खा. हेमंत गोडसे यांची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी
नाशिक : नाशिक येथील मिलिटरी स्टेशनमुळे लष्कर हद्दीलगतच्या शून्य ते ५०० मीटर अंतर परिसरातील प्लॉटवरील बांधकामाबाबत प्रशासनाने निर्बंध घातल्याने प्लॉटधारक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नाशिक स्टेशनचा असंवेदनशील स्टेशनच्या यादीत समावेश होणे गरजेचे आहे. यासाठी खा. हेमंत गोडसे आणि देवळाली ‘कँटोनमेंट बोर्डा’चे माजी उपाध्यक्ष व वॉर्ड क्र. ७ चे विद्यमान नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे भेट घेऊन येथील प्लॉटधारकांना दिलासा देण्यासाठी नाशिक लष्कर स्टेशनचा असंवेदनशील स्टेशनच्या यादीत तातडीने समावेश करावा, अशी मागणी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून लष्कर आणि मनपा प्रशासनाने लष्कर हद्दीलगतच्या प्लॉटवर बांधकाम करण्याविषयी जाचक निर्बंध लादले आहेत. या अटींनुसार परिसरात शंभर मीटर अंतरापर्यंतच्या प्लॉट धारकांना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. तसेच शंभर ते पाचशे मीटर अंतरापर्यंतच्या प्लॉटधारकांना केवळ १५ मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येईल, अशी अट घातल्याने प्लॉटधारक त्रस्त झाले आहेत.
लष्कर आणि मनपा प्रशासनाच्या या बांधकाम मनाईच्या आदेशामुळे त्रस्त झालेल्या शेकडो प्लॉटधारकांनी खा. गोडसे यांची भेट घेत समस्यांचे गार्हाणे मांडले होते. खा. गोडसे यांनी प्लॉटधारकांच्या तक्रारींची दखल घेत दिल्लीत केंद्रीयमंत्री संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत नागरिकांच्या समस्यांविषयी नुकतीच सविस्तर चर्चा केली.लष्कर प्रशासनालगत हजारो एकर जमीन असून त्यातून अवघी दोन ते पाच टक्के जमिनीवर बांधकाम झालेले आहेत. लष्करापासून १०० मीटरपर्यंतच्या अंतरावर सुमारे २० हजार एकर जमीन आहे. यापैकी ५० टक्के जमिनीवरील प्लॉट विकसित झालेले आहेत. लष्कर आणि मनपा प्रशासनाने बांधकामावर मनाई आणल्याने आजमितीस ५० टक्के जमिनीवरील प्लॉट पडून आहेत.
प्लॉटधारकांना त्यावर बांधकाम करता येत नसल्याने प्लॉटधारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावेळी खा. गोडसे यांनी केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांच्या लक्षात आणून दिले. ज्यावेळेस नाशिक मनपाने शहर विकास आराखडा तयार केला त्यावेळेस बांधकामाच्या विषयाला कोणताही विरोध संरक्षण खात्याकडून करण्यात आलेला नव्हता, हेही खा. गोडसे यांनी या भेटीदरम्यान चर्चेत सांगून याबाबतच्या सर्व बाबी केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांच्या निदर्शनात आणून दिल्यात.
देशभरात १४५ संवेदनशील, तर १५३ असंवेदनशील मिलिटरी स्टेशन असून या दोन्हीही यादीत नाशिक लष्कर स्टेशनचा समावेश नसून प्लॉटधारकांना दिलासा देण्यासाठी नाशिक लष्कर स्टेशनचा समावेश तातडीने असंवेदनशील स्टेशनच्या यादीत करावा, अशी मागणी खा. हेमंत गोडसे यांनी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक बाबुराव मोजाडदेखील उपस्थित होते. त्यांनीदेखील सदर विषयावर तातडीने उपाय काढण्याची विनंती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली.