भारताच्या राजकीय क्षितिजावर दीनदयाळ उपाध्याय यांच्या रूपाने एक नवा तारा उदयास आला होता. पण, दुर्दैवाने अवघ्या ४३ दिवसांतच उपाध्याय यांची हत्या झाली. इतिहासाच्या पानात आजही ती एक गूढ बनून राहिली आहे. आज पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त या एकूणच घटनाक्रमावर प्रकाश टाकणारा हा लेख...
रतात ‘राजकीय हत्या’ म्हटले की, पहिल्यांदा आठवते ती महात्मा गांधींची हत्या, त्यानंतर उल्लेख होतो तो माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ साली झालेली हत्या आणि त्यानंतर त्यांचे पुत्र आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळ दहशतवाद्यांनी केलेली हत्या. कारणे काहीही असोत, या हत्या नेहमीच सार्वजनिक चर्चेत असतात. अर्थातच, त्या हत्यांवर चर्चा सुरू ठेवण्याचे श्रेय काँग्रेस पक्षाला जाते. कारण, गेल्या २० वर्षांत सातत्याने घसरणीला लागलेला हा पक्ष इंदिराजी आणि राजीवजी यांच्या पुण्याईचा वापर वारंवार करत असतो. त्यामुळे या हत्यांचा उल्लेख काँग्रेस पक्षाकडून वारंवार होत असतो. दुसर्या बाजूला, स्वातंत्र्योत्तर काळापासून काँग्रेसच्या राजकारणाला पर्याय देण्याची क्षमता असलेल्या हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे सातत्याने खच्चीकरण केले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून जन्मलेल्या भारतीय जनसंघाच्या दोन अध्यक्षांचा संशयास्पद मृत्यू झाला. पण, त्या मृत्यूंना राजकीय हत्यांचा दर्जा मिळू नये, याची पुरेपूर काळजी संबंधितांनी घेतलेली दिसते, त्यामुळेच ते मृत्यू केवळ संशयास्पद मृत्यू म्हणूनच इतिहासाच्या पानात दबले गेले आहेत.
स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता ज्या व्यक्तींच्या विचारात होती, त्यामध्ये भारतीय जनसंघाचे सहस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते. नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाचा उल्लेख सातत्याने होताना दिसतो. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला ‘एकात्म मानवतावाद’ हाच भाजपच्या आजच्या राजकारणाचा पाया आहे. मोदी सरकार राबवत असलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांचे ‘पं. दीनदयाळ उपाध्याय’ असे नामकरण करण्यात आले आहे. अवघ्या ५२व्या वर्षी हत्या झालेल्या या नेत्याच्या विचारांचा ५० वर्षांनंतर आजही भाजपवर प्रचंड प्रभाव आहे. किंबहुना, त्यांच्या विचारांच्या प्रकाशात आजच्या भाजपची वाटचाल सुरू आहे. महात्मा गांधींचा जसा काँग्रेसच्या विचारांवर प्रभाव होता, तसाच दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा भाजपच्या विचारसरणीवर आहे. अशा या उत्तुंग नेतृत्त्वाची रेल्वेतील भुरट्या चोरांनी हत्या केली, असं त्यावेळी देशाला सांगण्यात आलं. चोरांना विरोध करताना झटापटीत त्यांना चोरट्यांनी रेल्वेबाहेर ढकलून दिले, असे सांगण्यात आले. एका मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा अशा प्रकारे खून होऊ शकतो, यावर उपाध्याय यांना मानणार्यांचा तेव्हाही विश्वास बसलेला नव्हता आणि आजही नाही. जनसंघाचे अध्यक्ष असलेले दीनदयाळ उपाध्याय ११ फेब्रुवारी, १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील मुगलसराई रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर मृतावस्थेत आढळले होते.
