मुंबई : राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असल्याचे दिसताच आता राज्य सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया सुरु केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवलेली धार्मिकस्थळे येत्या नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र, आरोग्याच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
एकीकडे महाराष्ट्रामध्ये लसीकरणचे प्रमाण वाढले आहे. तर, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्यादेखील कमी होत आहे. अशामध्ये आता मंदिरांची दरवाजे उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून धार्मिकस्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली केल्यानंतर त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर व्हायला हवा. या नियमांचे पालन होते की नाही याची सर्वस्वी जबाबदारी धार्मिकस्थळांच्या व्यवस्थापन समितीवर टाकण्यात आली आहे. त्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
"महाराष्ट्राच्या भाविक भक्तांनी केलेला शंखनाद अखेर मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमलाच! आणि अनेक महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आमच्या लढ्याला यश आलं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला आमच्या आराध्य अशा आदिशक्तीचे दर्शन घेता येणार आहे ही सर्वच भाविक भक्तांसाठी आणि आध्यात्मिक क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. उशिरा का होईना ठाकरे सरकारला सुचलेले हे शहाणपण आहे. क्रम चुकला आधी मदिरा नंतर मंदिर पण आम्ही त्यांना वठणीवर आणलं आणि म्हणून ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आता आतुरता आहे ती ७ तारखेच्या घटस्थापनेची."
- आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजप अध्यात्मिक आघाडी