उत्तर पश्चिम घाटामधून प्रथमच 'वर्म' पालीचा शोध; गोव्यात अधिवास

    01-Sep-2021
Total Views | 206
gecko_1  H x W:



मुंबई (अक्षय मांडवकर) -
गोव्यातून पालीच्या नव्या एका प्रजातीचा शोध लागला आहे. यानिमित्ताने प्रथमच उत्तर पश्चिम घाटामध्ये 'हेमीफिलोडॅक्टिलस' कुळातील पाल आढळून आली आहे. नव्याने शोधलेली पाल ही गोव्यातील केवळ दोन भागांमध्येच आढळत असल्याने ती दुर्मीळ असून तिच्या संरक्षणाची गरज आहे.
 
 
 
'हेमीफिलोडॅक्टिलस' कुळातील पालींचा प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या दक्षिण पट्टयांमध्ये अधिवास आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील पश्चिम घाटामधून या कुळातील पालींची नोंद नाही. मात्र, नुकतीच या कुळातील नवी पाल त्यांच्या मूळ अधिवासापासून ५६० किमी दूर गोव्यामध्ये आढळून आली आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम घाटामध्येही या कुळातील पालींचा अधिवास असल्याचे समोर आली आहे. उत्तर गोव्यामधील गोवा विद्यापाठीमधून या नव्या पालीचा शोध लावण्यात आला आहे. अक्षय खांडेकर, दिकांश परमार, नितीन सावंत, इशान अग्रवाल यांनी ही प्रजात शोधून काढली आहे. यासंबंधीचे वृत्त मंगळवारी 'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रतिकेमध्ये प्रसिद्ध झाले.
 
 
 
नव्याने शोधलेली पालीची प्रजात ही उत्तर गोव्यातील गोवा विद्यापीठ आणि दक्षिण गोव्यातील चांदोर जिल्ह्यामध्येच आढळत असल्याने तिचे नामकरण गोव्याच्या नावे 'हेमीफिलोडॅक्टिलस गोवाएन्सिस' असे करण्यात आल्याची माहिती संशोधक अक्षय खांडेकर यांनी दिली. ही पाल निशाचर असून ३० ते ३५ एमएम आकाराची आहे. तिचा अधिवास झाडावर आणि भिंतींवर आहे. गोवा विद्यापीठातील दिकांश परमार यांना सर्वप्रथम ही पाल विद्यापीठाच्या परिसरात दिसली होती. त्यानंतर परमार यांनी ही माहिती 'ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन'चे संशोधक अक्षय खांडेकर आणि इशान अग्रवाल यांना दिली.
 
 
 
 
या दोन्ही संशोधकांनी या पालीचा आकारशास्त्र आणि इतर तंत्राचा वापर करुन अभ्यास केल्यानंतर ही पाल विज्ञानासाठी नवीन असल्याचे समोर आले. ही पाल सडपातळ असल्याने तिला 'स्लेन्डर' किंवा 'वर्म गेको' असे म्हणतात. मात्र, आता तिला 'गोवा स्लेन्डर गेको' या सामान्य नावाने ओळखले जाईल. या पालीचे कुळ प्रथमच उत्तर पश्चिम घाटामध्ये आढळले आणि ते देखील गोव्यामध्ये केवळ दोनच ठिकाणी सापडल्याने ही पाल दुर्मीळ आहे. त्यामुळे अधिकाधिक सर्वेक्षण करुन उत्तर पश्चिम घाटामधून या कुळातील पालींचा शोध घेणे आवश्यक असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121