दीनदयाळ उपाध्याय यांची डिसेंबर १९६७ मध्ये जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. १० फेब्रुवारी, १९६८ रोजी संध्याकाळी ते लखनौहून ‘सियालदाह एक्सप्रेस’ने पाटण्याला निघाले. ही ट्रेन वाराणसीहून मध्यरात्रीनंतर १.४० वाजता सुटली आणि काशी येथे सुमारे पाच मिनिटे थांबल्यानंतर ती सुमारे २.१० वाजता मुगलसरायमध्ये पोहोचली. पण, त्यावेळी पंडितजी ट्रेनमध्ये नव्हते. दहा मिनिटांनंतर, त्याचा मृतदेह मुगलसराय स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या टोकापासून मागच्या बाजूस बरोबर ७४८ फुटांवर कर्षण खांबाजवळ पडलेला आढळला.त्यांच्याच डब्यातून प्रवास करणार्या एम. पी. सिंह यांनी मुगलसरायमध्ये उपाध्याय यांच्या केबिनमध्ये कोणीतरी प्रवेश करताना पाहिले. ती व्यक्ती फाईल आणि त्यांचा बिछाना चोरून नेत होती, असे न्यायालयात सांगितले. एम. पी. सिंह यांनी या व्यक्तीला न्यायालयात ओळखले, या व्यक्तीचे नाव भरत लाल असे होते. त्याच्यासोबत राम अवध होता. दोघांवर चोरी आणि खुनाचा आरोप ठेवला गेला. पण, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध करण्याइतपत पुरावे ‘सीबीआय’ला जमवता आले नाहीत. त्यामुळे खुनाच्या आरोपातून निर्दोष सोडण्यात आले, तर भरत लाल यास पंडितजींचे सामान चोरल्याप्रकरणी दोषी ठरवून किरकोळ शिक्षा देण्यात आली. या निकालाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. सत्र न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले की, “आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे या हत्येचं नेमकं सत्य काय हा प्रश्न अद्याप कायम आहे.”
तत्कालीन केंद्र सरकारने या हत्येची चौकशी ‘केंद्रीय अन्वेषण ब्युरो’कडे (सीबीआय) सोपवली होती. त्यावेळी, ‘सीबीआय’चे संचालक जॉन लोबो होते. एक कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ते ओळखले जात होते. चौकशीची सूत्रे हाती घेताच ते पथकासह मुगलसरायला पोहोचले. पण, तपास पूर्ण करण्याआधीच त्यांना दिल्लीत परत बोलावण्यात आले. त्यांच्याकडून अचानक तपास काढून घेतल्यामुळे तपासाची दिशा बदलली जात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. नंतर दुसर्या अधिकार्याने हा तपास पूर्ण करून या प्रकरणात कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. ‘सीबीआय’ने आपल्या चौकशी अहवालात हा निष्कर्ष काढला आहे की, ही हत्या भरत लाल आणि राम अवध या भुरट्या चोरांनी क्षुल्लक कारणावरून केली. ते चोरीच्या उद्देशाने तिथे गेले होते. मात्र, विरोध झाल्यानंतर त्यांनी उपाध्याय यांना रेल्वेतून ढकलून दिले. त्यावेळी बाजूच्या खांबाला धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला.हा निकाल मान्य न झाल्याने नानाजी देशमुख आणि दत्तोपंत ठेंगडी या नेत्यांच्या मागणीवरून या हत्येच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या एक सदस्यीय आयोगाची नियुक्ती सरकारने केली. या आयोगाने आपल्या अहवालात काढलेल्या निष्कर्षातून पंडितजींच्या हत्येच्या आणि तपासाच्या स्थितीवर प्रकाश पडतो. मुगलसरायमध्ये जे काही घडले, ते एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा वेगळे नाही. यामध्ये सहभागी लोक या संपूर्ण घटनाक्रमात अनपेक्षितपणे वागले, त्यामुळे अनेकदा संशयाला जागा निर्माण झाल्या. अनेकांची वर्तणूक त्या परिस्थितीत अपेक्षित असलेल्या सामान्य मानवी वर्तनाच्या विरुद्ध होती. मुगलसरायमध्ये घडलेल्या काही घटना या जाणीवपूर्वक घडवून आणलेला बनाव असल्यासारख्या होत्या, असे आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले. त्याच