टोकियो (संदीप चव्हाण) : काही दिवस असे असतात की, तुम्ही विसरू म्हणता विसरता येत नाही. गेली पाच ‘ऑलिम्पिक’ मी ‘कव्हर’ करतोय, पण ‘मेडल’ क्षण ‘कव्हर’ करण्यासाठी आजच्या इतकी दमछाक कधीच झाली नाही. ही तक्रार नाही तर हवाहवासा त्रास आहे. आज दुपारी लवलिनाने बॉक्सिंगमध्ये ‘ब्राँझ मेडल’ जिंकले. संध्याकाळी भारताच्या रवी कुमारने ‘फायनल’ गाठत किमान ‘सिल्व्हर’ नक्की केले. महिला हॉकीला पुरुष संघाप्रमाणे ‘सेमी फायनल’मध्ये पराभव पत्करावा लागला. आता ‘ब्राँझ मेडल’ची दोघांनाही संधी आहे. एकापाठोपाठच्या या लढती. ‘कोविड’मुळे प्रवासावर असलेले निर्बंध आणि दूरदूर असणारी स्टेडियम्स यामुळे आज पुरती दमछाक झाली. एरवी इतर देशांचे पत्रकार ‘मेडल’ जिंकण्याचा क्षण टिपण्यासाठी किती धावपळ करायचे, हे आम्ही पाहायचो आणि त्यांचा हेवा वाटायचा. यंदा भारतीय खेळाडूंनी ती संधी आम्हा पत्रकारांना दिली आणि मायदेशी भारतातसुद्धा सारेजण टीव्हीला चिकटून असणार इतके नक्की.
दिवसाची सुरुवात झाली ती लवलिनाच्या ‘मेडल’ने. ती ‘सेमी फायनल’ हरली, पण तिने ‘ब्राँझ मेडल’ जिंकले. विजेंदरने २००८ च्या बिजींग ‘ऑलिम्पिक’मध्ये तर मेरीकोमने २०१२ च्या लंडन ‘ऑलिम्पिक’मध्ये ‘ब्राँझ मेडल’ जिंकले होते. “हर बार हम ‘ब्राँझ मेडल’ तक आकेही रुक जाते हैं. मैं इस बार ‘गोल्ड’ही जितना चाहती थी...” ‘मेडल’ तर ‘मेडल’च असते. मला ‘गोल्ड’च हवे होते. लवलिनाची ही निरागस प्रतिक्रिया तिच्यासोबत आमच्याही डोळ्यांच्या कडा पाणावणारी होती. ‘मेडल’च्या आधी तिला गरिबीशी दोन हात करावे लागले होते. पोटची भूकच तिला जिंकण्याची ऊर्जा देत होती. लक्षात घ्या आपले पहिलेच ‘ऑलिम्पिक’ लवलिना खेळत होती. त्यात तिच्या वजनी गटाचा यंदा पहिल्यांदाच ‘ऑलिम्पिक’मध्ये समावेश करण्यात आला होता. ‘क्वार्टर फायनल’ आणि या ‘सेमी फायनल’मध्ये तिला दोन ‘वर्ल्ड चॅम्पियमन’ खेळाडूंचा सामना करावा लागला. ‘क्वॉर्टर फायनल’मध्ये तिने नवी दिल्लीत ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’ जिंकणार्या चायनीज तैपेईच्या चेन चीनचा ४ - १ असा पराभव केला, तर ‘सेमी फायनल’मध्ये रशियात झालेली ‘वर्ल्ड चॅम्पियन्सशिप’ जिकणार्या सूरमेनेलीकडून तिला पराभव पत्करावा लागला. या दोन्ही स्पर्धांत लवलिनाला ‘ब्राँझ मेडल’वरच समाधान मानावे लागले होते. “ ‘मेडल’ जिंकलेय, आता मला जरा पिकनिकला जायचे आहे. खूप दिवसांची इच्छा आहे. माहीत नाही मी कधी पूर्ण करू शकेन.” लवलिना मॅच संपल्यावर भरभरून बोलत होती. छोट्या-छोट्या आशाआकांक्षा असणार्या या मुलीची जिद्द मात्र आकाशाला गवसणी घालणारी आहे.
कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी कमालीची उंचावलीय. रवी दहियाने तर ‘फायनल’मध्ये धडक दिलीय. त्याचे ‘गोल्ड’ किंवा ‘सिल्व्हर मेडल’ नक्की झाले. दीपक पुनीयाला ‘सेमी फायनल’मध्ये पराभव पत्कारावा लागलाय, पण त्याचे आव्हान अजूनही कायम आहे. ‘ब्राँझ मेडल’साठी आता तो ‘रेपीचार्ज’मधून येणार्या खेळाडूंसोबत लढेल. जी लवलिनाची कथा तीच रवी दहियाची. हरियाणाच्या सोनपतमधीली नहारी गावचा हा खेळाडू. सतपाल यांच्याकडे त्याने गुरुदक्षिणा घेतली आणि मग गरिबीमुळे त्याच्या खुराकासाठी त्याचे वडील रोज भल्या पहाटे उठून सायकलवरून त्याला दूध पोहोचवायचे. आज वडिलांच्या या मेहनतीचे रवीने चीज केले.
कुस्ती तज्ज्ञांच्या मते या स्पर्धेत महिला कुस्तीपटू फोगट आणि बजरंग पुनीया या दोन स्टार खेळाडूंना ‘मेडल’ची सर्वाधिक संधी होती. रवी आणि दीपकच्या या दिमाखदार कामगिरीमुळे या दोघांचाही आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. त्यामुळे कुस्तीतून ‘मेडल’ची ऐतिहासिक बरसात नक्की अपेक्षित आहे.
भाला फेकीत नीरज वर्मा या खेळाडूने अफाट कामगिरी केलीय. त्याने थेट ८६.६५ मीटर दूर थाळीफेकी करीत पहिल्या क्रमांकाने ‘फायनल’ गाठली. गेल्या रिओ ‘ऑलिम्पिक’मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केश्रॉनने ‘ब्राँझ मेडल’ जिंकताना ८५.३८ मीटर दूर भालाफेक केली होती. त्यामुळे नीरजकडून ‘ऑलिम्पिक’ मेडलची अपेक्षा उंचावली आहे. २० वर्षांखालील वयोगटात २०१६ साली ८६.४८ मीटर दूर भालाफेक करीत नीरजने ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करीत अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. येत्या 7 ऑगस्टला नीरज आता ‘फायनल’ खेळेल. त्याच्या उंच झेपावणार्या भाल्यासहीत भारताच्या क्रीडा संस्कृतीलाही तोवर नवी अस्मानी उंची लाभली असेल.