होय, या लेखाचा मथळा अगदी योग्य आहे. कारण, ज्या आधुनिक महर्षीने हे दर्शन घडविले, त्यांना खरंच ‘महर्षी’ म्हणावे लागेल. कारण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे मराठी संत परंपरेतील, तसेच विद्ववत परंपरेतील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अनंत महाराज आठवले. त्यासोबतच अनेक ग्रंथांचे लिखाण व या लिखाणाद्वारे ‘आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या उक्तीनुसार सनातन हिंदू धर्म, हिंदुत्व वेगळे नाही हे पुराव्यासहित ठामपणे प्रतिपादित करणारे प्राचार्य अ. दा. आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांच्या समाराधना (पुण्यतिथी) महोत्सवानिमित्त त्यांच्या आणखीन एका अद्वितीय अशा ग्रंथांचे परामर्श करण्याचा अल्पबुद्धीप्रमाणे करण्याच हा प्रयत्न.
ज्या ग्रंथाने बुद्धिवादी, दांभिक विचारवंतांचा बुरखा टराटरा फाडला, तो ग्रंथ म्हणजे ‘महाभारताचे वास्तव दर्शन.’ आक्षेपांच्या संदर्भात हा ग्रंथ वाचल्यानंतर असे वाटते की, पाहिजे तेवढा हा ग्रंथ वाचकांपर्यंत गेला नाही, असे जाणवते आणि हा ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाच्या घरात व तरुणांंच्या वाचनसंग्रही असायलाच हवा, असा हा ग्रंथ. या ग्रंथात नेमके काय ते तर लिहिणारच आहे. पण, या ग्रंथ लिहिण्यामागचा हेतू, या ग्रंथाच्या आधी महाभारतावर कोणी कोणी व काय काय लिहिले, कसे लिहिले हे अगदी थोडक्यात पाहू.
महाभारतावर डॉ. चिं. वि. वैद्य, डॉ. शं. के. पेंडसे, डॉ. भागवत, म. रं. शिरवाडकर, प्रेमा कंटक, आनंद साधले, दाजी पणशीकर, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, तसेच महमहोपाध्य बाळशास्त्री हरदास व लक्ष्मीबाई केळकर यांची व्याख्यानेसुद्धा झाली आहेत. पण, याला काही अपवाद सोडता बाकी सर्वांनी महाभारताच्या उपलब्ध प्रतीचा सोईप्रमाणे तसेच विपर्यास्त अर्थ लावत महाभारतासारख्या ग्रंथास ग्रहण लावण्याचा प्रयत्न लिखाणातून केला व आजही तो थोड्या प्रमाणात चालूच आहे, असे म्हणता येईल. असो. तरीपण अनंत महाराज आठवले यांच्या या ग्रंथाने पाखंड खंडनाचे काम केले. ते करण्यासाठी या ग्रंथातील आठ प्रकरणांपैकी पाच प्रकरणे तसेच आठ परिशिष्ट्ये ही प. पू. अप्पांनी प्रतिवाद करण्यासाठी वापरली आहेत. हा ग्रंथ म्हणजे महाभारताचे मर्म आणि अजिंकत्वाचे तद्ववत सामर्थ्याचे प्रयत्य दाखवणार, तसेच सर्वस्पर्शी लेखनाचा आदर्श वस्तुपाठच आहे, असं म्हणणेच योग्य राहील. या ग्रंथाबद्दल ‘केसरी’चे संपादक व साहित्यिक भा. द. खेर म्हणतात, “या ग्रंथाने महाभारताच्या मारेकर्यांचे तोंड बंद केले आहे. हा ग्रंथ म्हणजे समष्टीधर्माच्या पूर्ततेसाठी लिहिलेला ग्रंथच आहे, असे म्हणावसे वाटते.
कारण, आधुनिक साहित्यिकांनी असत्याचा हात धरत कल्पनाविलास केला. प्राचीन ऐतिहासिक महाकाव्याची मोडतोड करण्यात धन्यता मानली. त्याचे विडंबन व विकृतीकरण करण्यात आनंद मिळवला, तसेच प्राचीन तत्त्वज्ञान, संस्कार, नीतिशास्त्र यांचे बुद्धिभेदाच्या शस्त्राने विकृतीकरण करत पिढ्यान्पिढ्या नासवल्या. याचे एकमेव कारण म्हणजे इंग्रजी राजवटीने आमच्यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांमध्ये प्रज्ञाहतत्त्व निर्माण केले. पण, ज्यांची संस्कृती, परंपरा यावर अगाध श्रद्धा आहे, त्यांना या लेखनात आक्षेपार्ह दिसले. पण, खंडन नाही झाले. ते काम प्रा. अ. दा. आठवले यांनी केले. या ग्रंथावर १९६७-६८ पासून परिश्रमाचे काम चालू होते, तरी १९६४ला डिंगरे यांच्या ‘अर्जुनाचा रथ अखेर श्रीकृष्णाने नरकात नेला’ यावर प्रा. अनंतराव आठवले यांनी ‘अर्जुनाचा रथ नाही, तर लेखकाचा मनोरथ नरकात गेला’ या लेखाने जबरदस्त उत्तर दिले. आधुनिक साहित्यिक विचारवंतांच्या महाभारतासंबंधीचे लिखाणाचे खंडन ‘केसरी’च्या दिवाळी अंकात ‘महाभारताचे मारेकरी’ म्हणून प्रसिद्ध झाले आणि तो खूप गाजला. विशेष बाब म्हणजे, मुंबईच्या ‘लोकशक्ती’मध्ये क्रमाने चार ते पाच लेखासोबत व्यंगचित्राचाही वापर केला गेला. ते व्यंगचित्र शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. एक स्त्रीच्या हातात डांबराचा डब्बा व दुसर्या हातात ब्रश त्या डांबराच्या डब्यावर ‘इरावती ब्रॅण्ड’ या लेखाने खूप जबरदस्त वादळ आणले होते साहित्य विश्वात!