अहवालात न्या. चंद्रचूड यांनी असे म्हटले की, “जेव्हा एखाद्या घटनेत सहभागी व्यक्ती आणि घटनाक्रम याबाबत जाणीवपूर्वक जुळून आलेला खोटेपणा दिसतो, तेव्हा शंका निर्माण होतात.” या प्रकरणात असा एक गोंधळ आणि गुंतागुंत आहे की, जी वास्तविक घटनाक्रम लपवण्याचा प्रयत्न करते. ज्या डब्यातून दीनदयाळ उपाध्याय प्रवास करत होते, त्यातील अर्धा भाग तृतीय श्रेणीचा, तर उर्वरित अर्धा प्रथम श्रेणीचा होता. उपाध्याय प्रथम श्रेणीचा प्रवास करत होते. डब्यात तीन वेगवेळे कंपार्टमेंट होते. उपाध्याय यांचे तिकीट ‘ए’ कंपार्टमेंटचे होते. तिथे फक्त दोनच बर्थ होते, तर ‘बी’ आणि ‘सी’मध्ये प्रत्येकी चार बर्थ होते. ‘सीबीआय’ने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार उपाध्याय यांनी ‘बी’ कंपार्टमेंटमध्ये उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य गौरी शंकर राय यांच्यासोबत आपल्या जागेची अदलाबदल केली होती. ‘ए’ कंपार्टमेंटमध्ये एम. पी. सिंह नावाचे एक सरकारी अधिकारी प्रवास करत होते.
मेजर एस. एल. शर्मा यांच्या नावाने ‘सी’ कंपार्टमेंटसाठी आरक्षण होते. पण, ते त्यादिवशी या कंपार्टमेंटमध्ये आलेच नाहीत, तर त्यांनी त्या दिवशी रेल्वेच्या सर्व्हिस कोचमधून प्रवास केला. या संपूर्ण घटनाक्रमाची संगती लावण्याचा प्रयत्न केला असता, या घटना एखाद्या थरारक बॉण्डपटापेक्षा जराही कमी नाहीत. मेजर एस. एल. शर्मा यांचे नाव चुकीचे लिहिले गेले. एकदा नाही तर दोनदा चुकीचे लिहिले गेले होते. इतकेच नाही, तर त्यांच्या तिकिटावरही चुकीचे नाव लिहिले गेले होते. आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शर्मा यांचे लग्न अलीकडेच झालेलं असतानाही त्यांनी आपल्या प्रवासाची तारीख आधीच बदलली होती. एम. पी. सिंह यांच्या सोबत प्रवास करणार्या व्यक्तीने आणि ट्रेनचा कंडक्टर बी. डी. कमाल यांनी दिलेली परस्पर विरोधी साक्ष, मृतदेहाची ठेवलेली स्थिती बदलणे, उपाध्याय यांच्या खिशात सापडलेले वैध तिकीट, जेणेकरून मृत व्यक्तीला सहज ओळखता आले. उपाध्याय यांना जीवंत ट्रेनबाहेर फेकून दिल्याचे सांगितले जात असताना डब्यात सापडलेली फिनाईलची बाटली; रेल्वेतून खाली ढकलल्यानंतर साधारणपणे होऊ शकणार्या जखमा आणि प्रत्यक्षातील जखमा यातील विसंगती, हे सर्व या घटनेच्या अनपेक्षित आणि असाधारण स्वरूपाकडेच निर्देश करते, असेही या अहवालात नमूद केले आहे. असे ताशेरे ओढल्यानंतरही शेवटी आयोगाने न्यायालयाचा निकालच ग्राह्य धरला, हे विशेष!
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचे गूढ आज ५० वर्षांनंतरही गूढच राहिले आहे. पंडितजींच्या हत्येच्या बरोबर २५ महिने आधी म्हणजे ११ जानेवारी, १९६६ला देशाचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशात ताश्कंद येथे एक करार झाला, या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर रात्री शास्त्रीजींचा मृत्यू झाला. अलीकडेच या घटनेवर ‘ताश्कंद फाईल्स’ नावाचा एक चित्रपट निर्माण झाला होता. या चित्रपटात शास्त्रीजींच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न झाला आहे. यासाठी रशियन हेर संस्था ‘केजीबी’च्या दस्तावेजांचा उपयोग केलाय. ‘केजीबी’त ‘अर्काईव्हिस्ट’ म्हणून ३० वर्षे काम केलेल्या वासिली मित्रोखिन यांनी उघड केलेली ही कागदपत्रे ‘मित्रोखिन अर्काईव्ह’ म्हणून ओळखली जातात. या कागदपत्रात भारताबाबतीत अत्यंत धक्कादायक अशी माहिती देण्यात आलीय. यावर विवेक अग्निहोत्रीयांनी ‘इंडिया फॉर सेल’ नावाचे पुस्तक लिहिले. त्याच्याच आधारे पुढे ‘ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट काढला.
