अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघारीपूर्वी आपली बरीचशी शस्त्रास्त्रे जरी नष्ट केली असली, खराब केली असली तरी तालिबान्यांच्या हाती बर्यापैकी अफगाण सैन्यासाठीचा राखीव शस्त्रसाठी, वाहने हाती लागली आहेत. तेव्हा, आगामी काळात या अमेरिकी शस्त्रास्त्रांचा वापर तालिबान करु शकतो? ही शस्त्रास्त्रे तालिबानसाठी आयते कोलीत ठरतील का, याचे विविध पैलूंनी केलेले हे विश्लेषण...
तालिबानच्या ताब्यातील अमेरिकन शस्त्रांमुळे जगाला किती धोका?
अफगाणी सुरक्षादलावर अमेरिकेने गेल्या २० वर्षांत तब्बल ८३ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च केले आहेत. पण, एवढे अब्जावधी खर्च करुनही पळ काढणार्या अमेरिकी/अफगाणी सैन्याने मागे सोडलेली ‘युएस एमव्ही’सारखी दोन हजार चिलखती वाहने, ‘युएच-६० ब्लॅक हॉक’, ‘स्काऊट अॅटॅक हेलिकॉप्टर्स’समवेत २०८ लढाऊ विमाने, ‘स्कॅन इगल मिलिट्री ड्रोन’, १६ हजार ‘नाईट व्हिजन गॉगल्स’सारखी अन्य उपकरणे, एक लाख ६२ हजार कम्युनिकेशनशी संबंधित उपकरणे, ‘एम-१६ असॉल्ट रायफल’, ‘मोर्टार’, ‘हॉवित्झर’ तोफांसारखी सहा लाख इन्फन्ट्री शस्त्रांचा यात समावेश आहे. पण, सध्या हाच प्रश्न उपस्थित होतो की, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सोडलेल्या या शस्त्रांमुळे जगाला, भारताला किती धोका आहे?अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने मागे सोडलेल्या शस्त्रांची किंमत एकूण किंमत ही जवळपास ९२ अब्ज कोटींच्या घरात आहे. २००२ सालापासून अफगाणिस्तान सैन्याला अमेरिकेने तालिबान विरुद्ध लढण्यासाठी दिलेल्या शस्त्रांचाही यामध्ये समावेश आहे.
मागील २० वर्षे या शस्त्रांचा वापर झाल्यामुळे त्यांची किंमत कमी झाली आहे, आयुष्यही कमी झाले आहे आणि क्षमतासुद्धा संपल्यात जमा आहे. एवढेच नव्हे, तर मोठी शस्त्रे म्हणजे लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, रणगाडे, चिलखती वाहने यामध्ये वापरल्या जाणार्या सॉफ्टवेअरना अमेरिकेने अफगाणिस्तानातून निघण्यापूर्वी डिसेबल केल्याने त्यांची उपयोगिता शून्यात जमा आहे.
यामध्ये ९० टक्के शस्त्रं अशी आहेत की, जी पारंपरिक लढाईकरता किंवा आकाशातून हल्ले करण्याकरता वापरात होती. त्यांचा वापर करण्याकरता पुष्कळ कौशल्याची गरज आहे, जे तालिबानकडे नाही. आलेल्या बातम्यांप्रमाणे अनेक हेलिकॉप्टर्स आणि विमाने घेऊन अफगाणिस्तान सैन्याचे वैमानिक वेगवेगळ्या देशात आधीच पळून गेले आहेत. त्यामुळे तालिबानी शस्त्रे वापरण्याची क्षमता ही पुष्कळच कमी झाली आहे.
मात्र, काही शस्त्रे दहशतवादी वापरू शकतात.शस्त्रांचा वापर अफगाणिस्तानातील अंतर्गत शत्रूंविरुद्धपुढील अनेक महिने तालिबानचे लक्ष अफगाणिस्तानवरील आपले राज्य मजबूत करण्यावरच असणार आहे. कारण, आजही अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या टोळ्यांचे वेगवेगळ्या भागांमध्ये राज्य असते. उदाहरणार्थ पाकिस्तान समर्थित हक्कानी गट तालिबानचे अजूनही ऐकायला तयार नाही. पंजशीर खोर्यामध्ये अहमद मसूद तालिबानी विरोधकांना एकत्रित करून लढा देत आहे.याशिवाय तालिबानला त्यांची पाकिस्तानला लागलेली सीमा सुरक्षित करावी लागेल. यानंतर इराण आणि इतर देशांना लागलेली सीमादेखील पुन्हा एकदा सुरक्षित करावी लागेल. कारण, हजारो-लाखोंच्या संख्येने सामान्य नागरिक देशाच्या बाहेर पळत आहेत.
