पाश्चात्त्य संस्कृतीमुळे हिंदू संस्कृती लोप पावेल की काय, अशी भीतीही व्यक्त केली जाऊ लागली. पण, नुकत्याच संपलेल्या ‘ऑलिम्पिक २०२०’ स्पर्धेतील भारताच्या रौप्यपदक विजेत्या भारोत्तोलनपटू मीराबाई चानूकडे, तिने केलेल्या कृतीकडे पाहिल्यावर, हिंदू संस्कृती देशातल्या कानाकोपर्यापर्यंत वास करत असल्याचे व हिंदू संस्कृती पुढची हजारो वर्षे कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
अष्टौ गुणा पुरुषं दीपयन्ति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च। पराक्रमश्चबहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च॥
अर्थ - आठ गुण मानवाची शोभा वाढवतात : बुद्धी, सुंदर चारित्र्य, आत्म-संयम, शास्त्र-अभ्यास, धाडस, मितभाषण, यथाशक्ती दान आणि कृतज्ञता!
हिंदू संस्कृतीत मानवाला सुशोभित करणारे आठ गुण सांगितले असून, त्यातलाच एक म्हणजे कृतज्ञता. वरील संस्कृत सुभाषितामध्ये कृतज्ञतेचा क्रमांक सर्वात शेवटी आहे, कारण मानवाकडे बुद्धी, सुंदर चारित्र्य, आत्म-संयम, शास्त्र-अभ्यास, धाडस, मितभाषण, यथाशक्ती दान, असे गुण असले तरी त्याच्याकडे कृतज्ञता नसेल तर इतर सर्व सातही गुण शून्यवत आहेत. मानव जन्माला येतो, तेव्हापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही तो सर्वांकडून काही ना काही घेत असतो. मानवाच्या जीवन-मृत्यूपर्यंत त्याच्या कालचक्रात पंचमहाभूतांपासून आई-वडील, गुरुजन, मित्र, सहकारी, प्राणी-पक्षी-वृक्ष अशा प्रत्येकाचे योगदान असते. त्यांच्या सहकार्यानेच मानवाचे अस्तित्व प्रत्यक्षात आलेले असते. मानव आपल्या जीवनातील क्षण अन् क्षण जगत असतो व मृत्यूनंतरचे उत्तरकार्यही त्यांच्याच सहकार्याने होत असते. म्हणूनच, अशा सर्वांबद्दल मनात कृतज्ञताभाव असावा, असे आपली हजारो वर्षांपासून चालत आलेली हिंदू संस्कृती सांगते. तथापि, काळ बदलला आणि बदलत्या काळात हिंदू संस्कृतीतील अनेक मूल्यांवर पाश्चात्त्य संस्कृतीने घाला घातला. पाश्चात्त्य संस्कृतीमुळे हिंदू संस्कृती लोप पावेल की काय, अशी भीतीही व्यक्त केली जाऊ लागली. पण, नुकत्याच संपलेल्या ‘ऑलिम्पिक २०२०’ स्पर्धेतील भारताच्या रौप्यपदक विजेत्या भारोत्तोलनपटू मीराबाई चानूकडे, तिने केलेल्या कृतीकडे पाहिल्यावर, हिंदू संस्कृती देशातल्या कानाकोपर्यापर्यंत वास करत असल्याचे व हिंदू संस्कृती पुढची हजारो वर्षे कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
कोरोनाच्या सावटाखाली जपानची राजधानी टोकियोत पार पडलेल्या ‘ऑलिम्पिक २०२०’ स्पर्धेत भारताला पहिले पदक भारोत्तोलनपटू मीराबाई चानूने मिळवून दिले. महिलांच्या ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो वजन उचलून मीराबाईने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. मात्र, ऑलिम्पिक पदकापर्यंत पोहोचण्याचा मीराबाईचा प्रवास साधासोपा नव्हता. मीराबाई राहते त्या गावाचे नाव नोंगपोक काकचिंग तर तिची भारोत्तोलन प्रशिक्षण अकादमी तिथून ३० किलोमीटर अंतरावरील मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये. कोणत्याही खेळात प्रावीण्य मिळवायचे असेल तर दैनंदिन सरावाला पर्याय नसतो आणि मीराबाईलाही भारोत्तोलनात सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची होती. सुरुवातीला तिरंदाजीकडे कल असणार्या; पण त्यासाठीचा प्रशिक्षक न मिळाल्याने वयाच्या बाराव्या वर्षापासूनच मीराबाईने भारोत्तोलन क्रीडा प्रकारात नाव कमावण्याचे निश्चित केले होते. पण, आपल्या गावापासून दररोज प्रशिक्षण अकादमीपर्यंत जाण्याइतकेही पैसे तिच्याकडे नव्हते. मीराबाईचे वडील साईखोम कृति सिंह सरकारी नोकरीत होते. पण, वेतन तुटपुंजे होते व एकूण सहा मुला-मुलींच्या पालन-पोषणाची जबाबदारीही होती. ते तिला केवळ दहा-20 रुपये देऊ शकत होते. पण, त्यात पूर्ण प्रवास खर्च भागवता येणार नव्हता. म्हणूनच मीराबाई व तिच्या कुटुंबीयांनी यासाठी बाजारातून इंफाळकडे जाणार्या ट्रक चालकांचे साहाय्य घ्यायचे ठरवले. मीराबाईची आई साईखोम ओंगमी टोम्बी देवी या इंफाळकडे जाणार्या रस्त्यावर चहाचे दुकान चालवतात व ये-जा करणारे ट्रकचालक तिथे थांबत असत. त्यातून झालेल्या ओळखीनेच मीराबाई दररोज ट्रकने इंफाळमधील प्रशिक्षण अकादमीत कोणत्याही प्रवास खर्चाशिवाय पोहोचू शकली व तिला प्रशिक्षण घेता आले, सराव करता आला, भारोत्तोलनातील कौशल्य निश्चित करता आले व ‘ऑलिम्पिक’मध्ये पदकही मिळवता आले. म्हणजेच, मीराबाईच्या आताच्या यशात इंफाळकडे जाणार्या व इंफाळमधून पुन्हा परतणार्या, तिला मोफत इकडून-तिकडे व तिकडून-इकडे नेणार्या-आणणार्या ट्रकचालकांचेही योगदान आहे. ट्रकचालकांच्या याच योगदानाची जाण मीराबाईनेही ठेवली व टोकियोतून आल्यानंतर आपल्या कृतीतून ट्रकचालकांप्रति कृतज्ञताभाव व्यक्त केला, त्याची चर्चा आज सर्वत्र होताना दिसते.
