समर्थांचे ‘कवित्वनिरुपण’

समर्थांचे ‘कवित्वनिरुपण’

    01-Sep-2021
Total Views | 192
SAMARTH_1  H x
 
 
समर्थांचे ‘कवित्वनिरुपण’
समर्थांचे अवलोकन चौफेर 
असल्याने त्यांनी या समासात
कवित्वाचे तीन-चार प्रकार सांगितले
आहेत आणि कवित्व प्रकारांची नावे
स्वामींनी स्वतः दिलेली आहेत.
 
 
 
समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात ‘कवित्वकला निरुपण’ नावाचा एक स्वतंत्र समास लिहिला आहे. समर्थांना अनेकविध कला व विद्या यात रुची होती. तथापि कोणतीही कला मानवी जीवन विकासाला आणि सामाजिक चारित्र्याला, नैतिकतेला उपद्रव करणारी असू नये, याकडे स्वामींचे लक्ष असे. त्यादृष्टीने स्वामींनी कवित्वकलेकडे बघितले आहे. कवीला चिंतनाने जीवनाचा अर्थ समजतो. मानवी जीवनातील गुंतागुंत सोडवण्यात कवीला यश मिळते, जीवनातील गूढार्थ उलगडतो. अशावेळी कवीची प्रतिभा जागृत असेल, तर ते सांगण्यासाठी तो निरनिराळ्या मार्गांचा अवलंब करतो. ज्या कवींची प्रतिभा जागृत होते, त्यांच्यावर शारदा प्रसन्न असते व ती कवीला मार्गदर्शन करते. त्यामुळे त्यांच्या मुखातून काव्याविष्कार सहजपणे प्रगट होतो.
 
 
आपल्याला जाणवलेला मानवी जीवनाचा गूढार्थ लोकांना सांगण्यासाठी कवी कविता करतो. काव्यानंदाबरोबर कवी अर्थाद्वारा जीवनाचे रहस्य लोकांसमोर मांडतो. एकप्रकारे हा परोपकार म्हणावा लागेल. परंतु, सर्वच कवींच्या ठिकाणी अशी परोपकार बुद्धी असते, असे नाही. यासाठी स्वामी कवींना सांगतात की, प्रथम लोकात भगवद्भक्ती वाढेल किंवा लोकांच्या ठिकाणी विरक्ती उत्पन्न होईल, अशी कविता आधी पुष्कळ करावी. सुरुवातीच्या काळात कवीने भक्ती आणि विरक्ती वाढेल, अशी कविता पुष्कळ केल्याने कवीचे अंतःकरणशुद्ध होत जाते. अशा निर्मळ अंतःकरणात उमटणारे विचार समाजाला उपकारक असतात. कवीला गर्व, ताठा, अहंकार, विषयवासना यांची बाधा होत नाही. परंतु, विरक्ती, भक्ती यांचा विचार न करता जे कवी काव्य करीत असतात, त्यामुळे सामाजिक चारित्र्य व नैतिकता यांना बाधा पोहोचणे शक्य असते.
 
