भारताने चीनचा वाढता धोका पाहता त्याला घेरण्यासाठी सातत्याने आश्वासक पावलेही उचलली. जागतिक स्तरावर चीनच्या वर्चस्ववादी, धटिंगणशाही भूमिकेला वैतागलेल्या देशांशी भारताने मैत्रीसंबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला.
गेल्या वर्षी गलवान खोर्यातील हिंसक झटापटीत भारताने चीनला ‘ठकासी महाठक’ धोरणाने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर चीनलाही स्वतःहून गलवान खोर्यातील धुमश्चक्रीत भारताने आपल्याला लोळवल्याचे मान्य करावे लागले. तथापि, दोन्ही देशांतील तणाव निवळावा व सीमावादावर तोडगा निघावा, यासाठी मागील वर्षभरात वरिष्ठ लष्करी अधिकार्यांतील चर्चेच्या अनेक फेर्याही पार पडल्या. त्यावर अजूनही काही ठोस उत्तर निघालेले नाहीच. पण, भारताने चीनचा वाढता धोका पाहता त्याला घेरण्यासाठी सातत्याने आश्वासक पावलेही उचलली. जागतिक स्तरावर चीनच्या वर्चस्ववादी, धटिंगणशाही भूमिकेला वैतागलेल्या देशांशी भारताने मैत्रीसंबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला.
आता भारत चीनला त्याच्याच अंगणात, अर्थात दक्षिण चीन समुद्रात पछाडण्यासाठी आपल्या शक्तिशाली नौदलासह कूच करण्याच्या संपूर्ण तयारीत आहे. दरम्यान, भारतीय नौदल सरळ सरळ युद्धासाठी दक्षिण चीन समुद्रात जात नसून, त्याचा उद्देश युद्धाभ्यासाचा आहे. भारत येत्या काही दिवसांत दक्षिण चीन समुद्रात आपल्या युद्धनौका पाठवणार असून, ‘क्वाड’ गटातील देशांतर्गत होणार्या युद्धाभ्यासात त्या भाग घेतील. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे नौदलही या युद्धाभ्यासात भाग घेणार आहे. चालू आठवड्यातच भारतीय संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीची घोषणा केली. त्यानुसार भारत चार युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दोन महिन्यांसाठी पाठवणार आहे. मात्र, त्यासाठीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
भारताकडून पाठवल्या जाणार्या युद्धनौकांमध्ये एक ‘गाईडेड मिसाईल विनाशिका’, एक ‘गाईडेड मिसाईल फ्रिगेट’, एक सबमरीनविरोधी ‘कॉरवेट’ आणि एक ‘गाईडेड मिसाईल कॉरवेट’ यांचा समावेश आहे. भारतीय युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात होणार्या कितीतरी प्रकारच्या युद्धाभ्यासात भाग घेतील. सोबतच भारतीय नौदलाची अन्य एक तुकडी सिंगापूर, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी देशांच्या बरोबरीनेही दक्षिण चीन समुद्रात युद्धाभ्यास करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, आगामी समुद्री युद्धाभ्यासात भाग घेणार्या सर्वच देशांचा चीनशी छत्तीसचा आकडा आहे आणि दक्षिण चीन समुद्रावरील अधिकाराच्या मुद्द्यावर हा तणाव अधिकच तीव्र स्वरूप धारण करत आला. अशा परिस्थितीत, भारत एका विशिष्ट उद्देशाने दक्षिण चीन समुद्रात नौदलाची रवानगी करत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. चीनला जोखण्याबरोबरच, तुम्ही आमच्याविरोधात एक पाऊलही उचलले, तरी आम्ही तुमच्याविरोधात प्रत्येक बाजूने आघाडी उघडू शकतो, हा स्पष्ट संदेशही भारत यातून देऊ इच्छितो.
तसे आवश्यकही आहे, कारण चीनच्या तना-मनात आपल्या तथाकथित आर्थिक आणि लष्करी महासत्तेचा प्रचंड अहंकार असून, तो शेजारी देशांच्या दमनासाठी सदैव आसुसलेला असतो. त्याच्या शेजारचे छोटे-छोटे देश चीनच्या अजस्र आकारामुळे त्याच्याकडून होणारा अन्याय बर्याचदा निमूटपणे सहनही करत असतात. त्यातूनच चीनला आपण भारताशीही अन्य देशांप्रमाणे वागू शकतो, अशी दिवास्वप्ने पडत असतात. पण, चीनने आरे केले, तर आपणही कारे करण्यासाठी सज्ज आहोत, हे भारत नेहमीच दाखवत आला व गलवानमधील संघर्षानंतर त्याला अधिकच धार आली आहे. दक्षिण चीन समुद्रात होऊ घातलेला ‘क्वाड’ गटांतर्गत देशांचा युद्धाभ्यास व त्यातील भारताच्या समावेशाकडे याच दृष्टीने पाहावे लागेल.
दरम्यान, भारतीय समुद्री सुरक्षेच्या दिशेने केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला आहे. त्यानुसार मोदी सरकारने राष्ट्रीय समुद्री सुरक्षा समन्वयकाचे गठन करण्याचे निश्चित केले आहे. भारतीय नौदलातील सेवारत अथवा सेवानिवृत्त ‘व्हाईस अॅडमिरल’ची या पदावर नियुक्ती केली जाईल. समुद्री सुरक्षा समन्वयक, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या अधीन काम करेल आणि समुद्री सुरक्षा डोमेनवर सरकारचा प्रमुख सल्लागार असेल. दरम्यान, हिंदी महासागरात भारतासाठी धोकादायक ठरू पाहणारा चीन एकविसाव्या शतकातील समुद्री आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या शासकीय आराखड्याचे पुनर्गठन करण्यात यशस्वी ठरला आहे. तर भारत त्याबाबतीत मागे राहिला होता. मात्र, राष्ट्रीय समुद्री सुरक्षा समन्वयकाचे गठन करून भारतही ती कमतरता भरून काढत आहे, तर दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका पाठवण्यातून चीनने भारताकडे डोळे वाकडे करून पाहण्याचा प्रयत्न केल्यास भारत पूर्ण ताकदीनिशी त्याची सरबराई करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही, हेच सांगत आहे.