याशिवाय अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ‘इसिस’चा खोरासान दहशतवादी गट, ‘अल कायदा’ आणि इतर अनेक दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमध्ये आपली ताकद आणि प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अमेरिकेकडून मिळालेली आधुनिक शस्त्रास्त्रे अफगाणिस्तानचे दहशतवादी गट एकमेकांविरुद्ध वापरतील आणि आंतरराष्ट्रीय सीमांवरून होणारी घुसखोरी थांबवण्याकरिताही त्यांचा प्रामुख्याने वापर होऊ शकतो.काही शस्त्रे (स्मॉल आर्म्स) ही दहशतवादी गटाकडून वापरली जाऊ शकतात. अनेक तालिबानी अमेरिकेची अत्याधुनिक रायफल्स हातात घेऊन फिरतानाचे दृश्यही कॅमेर्यात कैद झाले होते. परंतु, या रायफल्सकरिता लागणारे बारूद कुठे आहे? विविध प्रकारच्या चिलखती गाड्यांची देखभाल-दुरुस्ती फारच खर्चिक आहे. ते करायची क्षमता तालिबान/अफगाणिस्तानच्या सैन्याची नाही.
हे करण्याकरिता पाकिस्तान किंवा चीनकडूनच तालिबानला मदत घेता येईल. त्यातही चीन शस्त्रांची दुरुस्ती वगैरे करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करु शकतो. काही खासगी कंत्राटदार जे या शस्त्रांची देखभाल करत होते, त्यांचादेखील वापर केला जाऊ शकतो. परंतु, त्यामुळे या कंत्राटदारांना पैसे कमावण्याची आयती संधी मिळेल. लक्षात असावे की, अमेरिकेची शस्त्रे ही जगातील सर्वात महागडी शस्त्रे समजली जातात.
शस्त्रे पाकिस्तानकडे जाऊ शकतात का?
अर्थातच! ही शक्यता नक्कीच आहे. परंतु, आधी म्हटल्याप्रमाणे बहुतेक शस्त्रे ही पारंपरिक लढाईकरिता आहेत आणि पाकिस्तानची भारताबरोबर पारंपरिक लढाई करण्याची हिंमत नाही. तसेच या शस्त्रांचे फार कमी आयुष्य शिल्लक आहे आणि जर ही शस्त्रे पाकिस्तानकडे गेली, तर त्यावरही अमेरिकेचे लक्ष असेल. पण, तालिबानला यापैकी काहीएक करायचे असेल, तरी त्यांना हे अतिशय गुप्तपणे करावे लागेल आणि त्यासाठी खर्चही खूप लागेल आणि त्यातून फार काही निष्पन्न होण्याची शक्यताही अगदीच धुसरच.अमेरिकन सैन्याच्या रायफली आणि रात्रीच्या वेळेला बघण्याच्या दुर्बिणी पाकिस्तानी दहशतवादी भारताच्या विरोधात वापरू शकतात का? तर याचे उत्तर आहे, नक्कीच हे केले जाऊ शकते.
परंतु, त्यांना लागणार्या दारूगोळ्याचे काय आणि त्यांची देखभाल कशी केले जाईल? दहशतवादी गट ‘एके ४७ रायफल्स’ वापरतात. कारण, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च फारच कमी असतो आणि अतिथंड डोंगराळ भागातसुद्धा त्यांचा योग्यरित्या वापर करता येतो. हे अमेरिकन शस्त्रांच्या बाबतीत तितकेसे शक्य नाही.याशिवाय ‘स्मॉल आर्म्स’ दहशतवाद्यांना कधीच कमी पडलेली नव्हती, त्यामुळे त्यांना सवय असलेली शस्त्रे ‘एके ४७ रायफल्स’ यापुढेही वापरली जाण्याची शक्यताच जास्त आहे.
शस्त्रे चीनकडे जाऊ शकतात का?अमेरिकन शस्त्रांचा वापर चीन ‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ करून त्यांचे मॉडेल आणि डिझाईन हे चिनी सैन्याची क्षमता वाढवण्याकरिता करू शकतो का? ही शक्यता नक्कीच आहे.
