नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानमधील क्रिकेटसाठी देशातील सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सामना सुरु होण्याच्या २० मिनिटे आधी मालिका रद्द केल्याची घोषणा केली. यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी)देखील ऑक्टोबरमध्ये होणारा दौरा रद्द करण्याची घोषणा केली. त्यांनीही पाकिस्तानमधील सुरक्षेच कारण पुढे केले आहे.
‘‘इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांच्या पाकिस्तानात होणाऱ्या अतिरिक्त सामन्यांविषयी चर्चा करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये झालेल्या चर्चेनुसार ऑक्टोबरला होणाऱ्या या दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे ईसीबीने स्पष्ट केले आहे. इंग्लंडचा संघ २००५ नंतर प्रथमच पाकिस्तानचा दौरा करणार होता. १३, १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध त्यांचे दोन टी-२० सामने होणार होते. दौरा रद्द करण्याच्या या निर्णयाबद्दल ‘ईसीबी’ने पाकिस्तान क्रिकेट मंडळाची माफी मागितली आहे.
न्यूझीलंड क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या काही मिनिटे आधी आपण पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेत असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आरडेर्न यांच्याशीही चर्चा केली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यात रावळपिंडीमध्ये ३ एकदिवसीय आणि लाहोरमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होते. न्यूझीलंडविरुद्धची मालिका वाचवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रयत्न केले. आता न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडनेही दौरा रद्द केल्याने पीसीबीची मोठी नाचक्की झाली आहे.