देवेंद्रनाथ टागोर (१८१७ ते १९०५ ) हे प्रसिद्ध आणि नामांकित टागोर घराण्यातील एक महान विचारवंत आणि रवींद्रनाथ टागोरांचे पिताश्री होते. देवेंद्रनाथांनी १८४३ ला ‘तत्त्वबोधिनी पत्रिका’ आणि १८६५ ला ‘नॅशनल पेपर’ ही दोन महत्त्वाची मुखपत्रे सुरू केली. तसेच ते राजकीय संघटना ‘"British Indian Association’चे काही काळ सचिव होते. स्वतः श्रीमंत घराण्यातील असूनही गरीब गावांवरील चौकीदारी कर कमी करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. बहुपत्नीत्व आणि बालविवाहाला त्यांचा प्रखर विरोध होता, तसेच ते विधवापुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते.देवेंद्रनाथांचा सुधारणावाद हिंदूविधायक होता, हिंदूविध्वंसक नव्हता.
‘ब्राह्म समाज’ हा त्यांना हिंदूंमधील वेगळा पंथ नको होता किंवा हिंदूंपासून फुटून निघणारा अथवा हिंदूविरोधी नको होता. सुधारणा या ‘हिंदू ओळख’ पुसणार्या असू नयेत आणि हिंदूविरोधी तर मुळीच असू नयेत. तसं झालं तर हिंदू धर्म हा सुधारणाविरोधी आहे आणि तो कुठलीच सुधारणा पचवू शकत नाही, असा चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. हिंदू धर्मासारख्या प्रवाही आणि परिवर्तनीय धर्माविषयी असा संदेश जाणे ही राष्ट्रीय हानी ठरली असती. तसेच एखाद्या जुन्या संघटनेत काम करताना ज्येष्ठ आणि जुन्या सदस्यांना दुखावून आणि त्यांना बाजूला सारून पुढे जाणे देवेंद्रनाथांना योग्य वाटलं नाही, त्यांना सोबत घेऊनही प्रगती करता येते हे समन्वयवादी देवेंद्रनाथांनी नंतर प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले होते.
ख्रिश्चन मिशनरींचे हिंदू धर्मावरील हल्ले परतवून लावून त्याविरोधात समाजातील बुद्धिजीवी वर्गाला जागे करून संघटित करण्यासाठी तसेच विविध धार्मिक प्रश्नांवर आणि तत्त्वज्ञानावर चर्चा करण्यासाठी त्यांनी ६ ऑक्टोबर, १८३९ ला ‘तत्त्वबोधिनी सभा’ स्थापन केली होती. तत्त्वबोधिनी सभा स्थापन करण्याचे दोन प्रमुखे उद्देश होते- एक म्हणजे आपल्या प्राचीन धर्माकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ख्रिश्चॅनिटीच्या भयानक अतिजलदरीतीने होणार्या प्रगतीवर गंभीर चिंता व्यक्त करणे आणि दुसरा म्हणजे ख्रिश्चॅनिटीच्या या प्रसाराविरोधात वेदांच्या तत्त्वप्रणालीनुसार ईश्वराची आराधना करणे नि वेदांतविषयक ग्रंथ प्रकाशित करणे. ((Kopf, David, The Brahmo Samaj The Shaping of The Modern Indian Mind, Gupta Brothers, १९५९ , पृष्ठ १६२) त्यांचे वेदांतप्रेम देशभक्तीतूनच प्रतीत झाले होते. मिशनर्यांच्या हिंदू धर्मावरील हल्ल्याला आणि ख्रिश्चॅनिटीच्या प्रसाराला प्रत्युत्तर देऊन अटकाव करण्यासाठी आणि बंगाली जनतेला शिक्षित करण्यासाठी त्यांनी तत्त्वबोधिनी सभेतर्फे १८४३ला ‘तत्त्वबोधिनी पत्रिका’ हे वृत्तपत्र सुरू केले. (उपरोक्त, पृष्ठ १६३)