परंतु, सध्या चिनी शस्त्रे ही बहुतांश रशियन बनावटीची आहेत. जर आता अमेरिकन डिझाईन कॉपी करायला सुरुवात केली, तर त्याचा खर्च वाढू शकतो. याशिवाय चीनने जगात जवळपास प्रत्येक देशात प्रचंड चोरी केली आहे. असे कुठलेच शस्त्र नाही की, ज्याचे डिझाईन चीनला माहिती नाही. आजकाल गुप्त असते ते या शस्त्रांकरिता वापरले जाणारे सॉफ्टवेअर.आगामी काळात तालिबानचे लक्ष राज्यकारभाराकडेसध्या अफगाणिस्तानमध्ये अन्न, धान्य, खाद्यसामग्रीची खूप मोठी टंचाई आहे. तालिबानचे दहशतवादीसुद्धा केवळ नुसती नान खाऊन जीवंत आहेत. कारण, त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांचे नेतेसुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. सगळ्या जगाचे लक्ष त्यांच्यावर असल्यामुळे ते कुठेही लुटालूट करू शकत नाहीत.
त्यामुळे तालिबान्यांचे हात सध्यातरी काहीसे बांधले गेले आहेत. आज अफगाणिस्तानमध्ये लाखो नागरिक निर्वासित ठरले आहेत. त्यांचे पुनर्वसन कसे करायचे, हाही तालिबानसमोर येत्या काळात प्रश्न असेल.तसेच ज्या थोड्या-फार गाड्या तालिबान सध्या वापरत आहे, त्या कमी पेट्रोल किंवा डिझेल खातात. कारण, अफगाणिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल तसेच इतर इंधनाचीसुद्धा कमी आहे. त्यामुळे आगामी काळात तालिबानचे लक्ष हे राज्यकारभार चालवणे आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, यावर केंद्रीत असेल.नोव्हेंबर महिन्यापासून बर्फवृष्टीला सुरुवात होईल आणि अफगाणिस्तानच्या जनतेची काळजी घेण्याइतकी तालिबानची क्षमता नाही. त्याकरिता त्यांना जागतिक मदतीवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे आगामी काळात तालिबानचे लक्ष हे राज्यकारभाराकडे अधिक असेल आणि अमेरिकन शस्त्रांचा वापर करण्यावर फारसे नसेल, असा एक अंदाज वर्तविला जात आहे.
अशा विविध कारणांमुळे तालिबानकडून शस्त्रांचा गैरवापर भारताविरुद्ध केला जाण्याची शक्यता सध्यातरी कमीच आहे. परंतु, भविष्यात तालिबानी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, ‘एलओसी’वर भारतीय सैन्याची तैनाती जबरदस्त आहे आणि ती सुरक्षा भेदून भारतात शिरणे अतिशय कठीण आहे. याशिवाय जी थोडीफार घुसखोरी होते, त्याला दहशतवादविरोधी अभियान राबवून कश्मीर खोर्यातच संपवले जाते. अफगाणी तालिबानी याआधीही काश्मीरमध्ये आले आहेत आणि त्यांनी काश्मीरच्या लोकांवर, खासकरुन काश्मिरी महिलांवर केलेल्या अत्याचारामुळे त्यांच्याविरुद्ध आम जनतेमध्ये पुष्कळ रोष आहे. त्यामुळे दहशतवाद वाढवण्याकरिता तालिबान्यांचा वापर शक्य असला, तरी त्यामध्ये त्यांना फारसे यश मिळणार नाही.
कारण, भारतीय सैन्याची त्यांना ठार मारण्याची क्षमता लक्षणीय आहे.अफगाणिस्तानमधील अतिशीत वातावरण आणि अतिदुर्गम भागांमुळे शस्त्रास्त्रांचे आयुष्य हे इतर ठिकाणांपेक्षा नेहमीच कमी असते.याशिवाय आता तिथे कार्यरत वेगवेगळे गट आपली ताकद वाढवण्याकरिता शस्त्रे चोरायचा प्रयत्न करतील. कारण,अफगाणिस्तानमध्ये देशापेक्षा जाती-जमाती आणि टोळ्या या जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळे येणार्या काळामध्ये अमेरिकेची मागे सोडलेली महागडी शस्त्रे ही ‘पांढरा हत्ती’ ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.