मीराबाईने रौप्यपदक विजयाचे श्रेय ट्रकचालकांना देत त्यांना आपल्या घरी बोलावत त्यांचा सन्मान केला. सुमारे १५० ट्रकचालकांची यावेळी उपस्थिती होती व मीराबाईने सर्वांच्या बरोबर भोजन केले, सर्वांना शर्ट व मणिपुरी दुपट्ट्याची भेट दिली. पण, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले ते तिने केलेल्या पदस्पर्शाच्या कृतीने. हिंदू संस्कृतीत आपल्याला साहाय्य करणार्याबद्दल पदस्पर्शाने कृतज्ञताभाव व्यक्त करण्याची शिकवण दिली जाते. मानवी जीवन जगणे वास्तवात आणणार्यांत चराचर सृष्टीसह सर्वच सजीव-निर्जीव घटकांचा वाटा असतो. म्हणूनच हिंदू व्यक्ती प्रत्येकाबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करत पदस्पर्श करत असतो व तुमच्यामुळे आमचे जीवन जगणे शक्य झाले, असे सांगत असतो. मानव आपल्या आयुष्यात जे यश मिळवतो, त्यातही इतरांचे योगदान असतेच आणि त्यावरून त्यांच्याबद्दल कृतज्ञताभाव बाळगण्याची शिकवणही हिंदू संस्कृती देत असते. म्हणूनच कृतज्ञतेला हिंदू संस्कृतीचा आत्मा म्हटले जाते व मीराबाई चानूनेदेखील आपल्याला प्रशिक्षण अकादमीपर्यंत घेऊन जाणार्या ट्रकचालकांविषयीची कृतज्ञता पदस्पर्शातून व्यक्त केली. ‘ऑलिम्पिक’सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत रौप्यपदकावर शिक्कमोर्तब केल्यानंतरही मीराबाईने आपल्या मनात हिंदू संस्कृतीच असल्याचे दाखवून दिले. त्याबद्दल तिचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. कारण, मीराबाईने आपल्या कृतीतून हिंदू संस्कृतीला दूषणे देणार्यांना, पूर्वोत्तरातील जनतेला हिंदुत्वापासून तोडणार्यांना चपराक लगावली, तशीच जगालाही आपली संस्कृती नेमकी काय, हे सांगितले. तसेच, मीराबाईच्या या कृतीने तिच्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहणार्यांनाही हिंदू संस्कृतीनुसार जीवन जगण्याचे प्रोत्साहन मिळेल.
मीराबाईबद्दलची आणखी एक माहिती म्हणजे, हनुमान आणि शिवशंकरावर तिची श्रद्धा आहे, परदेशात कुठेही स्पर्धा असेल तरी ती तिच्याबरोबर स्वदेशाची-भारताची माती घेऊनच जाते. परदेशात असताना आपल्याला जन्म देणार्या, आपले पालन-पोषण करणार्या मातृभूमी भारतमातेचे दररोज दर्शन घेता आले नाही, तरी सोबत आणलेली माती मीराबाईचा आत्मविश्वास सदैव उंचावत असते. आताच्या ‘ऑलिम्पिक २०२०’ स्पर्धेवेळीही मीराबाईने आपल्यासोबत भारताची माती नेलेली होती व त्यातूनही तिने स्वदेशाबद्दल कृतज्ञताभावच व्यक्त केला होता. सुरुवातीला संस्कृत सुभाषितात उल्लेख केल्याप्रमाणे मानवातील इतरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुण त्याला सुशोभित करत असतो व मीराबाईने आपल्याला साहाय्य करणार्या ट्रकचालकांच्या पदस्पर्शाने, भारताची माती सोबत ठेवण्याने आपली कृतज्ञतेची हिंदू संस्कृतीच जोपासली आहे व त्यामुळे तिच्या रौप्यपदकाला, चारित्र्याला सुवर्णाची झळाळी प्राप्त झाली आहे, असेच म्हणावे लागेल.