बंगालमध्ये ख्रिस्ती मिशनरींकडून विशेषत: मिशनरी शाळेतून होण्यार्या धर्मांतराच्या तक्रारी देवेंद्रनाथ टागोरांच्या कानावर आल्यावर त्यांनी संपादक अक्षयकुमार दत्त यांना यावर तत्त्वबोधिनी पत्रिकेतून लेख लिहिण्यास उद्युक्त केले, ‘पाहा, आपला धर्म पूर्णपणे नष्ट झालाय, आपला देश नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि आपलं हिंदू नाव कायमचे पुसले जाणार आहे,’ असा झणझणीत लेख अक्षयकुमार दत्त यांनी लिहिला. धर्मांतराचे लोण थोपवण्यासाठी देशी शाळांचे महत्त्व देवेंद्रनाथांनी ओळखले होते. यासाठी राधाकांत देव, सत्यचरण घोषाल आणि रामगोपाल घोष या ‘धर्म सभा’ व ‘ब्राह्म सभे’च्या नेत्यांशी चर्चा करून हिंदूंनी मिशनरी शाळेत न जाता, आपल्या देशी शाळेत शिकवण्याचे महत्त्व त्यांनी त्यांना पटवून दिले आणि या एकमेकांच्या विरोधी असणार्या संस्थांतील मतभेद दूर करून त्यांना एकत्र आणून एका सभेत ‘कळपर्वी-कळश्रवीींहळ’ (हिंदूहितचिंतक) या शिक्षणसंस्थेची स्थापना करण्यात आली. यामुळे धर्मांतराची लाट थोपवण्यात यश आले. अध्यक्ष म्हणून राधाकांत देव, तसेच हरिमोहन सेन आणि देवेंद्रनाथ यांची कार्यवाह म्हणून आणि भूदेव मुखोपाध्याय यांची शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. ((Tagore, Devendranath, Translated by Satyendranath Tagore Indira Devi (English), The auto-biography of Maharshi Devendranath Tagore, S K Lahiri , १९०९ , पृष्ठ ३८-३९) येथे कोणालाही टिळक-आगरकर-चिपळूणकर यांनी सुरू केलेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ शाळेची आठवण होणे स्वाभाविक आहे. येथे हे लक्षात घ्यायला हवे की, हिंदूंचे होणारे धर्मांतर आणि मिशनरी शाळेतून होणारा ख्रिश्चॅनिटीचा प्रसार हे संकट दूरदृष्टीच्या देवेंद्रनाथांनी ओळखले आणि त्वरित संघटनेचे महत्त्व आपल्या विरोधी पण हिंदूहितवादी संस्थेला पटवून देऊन दोन कट्टर विरोधी संस्थांना राष्ट्रीय कार्यासाठी एकत्र आणून देशी हिंदू शिक्षणसंस्था स्थापन केली. यात देवेंद्रनाथांचे संघटनकौशल्य, नेतृत्वगुण, समन्वयवादी भूमिका यासोबत वैयक्तिक अथवा संस्थात्मक मतभेदापेक्षा राष्ट्रहिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य हे महत्त्वाचे गुण दिसून येतात. आस्तिक असणार्या देवेंद्रनाथांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी पुरस्कारिलेल्या, हिंदूंची राष्ट्रीय ओळख आणि अस्तित्व जपणार्या सुधारणावादी चळवळीमध्ये त्यांना बंगालमधील पुरोगामी, बुद्धिवादी, आस्तिक, अज्ञेयवादी आणि नास्तिकांनीही साथ दिली होती. ही एकप्रकारे देवेंद्रनाथांच्या नेतृत्वगुणाची आणि संघटनकौशल्याची पावती होती. देवेंद्रनाथ इतके प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते की, पाश्चात्त्य विचारांच्या प्रभावाकडे आकृष्ट झालेले राजनारायण बोस यांच्यासारखे तरुण देवेंद्रनाथांच्या संपर्कात येताच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि हेच राजनारायण बोस पुढे आधुनिक हिंदू राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाऊ लागले. राजनारायणांनी देवेंद्रनाथांना उपनिषदांची इंग्रजी भाषांतरे करण्यास साहाय्य केले.
देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात ‘ब्राह्म’ समाजातील सुधारणेवरून १८६५ ला मतभेद निर्माण झाले. तेव्हा ‘ब्राह्म’ समाजाचे नेतृत्व देवेंद्रनाथांकडे होते आणि अशातच १८६६ ला ब्राह्म समाज दुभंगला. केशवचंद्र सेन आणि त्यांचे अनुयायी ‘ब्राह्म’ समाजातून बाहेर पडले आणि त्यांनी ‘भारतीय ब्राह्म समाज’ (ब्राह्म समाज ऑफ इंडिया) ही स्वतंत्र संस्था स्थापन केली. मूळ संस्था ‘आदी ब्राह्म समाज’ म्हणून ओळखली जाऊ लागली. देवेंद्रनाथांचा सुधारणेला विरोध नव्हता, कालानुरूप जशी परिस्थिती बदलते त्यानुसार माणसाने सुधारणा करून कालसुसंगत राहायला हवे. कारण, त्याशिवाय प्रगती अशक्य आहे, असे त्यांचे मत होते. पण, वादाचे कारण ‘हिंदू ओळख’ हे होते; ‘ब्राह्म’ समाजाची जुनी पिढी त्यांच्या हिंदू असण्याने टीकेचे धनी होत होती. त्यामुळे मतभेद टाळण्यासाठी जुन्या पिढीला की ज्यांनी ‘ब्राह्म’ समाजाला आज इथपर्यंत आणून ठेवलय त्यांना दयाळूपणे आणि सहिष्णूतेने वागवून आपल्यासोबत घेऊन गेल्यास आपण नक्कीच प्रगतिपथावर जाऊ, असे देवेंद्रनाथांनी सांगितले. हा समुदाय आणि अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे देवेंद्रनाथ खूप अस्वस्थ झाले होते. केशवचंद्रांचे अनुयायी पण ज्यांना देवेंद्रनाथांविषयी सहानुभूती होती, अशा शिवनाथ शास्त्रींनीसुद्धा नमूद केलय की, ‘या मतभेदांमुळे देवेंद्रनाथांना ब्राह्म समाज आणि हिंदू समाजात दुही निर्माण होईल, अशी भीती वाटत होती. बहुतांश सुचवलेल्या सुधारणा या परिणामत: हिंदूविरोधी होत्या आणि त्यांचा स्वीकार न केवळ ब्राह्म परिषदेत प्रक्षुब्धता निर्माण करेल. पण, त्यासोबत देवेंद्रनाथांनी ब्राह्मवादाला राष्ट्रीय आणि स्वीकृत स्वरूपात साकारण्याचे जतन केलेले स्वप्नही भंग होणार होते.’ (Kopf, , पृष्ठ १३४)
देवेंद्रनाथांचा सुधारणावाद हिंदूविधायक होता, हिंदूविध्वंसक नव्हता. ‘ब्राह्म समाज’ हा त्यांना हिंदूंमधील वेगळा पंथ नको होता किंवा हिंदूंपासून फुटून निघणारा अथवा हिंदूविरोधी नको होता. सुधारणा या ‘हिंदू ओळख’ पुसणार्या असू नयेत आणि हिंदूविरोधी तर मुळीच असू नयेत. तसं झालं तर हिंदू धर्म हा सुधारणाविरोधी आहे आणि तो कुठलीच सुधारणा पचवू शकत नाही, असा चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. हिंदू धर्मासारख्या प्रवाही आणि परिवर्तनीय धर्माविषयी असा संदेश जाणे ही राष्ट्रीय हानी ठरली असती. तसेच एखाद्या जुन्या संघटनेत काम करताना ज्येष्ठ आणि जुन्या सदस्यांना दुखावून आणि त्यांना बाजूला सारून पुढे जाणे देवेंद्रनाथांना योग्य वाटलं नाही, त्यांना सोबत घेऊनही प्रगती करता येते हे समन्वयवादी देवेंद्रनाथांनी नंतर प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले होते. कारण, ज्या समाजात आपल्याला सुधारणा करायच्या आहेत, तो समाज आपल्यासोबत असला तरच त्यात सुधारणा करता येतात आणि तसे करताना सुधारणेसोबत राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच पावले उचलावी लागतात.
