मुस्लिम धर्मांतरणप्रकरणी उ.प्र. एटीएसकडून मौलाना सिद्दीकी अटकेत

    22-Sep-2021
Total Views | 123
maulana_1  H x

हवालाद्वारे धर्मांतरणास आर्थिक मदतीचा आरोप
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : बळजबरी मुस्लिम धर्मांतरण करणारे रॅकेट उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) काही दिवसांपूर्वी उघडकीस आणले होते. आता त्याप्रकरणी ग्लोबल पीस सेंटरचा अध्यक्ष आणि धर्मांतरणासाठी आर्थिक मदत पुरविणाऱ्या मौलाना कलीम सिद्दीकी यास एटीएसने अटक केली आहे.
 
 
धर्मांतरणप्रकरणी एटीएसने मौलाना कलीम सिद्दीकी यास अटक केली आहे. मौलाना सिद्दीकी हा ग्लोबल पीस सेंटर आणि जमियत – ए – वलिउल्लाहचा अध्यक्ष आहे. एटीएसने पत्रकारपरिषदेत त्याच्या अटकेची माहिती दिली. त्यानुसार, धर्मांतरणासाठी हवालाद्वारे अर्थपुरवठा करण्याचे काम मौलाना सिद्दीकी करीत होता. त्याचप्रमाणे युट्यूबद्वारे धर्मांतरणासाठी प्रवृत्त करणे आणि धर्मांतरण रॅकेटमध्ये सहभागी होण्याचे आवाहनदेखील तो करीत होता.
 
 
मौलाना सिददीकी हा आपले दोन ट्रस्ट चालविण्यासोबतच देशातील अनेक मदरशांना अर्थसहाय्य करीत होता. धर्मांतरणासाठी त्यांच्या संस्थांना एका ब्रिटीश संस्थेकडून ५७ कोटी रुपये प्राप्त झाल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी आतापर्यंत एकुण १० आरोपींना अटक करण्यात आली असून ६ जणांविरोधात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आल्याचे एटीएसने सांगितले आहे.
 
 
आर्थिक प्रलोभन दाखवून तसेच बळजबरी मुस्लिम धर्मांतर करणारे रॅकेट उ. प्र. एटीएसने काही महिन्यांपूर्वी उघडकीस आणले होते. त्याप्रकरणी मुफ्ती काझी आणि उमर गौतम यांना अटकदेखील करण्यात आली होती. प्रामुख्याने दिव्यांग विद्यार्थ्यांचे फसवणुकीने धर्मांतर करण्याचा प्रकार या रॅकेटमार्फत सुरु होता. उत्तर प्रदेशासह देशभरात असा प्रकार घडविण्यात येत असल्याचे तपासात समोर आले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121