पुढे ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ हा ग्रंथ पुण्याच्या ‘कॉन्टिन्टेल’ने प्रकाशित केला. या ग्रंथात शं. के. पेंडसे, इरावती कर्वे, दुर्ग भागवत, श्रीराम पंडित, भा. वि. भागवत, शिवाजी सावंत, वि. वा. शिरवाडकर, माधव मनोहर, इ. मातब्बरांच्या साहित्याचे खंडन केले. त्यासोबतच या ग्रंथात प्राचार्यांनी प्रास्ताविक स्वरूपात जे लेखन केले, ते म्हणजे लेखकाने व वाचकाने अवश्यवाचावे, म्हणजे नेमकी भूमिका लक्षात येईल. ग्रंथकर्त्याचीही हा ग्रंथ पाहिजे तेवढ्या प्रमाणात तरुण पिढीपर्यंत पोहोचलाच नाही, ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. प्रथम आवृत्ती ही १९७० व दुसरी प्रत निघण्यास १९९३ साल उजाडले. मात्र, तोपर्यंत बराच बदल साहित्यविश्वात झालेला होता. या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन तत्कालीन अ.भा.म.सा. अध्यक्ष व खासदार विद्याधर गोखले यांच्या हस्ते झाले. महाभारताच्या ऐतिहासिक पात्रांचे रेखाटन करताना विद्ववत साहित्यिकांनी अतिशय विकृतपणे आणि प्रसिद्धीच्या मोहात पडून विकृतीकरणाचे एक पर्वच मराठी मुलुखात जोमाने सुरू झाले होते. त्याचा परिपाक म्हणजे या लेखकांनी महाभारतात नसलेले दानशूरत्व कर्णाला देऊन भारतीयांच्या माथी कर्णाचे नसलेले दानशूरत्व कायमचे ठसविले.
या ग्रंथात विशेषतः पंडिता दुर्गाबाई भागवत यांच्या व्यासपर्वातील द्रौपदीबाबतच्या तसेच विविध महाभारतासंबंधीच्या संदर्भांचे कडाडून केलेले खंडन आणि इरावती कर्वे यांच्या ‘युगान्त’मधील भाषासौंदर्याच्या आड लपलेले विषारी कंद कसे आहे, हे उलगडून दाखवले. आनंद साधले व अ. दा. आठवले (प. पू. अप्पा) यांच्यातील पत्रव्यवहार वाचताना या ग्रंथाविषयी अप्पा म्हणतात, “माझे हे पुस्तक मी भोळ्या भाविकतेने लिहिले नाही. रोखठोक तर्कवादाचा पण साधार चिकित्सेचा अवलंब मी येथे केला आहे.”पंडिता दुर्गाबाई भागवत व इरावती कर्वे, आनंद साधले यांच्या ग्रंथातील काही विकृत, तसेच असंवेदनशील व महाभारतात याचा उल्लेखच सापडत नाही, अशी सोईची वाक्य घातली आहेत. ते पाहून
पंडिता दुर्गाबाई भागवत यांची ‘व्यासपर्वा’तील वाक्य-
१) द्रौपदी म्हणजे कामकलिका. तारुण्य तिच्या नसानसातून तेवत होते. एका पुरुषाने तिचे भागले नसते म्हणून तिने पाचांना वरिले.
२) तारुण्य तिच्या नसानसांतून वाहत होते. त्याला योग्य अशा वासनाही तिच्यात तेवत होत्या. व्यास पर्व (पृष्ठ क्र.१२१ व १२२)
३) द्रौपदी आणि कृष्ण किंवा कृष्ण आणि कृष्णा यांच्या नात्यांच्या उगमस्थाबद्दल व्यासाने मुग्धता राखली आहे. (व्यासपर्व पृष्ठ क्र.१२४) वरील वाचले असता ही भाषा कोणालाही न पटणारी तर आहेच; मात्र भाषेतील कुत्सिपणा सहज लक्षात येतो.
इरावती कर्वे यांनी पंडूस नपुंसक ठरविणे, द्रौपदी दुर्योधनावर हसली, वासुदेव पदवीसंबंधी तर्कट आणखीन बर्याच विधानांचे परीक्षण केले आहे. तसेच आनंद साधले व नरहर कुरुंदकर यांच्या विधानांचे केलेले खंडनही अगदी शास्त्रसंमत तर्कावर आधारित आहे. अजूनही महाभारतावर (व्यास) पर्व सारख्या ग्रंथांचे वैचारिक आक्रमण चालूच आहे. खरंच हा ग्रंथ सर्वांनी विशेषतः तरुण अभ्यासकांनी वाचला पाहिजे. आपण म्हणतो ना, प्रत्येक मराठी घरात ‘ज्ञानेश्वरी गाथा’, ‘दासबोध’, ‘गीतारहस्य’ असावे, तसेच आता ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ हाही ग्रंथ हवाच. या ग्रंथाविषयी भाषाप्रभू पु. भा. भावे तसेच वाचकांचा अभिप्राय वाचणे फार वाचनीय आहे. ही शब्दसेवा त्यांच्या चरणी अर्पण.
संदर्भ ग्रंथ :
१) महाभारताचे वास्तव दर्शन : प्रा. आ. दा. आठवले
२) व्यास पर्व : दुर्गा भागवत
३) इरावती कर्वे : युगान्त
४) हा जय नावाचा इतिहास : आनंद साधले
५) व्यासांचे शिल्प : नरहर कुरुंदकर
६) पुरुषार्थ विशेषांक
-योगेश काटे