नवी दिल्ली : न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंड क्रिकेट बोर्डानेदेखील पाकिस्तानमधील सुरक्षेचे कारण पुढे करत आपला पाकिस्तान दौरा रद्द केला. यानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट खेळाडूंसह समीक्षकांनीदेखील न्यूझीलंड आणि इंग्लंडवर टीका केली. आता यावर पीसीबीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रमीझ राजा यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याचा बदला आपण मैदान-ए-जंगमध्ये घेऊ असे पाकिस्तानी खेळाडूंना सांगितले आहे.
या सर्व घटनेवर रमीझ राजाने ट्विट केले आहे की, "इंग्लंडने त्यांचे वचन न पाळण्याच्या आणि क्रिकेट विश्वातील सदस्याला अपयशी ठरवण्याच्या निर्णयामुळे निराश झालो. जेव्हा त्यांच्या मदतीची सर्वात जास्त गरज होती. इंशाअल्लाह आम्ही आमचे अस्तित्व वाचवू शकू. पाकिस्तानी संघाला झोपेतून जागे होण्याची आणि जगातील सर्वोत्तम संघ बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून जगभरातील संघ भविष्यात त्यांच्याशी सामने खेळण्यासाठी कोणत्याही सबबीशिवाय रांगेत उभे राहतील."
यावेळी भारताला संबोधित करताना म्हणाले की, "आमचा संघ आणि चाहते या दोन देशांविरुद्ध आपला राग एका प्रकारे व्यक्त करू शकतात. जर आपण टी-२० विश्वचषकाला गेलो तर, पूर्वी आमच्या शेजारी देश (भारत) आमच्या टार्गेटवर असायचा पण आता भारताबरोबर आणखी दोन संघांची नावे जोडा. त्यांना सांगा की आम्ही हरणार नाही. त्यांचा बदला आम्ही मैदान-ए-जंगमध्ये घेऊ." असे म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले की, "इंग्लंडचे खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना आनंदाने पाकिस्तानात येतात, पण जेव्हा एक संघ म्हणून असे करण्याचा विचार केला जातो तेव्हा त्यांना येथे भीती वाटते. इंग्लंडचा निर्णय निराशाजनक आहे आणि त्यांच्याकडून अशाच निर्णयाची अपेक्षा होती कारण दुर्दैवाने पाश्चिमात्य देश एकमेकांच्या बाजूने उभे आहेत. सुरक्षेचे कारण सांगून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकता. राग हा आहे की न्यूझीलंडचा संघ प्रथम येथून निघून गेला आणि त्यांना काय धोका होता हे न सांगता.