शीतयुद्धाच्या या काळात ‘केजीबी’ने भारतात जगातील सर्वात मोठे हेरांचे जाळे विणले होते. याची अतिशय सखोल माहिती या कागदपत्रांत आहे. अमेरिका आणि रशिया भारताला आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी स्पर्धा करत होत्या. यातून रशियन धोरणांना अडचणीचे ठरणार्यांचे खच्चीकरण आणि पूरक ठरणार्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण ‘केजीबी’ने आखले होते. राजकारणी, नोकरशाह, मीडिया सर्वत्र ‘केजीबी’चे हस्तक होते. पैसा, हनिट्रॅप, लोकांचे वैचारिक ब्रेनवॉशिंग, या सर्वांचा मुक्तपणे वापर झाला. कम्युनिस्ट पक्षाला मोठ्या प्रमाणावर रशियातून निधी मिळत होता. भारताचा मुख्य वैचारिक कल कम्युनिजमकडे झुकेल, यासाठी माध्यमांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर कम्युनिस्ट विचारांचा प्रसार करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर आधी शास्त्रीजी आणि नंतर दीनदयाळ उपाध्याय या राष्ट्रीय नेत्यांची अवघ्या दोन वर्षांच्या फरकाने हत्या झाली होती.शीतयुद्धाच्या काळात भारताच्या भविष्याची दिशा काय असेल, याचा दूरदर्शी विचार दीनदयाळ उपाध्याय मांडत होते. पन्नाशीतल्या दीनदयाळ उपाध्याय यांना लोकांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. पन्नाशीत भारतीय राजकारणात करिअर सुरू होत असतं. त्या वयात ते काँग्रेसच्या राजकारणाला पर्याय देऊ शकेल, इतका प्रभावी विचार मांडत होते. उपाध्याय यांना जनसंघाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले ते जनसंघाचे १४वे अधिवेशन होते आणि ते भरले होते, कम्युनिस्टांनी बस्तान बसवलेल्या केरळच्या कालिकतमध्ये. हे अधिवेशन अतिशय गाजले. भारताच्या राजकीय क्षितिजावर दीनदयाळ उपाध्याय यांच्या रूपाने एक नवा तारा उदयास आला होता. पण, दुर्दैवाने अवघ्या ४३ दिवसांतच उपाध्याय यांची हत्या झाली. इतिहासाच्या पानात आजही ती एक गूढ बनून राहिली आहे.
यानंतरच्या काळात राष्ट्रवादी राजकारणाला मोठा फटका बसला, त्यातून उभारी घेऊन पुन्हा सूर पकडण्यासाठी जनसंघ आणि त्यातून पुढे स्थापन झालेल्या भाजपला जवळपास तीन दशकांचा काळ वाट पाहवी लागली. हे इथे लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणताही गुन्हा ज्यावेळी होतो, त्यावेळी त्याचा उद्देश काय आणि लाभ कुणाला झाला. याचा विचार खर्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी करावा लागतो. तसा विचार केल्यास उपाध्याय आणि शास्त्रीजी यांच्या हत्येमागे कोणत्या शक्ती असू शकतात, याचा अंदाज येऊ शकतो. या शक्ती इतक्या प्रबळ होत्या की, उपाध्याय यांच्या नातेवाइकांनी नंतरच्या काळात असा दावा केला होता की, या हत्येच्या तपासाची मागणी लावून धरू नका म्हणून त्यांना अज्ञात लोकांकडून धमक्या येत होत्या.
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...
- तानाजी खोत