 
समर्थांचे अवलोकन चौफेर असल्याने असल्याने त्यांनी या समासात कवित्वाचे तीन-चार प्रकार सांगितले आहेत. आज जरी मराठी वाङ्मयातील कवितेची समीक्षा वेगळ्या प्रकारे केली जात असली, तरी समर्थांचे त्यांच्या काळाला अनुसरून सांगितलेला पहिला प्रकार म्हणजे ‘धीर कवित्व.’ कवित्व प्रकारांची नावे स्वामींनी स्वतः दिलेली आहेत. त्याकाळी काव्यसमीक्षेकडे फारसे लक्ष दिले जात नसे. त्यामुळे समर्थांच्या नंतर काही काळ ही नावे रुढ असावीत. ‘धीटकाव्य’ म्हणजे आपल्या मनात जी कल्पना येते, त्यावर काव्यरचना करणे. थोडक्यात, जे मनात आले ते सांगून टाकले, अशी याची सोपी व्याख्या करता येते. आपल्या सांगण्याचा लोकांवर काय बरे-वाईट परिणाम होईल, याची फिकीर कवी करीत नाही. या प्रकारच्या कवितांतून प्रामुख्याने शृंगार, वीर, हास्य इत्यादी रस असतात. हास्यरस निर्मितीसाठी या कवींना कसलाही धरबंध नसतो. त्यासाठी हे कवी कोणाचीही आणि कशाचीही टिंगलटवाळी आपल्या कवितांतून करीत असतात. अशा कविता अर्थहीन तर असतातच, पण जीवनविषयक कसलेही सत्य सांगून जात नाहीत. या अर्थाने त्या हास्यकविता निरर्थक ठरतात. हास्यकवींचे लक्ष लोकांच्या टाळ्यावर असते. सामान्य अभिरुची असणारे श्रोते या कवींना ‘वा...वा’ करून प्रोत्साहन देत असतात. अशा तथाकथित विनोदी कवितांची रचना या ‘धीट’ कवींना लटपटीखटपटी करून केलेली असते. या ‘धीट’ प्रकारातले कवी जे दृष्टीस पडेल, त्यावर कविता करत सुटतात. पण, त्या निरर्थक असतात. त्यातून ना कवीची प्रतिभा दिसून येते, ना त्या कवितेला विचारांचे तत्त्वनिष्ठेचे मोल असते.अशा ’धीट’ कवितेचे लक्षण स्वामी पुढील प्रमाणे सांगतात- 
 
 धीट म्हणिजे धीटपणें केलें।
जे जे आपुल्या मनास आले।
बळेचि कवित्व रचिलें। या नांव धीट बोलिचे॥
 
 आता कवित्वाचा दुसरा प्रकार म्हणजे ‘पाठकवी.’ हे पाठकवी कसे असतात, त्यांचे कवित्व कसे असते, हे स्वामींनी या समासात सांगितले आहे. या प्रकारचे कवी प्रथम इतर ग्रंथातील कविता पाठ करतात. त्या कवितांची पुन्हा पुन्हा उजळणी करतात. एकदा ती चाल किंवा पद्धत मनात पक्की बसली की, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचारांची कविता करतात. असे जे करतात ते ‘पाठकवी’ या प्रकारात मोडतात. त्यांच्या कवितांतून चांगल्या ग्रंथकाराच्या कवितेच्या बाह्यांगाची नक्कल केली जाते. या प्रकारातले कवी नुसते शब्दज्ञान सांगत असतात. त्यांच्या ठिकाणी जीवनानुभवाचे ज्ञान नसते. हे ‘पाठकवी’ फक्त चांगल्या ग्रंथकारांसारखी दिसणारी शब्दांची गुंफण करीत असतात. स्वामींनी पाठकवींचे लक्षण पुढील प्रमाणे सांगितले आहे.
 
 
पाठ म्हणिजे पाठांतर। बहुत पाहिले ग्रंथांतर।
तयासारिखा उतार। आपणही केला॥
 
 स्वामींनी सांगितलेला कवितेचा तिसरा प्रकार म्हणजे ‘धीटपाठ.’ पुन्हा पुन्हा कविता रचत गेल्याने सवयीने या कवींना तत्काळ कविता करण्याची कला साधते. हे लोक शीघ्रकवी असतात. जे जे दिसेल, त्यावर हे कवी ताबडतोब कविता करीत असतात. त्यांच्या कवितांना विषयांचे बंधन नसते.एक मात्र खरे की, यांच्या कवितांतून भक्तिरस कधी दिसणार नाही. त्यांचे कवित्व भक्तिरसाव्यतिरिक्त असते. त्यांच्या विचारात ईश्वराविषयी भक्ती नसते. जे मुळात नाही ते काव्यातून कसे प्रगट व्हावे. या भक्तिविरहीत काव्यात कवीच्या दृष्टीस जे जे पडले, त्यांचा अंतर्भाव असतो. कवीच्या मनातील भावना कामना, वासना, विकार या कवितांतून प्रगट होतात. स्वामी ‘धीटपाठ’ कवीचे लक्षण पुढील प्रमाणे सांगतात-
 
