अमेरिकेशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपला दुसरा ‘रोबोट रणगाडा’ (युजीव्ही) ‘मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल’ जगासमोर आणला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘युजीव्ही रणगाडा’ १०० किमीपर्यंत मानवी मदतीशिवाय गस्त घालत आहे. इतकेच नव्हे, तर ‘युजीव्ही रणगाडा’ आपल्याबरोबर ‘स्वार्म ड्रोन्स’चे संपूर्ण सैन्य घेऊन चालत आहे. अशा परिस्थितीत रशियाचे नवे हत्यार पापणी लवते न लवते तोच कोणताही सैनिकी तळ उद्ध्वस्त करु शकतो. ‘युरन-९’ नंतर ‘युजीव्ही’ रशियाचा दुसरा रोबोट रणगाडा आहे.
सध्या या रणगाड्यांचे परीक्षण सुरू असून लवकरच त्याला रशियन सैन्यात सामील केले जाऊ शकते. ‘मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल’ला रशियाची हत्यार निर्मिती कंपनी ‘फाऊंडेशन फॉर अॅडव्हान्स्ड स्टडीज’ने विकसित केले आहे. रणगाड्यात ७.६२ मिमीची मशीन गन लावलेली असून त्यातून प्रत्येक मिनिटाला शेकडोवेळा गोळ्यांच्या फैरी झाडता येतील. याव्यतिरिक्त या रोबोट रणगाड्यात ‘गाईडेड अॅण्टिटँक मिसाईल्स’नाही तैनात करण्यात आलेले आहे. त्यात लावलेले स्वार्म ड्रोन मिनीटभरात उड्डाण करून गुप्त माहिती गोळा करणे आणि लक्ष्याला उद्ध्वस्त करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.
रोबोट रणगाड्याचे परीक्षण रशियाच्या चेल्याबिंस्क प्रदेशातील डोंगरभागात करण्यात आले आहे. त्यात या रणगाड्याने १०० किमीपर्यंतचे अंतर संपूर्णपणे स्वतंत्ररित्या पूर्ण केले. यादरम्यान कोणत्याही माणसाने रोबोटला बाह्यरित्या सूचना दिली नाही. ‘ऑन रोड’ आणि ‘ऑफ रोड’च्या या ट्रॅकला पूर्ण करण्यात ‘मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल’ला पाच तासांचा वेळ लागला. रोबोट रणगाड्याच्या संचालकाला केवळ प्रारंभ आणि समाप्तीच्या टप्प्याची निवड करण्याची आवश्यकता असते. त्यानंतर हा रोबोट रणगाडा कॅमेरा आणि अन्य सेन्सर्सचा वापर करत स्वतःच आपला रस्ता शोधत पुढे जात राहतो. महत्त्वाचे म्हणजे हा रणगाडा सर्वाधिक जवळचा रस्ता निवडून रस्त्यात येणार्या अडथळ्यांपासूनही स्वतःचा बचाव करतो. अलग-अलग परीक्षणांत ‘मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल’ला स्वॉर्म ड्रोननेही सज्ज केले गेले होते. २०१९च्या एका चित्रफितीत या रणगाड्याला १५ ड्रोन्सच्या एका समूहासोबत काम करताना दाखवण्यात आले होते. यावेळी रणगाड्याने पाच-पाचच्या तीन तुकड्यांत ड्रोन्सचे उड्डाण घडवत आपली ताकदही दाखवली होती. दरम्यान, रशियाला दीर्घ काळापासून अशाप्रकारच्या हत्याराची आवश्यकता होती, जे शत्रूप्रदेशात आतपर्यंत घुसून ‘स्वार्म ड्रोन’चे उड्डाण करू शकेल. ‘युजीव्ही’मुळे रशियाची ती गरज भागताना दिसते.
अनेक ड्रोन एकाचवेळी एकत्रितपणे एखाद्या मिशनची पूर्ती करतात त्यावेळी त्या प्रणालीला ‘ड्रोन स्वॉर्मिंग’ अथवा ‘स्वार्म ड्रोन’ तंत्रज्ञान म्हणतात. यात एक ‘मदर ड्रोन’ असते, त्यातून अनेकानेक छोटे-छोटे ड्रोन बाहेर पडतात व ते अलग अलग ठिकाणांवर हल्ला करण्यात सक्षम असतात. अधिक संख्येमुळे शत्रूच्या ‘अॅण्टी एअरक्राफ्ट गन’ वा ‘मिसाईल्स’देखील त्यांच्यासमोर निष्प्रभावी ठरतात. हे नवे तंत्रज्ञान भविष्यात युद्धाचे संपूर्ण चित्रच बदलण्याची क्षमता राखून आहे. हे तंत्रज्ञान ‘नो कॉन्टॅक्ट वॉरफेअर’ म्हणजेच मानवी संपर्काशिवायच्या युद्धात अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. ‘स्वार्म ड्रोन’ शत्रूच्या प्रदेशात मोठा विद्ध्वंस घडवण्यात सक्षम असतात. कमी खर्च, वजनाने हलके आणि ‘हाय टेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाने सज्ज ड्रोन कोणत्याही लक्ष्याला उद्ध्वस्त करण्यास सक्षम असतात. ‘स्वार्म ड्रोन’ शत्रूप्रदेशात सक्रिय ‘एअर डिफेन्स सिस्टीम’ आणि रडारला चकवण्यातही सक्षम असतात. छोट्या आकारामुळे रडारही या ड्रोन्सना पकडण्यात अपयशी ठरते. रशियन माध्यमांनुसार, ‘युरन-९’ स्वतःच्या कॅमेरा व ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या मदतीने लक्ष्याचा पाठलाग करू शकतो, पण त्याला हल्ला करण्याचा आदेश रणगाड्यापासून तीन किमी अंतरावरील ‘गनर’ देतो. हा रणगाडा संपूर्मपणे रिमोटने नियंत्रित केला जातो. त्यात एक ३० मिमींची ‘ऑटोमॅटिक’ बंदूक, ‘अताका अॅण्टिटॅँक मिसाईल’ आणि ‘स्मेल फ्लेमेथ्रो’सारखी हत्यारे सज्ज असतात. दरम्यान, रशियाने काही महिन्यांपूर्वीच आपल्या ‘टी-१४ आर्मटा टँक’च्या रिमोट कंट्रोल आवृत्तीचे परीक्षण केले होते. त्यावेळी या रणगाड्याने ‘क्रू मेंबर्स’शिवाय रिमोटद्वारे आपल्या लक्ष्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला होता. ‘मॉर्कर अनमॅन्ड ग्राऊंड व्हेईकल’ मात्र त्यापुढचे तंत्रज्ञान आहे व याने युद्धाचा चेहरामोहराच बदलू शकतो.