबवले जातात. जसे की, खेकडे पालन, मत्स्यपालन, शोभिवंत मस्त्यपालन आणि निसर्ग पर्यटन. आंजर्ले किनार्यावर साजरा होणारा कासव महोत्सवसुद्धा खाडीच्या पर्यटनात भर घालतो आणि अशा पर्यटनामधून मिळणारी मिळकत ही स्थानिक लोकांच्या उदरनिर्वाहाला हातभार लावते. असे अनेक प्रकल्प वन विभागाच्या ’कांदळवन कक्षा’मार्फत राबवले जात आहेत आणि तेथील लोकांना त्याचा पुरेपूर फायदासुद्धा होत आहे.
गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे निसर्गामध्ये सर्वांना पोसण्याची क्षमता आहे. कांदळवने संरक्षित आणि संवर्धन करून आपण निसर्गसंवर्धनाला हातभार लावू शकतो. आपण खाडीला आणि खाडी लगत असणार्या सजीव सृष्टीला वाचवू शकतो. प्रत्येकाला कांदळवनाचे महत्त्व हे माहिती असणे गरजेचे आहे. कांदळवनाचे संवर्धन आणि संरक्षणसाठी वन विभागाअंतर्गत कांदळवन कक्ष काम करत आहे. खाडी लगतच्या गावामध्ये जाऊन तेथील लोकांना कांदळवनाचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य करत आहेत.
(लेखिका ’कांदळवन कक्षा’च्या ’कांदळवन प्रतिष्ठान’मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात प्रकल्प समन्वयक म्हणून काम करत आहेत.)