 
सीघ्रचि कवित्व जोडिलें।
दृष्टी पडिलें तें चिं वर्णिलें।
भक्तिवाचून जें केलें। त्या नाव धीटपाठ॥
 
 या ‘धीटपाठ’ कवितांतून भक्ती, मानवी जीवनमूल्ये नसल्याने हे कवी जे दिसले त्यांचे वर्णन करीत बसतात. त्यामुळे साधारणत: या कविता कामविकारी व रंगेल असतात. या स्वरुपाच्या कवितांतून शृंगार, वीर, हास्य, विभत्स, भय रसात्मक असे अनेक प्रकारचे विषय हाताळलेले असतात. स्वामी सांगतात,
 
 
कामिक रसिक शृंगारिक।
वीर हास्य प्रस्ताविक।
कौतुक विनोद अनेक। या नाव धीटपाठ॥
 
 या ‘धीटपाठ’ कवींची मानसिकता कशी असते, तेही स्वामी या समासात सांगतात. दिसेल त्यावर कविता करणार्‍या या कवींचे मन शुद्ध नसते. त्या मनाला बाहेर भटकण्यात आनंद असतो, त्या कवींचे मन कामवासनेने भरून गेल्यामुळे ते कवी कामांध झालेले असतात. त्यामुळे त्यांना अनुसरून विषयवासनायुक्त शब्द त्यांच्या कवितेत पाहायला मिळतात. म्हणून ‘धीटपाठ’ कवितेतून परमार्थविषयक आणि जीवनावश्यक भाष्य दिसून येणार नाही. त्यातून काहीही साध्य होत नाही. बर्‍याचदा हे शीघ्रकवी पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणजेच पैशांसाठी कवितेतून माणसांची स्तुती करतात. एखाद्या श्रीमंताची स्तुतिस्तोत्रे गाऊन त्याच्या ठिकाणी नसलेले गुण घुसडतात आणि त्यांच्याकडून पैसा व वाहवा मिळवतात. हे ‘धीटपाठ’ कवीच करू शकतात. भगवंताची स्तुती करणे सोडून दिसेल त्याची उगीच वाखाणणी करणे अशांना समर्थांनी ‘मूर्ख’ म्हटले आहे.
 
 
सांडूनिया श्रीपती। जो करी नरस्तुती।
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती।
वर्णी तो येक पढतमूर्ख॥
 
 ज्याची खरी योग्यता नाही, अशा माणसाची स्तुती करणार्‍यालाही समर्थांनी मूर्खच म्हटले आहे. स्वामींनी ‘धीट’, ‘पाठ’ व ‘धीटपाठ’ हे कवितांचे प्रकार विस्ताराने सांगितले आहे. तथापि प्रतिभावान भक्तांच्या मुखातून जे परमार्थविषयक आत्मसाक्षात्कारी काव्य बाहेर पडते, त्यात चैतन्य व पावित्र्य असते. त्याचा परिणाम लोकांच्या मनावर चांगला होतो. अशा या प्रास्ताविक काव्याचे महत्त्व पटावे, यासाठी वरील सामान्य काव्यप्रकार लोकांसमोर स्वामींनी ठेवले असावेत. लोकांची अभिरुची वाढून ते परमार्थपोषक भक्तिप्रधान काव्याकडे वळतील, असा हा स्वामींचा प्रयत्न आहे, असे वाटते. राहिलेला ‘प्रासादिक’ काव्य प्रकार पुढील लेखात. (क्रमश:)
 
-सुरेश जाखडी
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121