‘केशवचंद्र सेन विरुद्ध देवेंद्रनाथ आणि द्विजेंद्रनाथ’ हा टागोर पिता-पुत्र यांच्यातील लढा मुख्यत्वे वैश्विकता आणि राष्ट्रीयता असा होता. देवेंद्रनाथांना ‘ब्राह्म समाज’ राष्ट्रीय स्वरूपात हवा होता, तर केशवचंद्र युरोपकडे प्रेरणा म्हणून पाहत होते. या दोघांना जवळून पाहणार्या पौर्वात्य अभ्यासक मॅक्समुलरने असे भाष्य केले आहे की, “देवेंद्रनाथ आणि त्यांच्या सहकार्यांना राष्ट्रीय भावना दुखावण्याची भीती वाटत होती. त्यांना त्यांच्या धर्मातील राष्ट्रीय वैशिष्ट्ये जतन करण्याची इच्छा होती, धर्माला तथाकथित वैश्विक रूप दिल्याने तो राष्ट्राला विकृत आणि हास्यास्पद वाटला असता. त्यांनी त्यांना निष्पाप वाटणार्या सहिष्णू हिंदू रूढी आणि परंपरांची बाजू मांडली.” (उपरोक्त, पृष्ठ १३५ ) सुधारणा करताना प्रवाहाच्याविरुद्ध मार्गक्रमण करावे लागते, या प्रवासात काहींच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पण, वैयक्तिक आणि राष्ट्रीय भावना यात फरक आहे. वैयक्तिक भावना दुखावल्या गेल्या तरी राष्ट्रीय भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण नाहीतर सुधारणा राष्ट्रविरोधी ठरण्याची भीती असते. सुधारणा या राष्ट्रविधायक असाव्यात, राष्ट्रविध्वंसक नव्हे. वैश्विकतेकडे जाताना ‘राष्ट्रीयता’ हा त्याचा आधीचा टप्पा आहे हेच काही जण विसरतात. ‘वैश्विकता’ हे ध्येय साध्य करण्यासाठी ‘राष्ट्रीयता’ हा टप्पा टाळून किंवा वगळून पुढे जाताच येत नाही. काही जण राष्ट्रीयतेचा टप्पा टाळून थेट उडी मारून वैश्विकतेच्या पायरीवर जायचा प्रयत्न करतात; त्यामुळे त्यांना धड वैश्विकताही साधता येत नाही आणि राष्ट्रीयताही साधता येत नाही. यामुळेच वैश्विकता साध्य करण्यात अपयशी ठरलेले त्या अपयशाचे खापर राष्ट्रीयतेवर फोडतात आणि त्याला संकुचितपणाचे लेबल चिकटवतात. राष्ट्राराष्ट्रांनी एकमेकांसोबत सहकार्याने राहून वैश्विकतेच्या दिशेने वाटचाल करावी. केशवचंद्रांसारखे विचारवंत आणि नेते पाश्चिमात्य विचारांकडे प्रेरणास्रोत म्हणून पाहत होते. पाश्चिमात्य विचारांनुसार ‘वैश्विकता’ साध्य करता येईल, असा त्यांचा आंधळा विश्वास होता आणि असे करताना ते अज्ञानाने भारताच्या राष्ट्रीय विचारांकडे पूर्णपणे डोळेझाक करत होते आणि शत्रूच्या जाळ्यात अलगद अडकत होते. सर्वसमावेशकता ही वैश्विकतेची पूर्वअट असेल, तर वैश्विक विचार हिंदूविरोधी असू नयेत आणि हाच विचार देवेंद्रनाथांनी मांडला आणि राष्ट्रीयतेचा पुरस्कार करून केशवचंद्रांना प्रखर विरोध केला. राधाकांत देव यांनी देवेंद्रनाथांना ‘राष्ट्रीय धर्माचे संरक्षक’ म्हटले होते, तर ‘ब्राह्म समाजा’ने त्यांना भारतीय तरुणांना ख्रिश्चॅनिटीच्या मोहापासून दूर ठेवल्याबद्दल ‘महर्षी’ ही पदवी बहाल केली होती.