‘आयडिया ऑफ इंडिया’मध्ये बौद्ध तत्वज्ञानाचे स्थान महत्वाचे – डॉ. विनय सहस्रबुद्धे

    14-Sep-2021
Total Views | 165
vs_1  H x W: 0

‘आयसीसीआर’तर्फे बौद्ध तत्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी पुरस्काराची घोषणा
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : ‘आयडिया ऑफ इंडिया’मध्ये बौद्ध तत्वज्ञानाचे स्थान अनन्यसाधारण आहे. बौद्ध तत्वज्ञानाच्या अभ्यासाचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान गेल्या अनेक शतकांपासून आहे. त्यामुळे बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या परदेशी अभ्यासकांना 'अवॉर्ड फॉर प्रमोशन ऑफ बुद्धिस्ट स्टडीज' हा पुरस्कार सुरु करण्यात येत असल्याची माहिती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
 
 
आयसीसीआरतर्फे सांस्कृतिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम होत आहे. परदेशातील अनेक विद्यार्थ्यी आयसीसीआरमार्फत भारतीय संस्कृतीचा अभ्यास देशात आणि परदेशात करीत आहेत. त्यामध्ये बौद्ध धर्माच्या अभ्यासाचाही समावेश आहे. भारत दीर्घकाळपासून बौद्ध तत्वज्ञानाचे प्रमुख केंद्र राहिला असून देशोदेशीचे अभ्यासक भारतात अभ्यासासाठी येत असतात. ‘आयडिया ऑफ इंडिया’मध्ये बौद्ध तत्वज्ञानाचे स्थान अतिशय महत्वाचे असून हे तत्वज्ञान भारतीय संस्कृतीचा प्रमुख भाग आहे. त्यामुळे बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या परदेशी अभ्यासकांना यंदाच्या वर्षीपासून ‘अवॉर्ड फॉर प्रमोशन ऑफ बुद्धिस्ट स्टडीज’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. भारताला बौद्ध धर्माचे मुख्य केंद्र म्हणून पुनरुज्जीवीत करण्याच्या ध्येयातील हा पुरस्कार हा प्रमुख घटक आहे. स्मृतीचिन्ह, सुवर्णपदक आणि रोख २० हजार अमेरिकन डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे, असे डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले.
 
 
‘साहित्यातील बौद्ध तत्वज्ञान’ हा विषय केंद्रस्थानी असणाऱ्या ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्फरन्सचे आयोजन १९ – २० नोव्हेंबर, २०२१ दरम्यान करण्यात आल्याची माहिती डॉ. सहस्रबुद्धे यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले, नवनालंदा महाविहाराच्या ७० व्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमाचा ही परिषद एक भाग असणार आहे. यामध्ये जगभरातील अभ्यासक सहभागी होणार आहेत. भारताच्या सॉफ्टपॉवरमध्ये बौद्ध तत्वज्ञान हा एक महत्वाचा घटक असून याद्वारे जगभरातील अभ्यासक भारताकडे बौद्ध तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील, असा विश्वास डॉ. सहस्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
त्याचप्रमाणे आयसीसीआर यंदाच्या वर्षी दुबई एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून तेथे भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये जगसमोर मांडली जाणार आहेत. करोना काळात अविरतपणे काम करणाऱ्या योद्ध्यांच्या सन्मानासाठी २६ आणि २६ सप्टेंबर रोजी भारत संकल्प महोत्सव – इंडिया ग्रीट फेस्टचेही आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121