मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी इंग्लंड विरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला. यावर ओव्हल मिळवलेल्या या विजयाचा एकीकडे जल्लोष सुरु असतानाच दुसरीकडे बीसीसीआय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सामन्याच्या छोट्या दिवशी रवी शास्त्री हे कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. याचे कारण म्हणजे मागील आठवड्यात रवी शास्त्री आणि विराट कोहलीने इंग्लंडमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कदाचित, याचमुळे रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली हे टिम इंडियाच्या काही सदस्यांसह एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास गेले होते. या गर्दीच्या ठिकाणी ते दोघेही व्यासपिठावर गेले होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून मंजुरीही घेण्यात आली नव्हती. भारतीय संघ जेव्हा या कार्यक्रमात पोहचला, तेव्हा संपूर्ण हॉल भरला होता. या निष्काळजीपणामुळे बीसीसीआय संतापले असल्याची माहिती देण्यात येत आहे.
ब्रिटिश माध्यमांनी सांगितलेल्या माहितीनुसार, खेळाडूंनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून परवानगी घेतली नव्हती. एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की, बीसीसीआय या प्रकरणाबाबत ईसीबीच्या संपर्कात आहे आणि कोणत्याही अडचणीशिवाय मालिका पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या घटनेनंतर आता इंग्लंड आणि भारतीय संघाला मँचेस्टरमध्ये कडक नियमांना सामोरे जावे लागणार आहे.