अफगाणिस्तानसारख्या देशावर तालिबान्यांनी सत्ता मिळवली खरी; परंतु आकारमानाने छोट्या असलेल्या पंजशीरमुळे त्यांच्या नाकी नऊ आले आहेत. या भागावर सत्ता मिळवणे तालिबानला आजपर्यंत शक्य झालेले नाही. या अभेद्य दुर्गाला तालिबानी खिंडार पाडू शकणार नाहीत, याचे कारण पंजशीरचा इतिहास.
पंजशीरच्या पर्वतरांगा तालिबांन्यांपुढे आ वासून उभ्या आहेत. त्यांच्या विरोधाचे प्रतीक बनत आहेत. शेर अहमद शाह मसूद यांचा बालेकिल्ला असलेल्या पंजशीरमध्ये आता त्यांचा पुत्र अहमद मसूद सक्रिय झाला आहे. अशरफ घनी सरकारमध्ये उपराष्ट्रपती असलेल्या अमरुल्लाह सालेह यांनीही त्याला पाठिंबा दर्शवला आहे. तालिबानींना पंजशीरचा इतिहास आणि भूगोल पाहता इथे डेरा जमवणे कधीही शक्य होणार नाही.
काबूलहून केवळ १५० किमी दूर असलेल्या उत्तरेकडील भूभागांमध्ये वसलेले पंजशीर हे हिंदुकुशच्या डोंगराजवळ आहे. पंजशीरचा उत्तरी भाग हा पर्वतरांगांनी घेरलेला आहे. दक्षिणेत कुहेस्तानच्या डोंगर-दर्यांनी घेरला असून, वर्षभर हा भाग बर्फाच्छादित असतो. अशाप्रकारच्या पर्वतांच्या वेढ्यामुळे हा भाग दुर्गम राहिला. मात्र, हीच परिस्थिती आता पंजशीरला तालिबान्यांना रोखण्यास कामी येत आहे.
मध्यपूर्व काळात हा प्रदेश चांदीच्या उत्खननासाठी प्रसिद्ध होता. आताही या भागात पाचूचा व्यवसाय होता. याचा योग्य वापर झाल्यास पाचूच्या खाणींचे मोठे भांडार उपलब्ध होऊ शकते. १९८५ मध्ये या भागात १९० कॅरेटचा क्रिस्टल आढळला होता. कोलंबियामधील खाणींत ज्या प्रकारचे क्रिस्टल आढळतात, तशाच प्रकारचा गुणधर्म इथल्या क्रिस्टलचा आहे. जर योग्य पद्धतीने वापर झाल्यास इथे एक मोठे खाणींचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होते. तसे झाल्यास या भागाचा विकास शक्य आहे.
या भागात तालिबान पाय का रोवू शकला नाही, याचाही एक इतिहास आहे. १९८०च्या दशकात सोव्हिएत संघाची सत्ता होती. त्यानंतर १९९०च्या दशकात तालिबानला अहमद शाह मसूदने या भागात पाऊल ठेवायला दिले नाही. पूर्वी पंजशीर हा परवान प्रांताचा भाग होता.
२००४च्या पंजशीरला वेगळा दर्जा मिळाला. स्वातंत्र्याचा विचार केला, तर दीड लाख लोकसंख्या असलेल्या भागात ताजिक समूहाचे वर्चस्व आहे. मे २०२१ नंतर तालिबानने एक एक करत ताबा मिळवण्यास सुरुवात केली. मात्र, इथे अनेक जण शरणार्थी म्हणून आले. तालिबान इथे पोहोचणार नाही, असा विश्वास शरणार्थींना होता. हा विश्वास अजूनही सार्थ ठरत आहे. मात्र, पूर्वीपेक्षा जास्त मजबूत स्थितीत आहे. तरीही पंजशीर तालिबानच्या कब्जापासून दूर आहे.
तालिबानला सध्या चीन, रशिया, इराणचे समर्थन आहे. त्यातही पंजशीरच्या सैनिकांना आंतरराष्ट्रीय मदत मिळणार की नाही, याबद्दलही साशंकता आहे. अहमद शाह मसूदच्या मुलानेही आपण आपली योद्धाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय मदत हवी आहे. अफगाण सरकारनेही या भागात झपाट्याने विकास केला नाही. या भागाचे महत्त्व समजून इथे तालिबान्यांना रोखण्यासाठी तळ बनविणे शक्य होते. मात्र, इच्छाशक्तीचा अभाव, रणनीतीचा अभाव यामुळे इथल्या जागेचे महत्त्व अफगाणिस्ताला अद्याप कळलेच नाही. इथली ५१२ गावे आणि सात जिल्ह्यांमध्ये अद्याप पाणी आणि वीजही पोहोचू शकलेली नाही, हे दुर्दैव.
सध्या पंजशीरला तालिबानने घेरले असून त्यांच्या जीवनावश्यक वस्तूची वाहतूक अडवण्याची एक प्रक्रिया सुरू होईल. त्यातूनच पंजशीरचे पतन करण्याचा प्रयत्न तालिबानी करणार आहेत. तरीही वर्षभर तालिबानी पंजशीरची रसद थांबवू शकत नाहीत, तितका पुरेसा साठा त्यांच्याजवळ आहे, असे एक वृत्त आहे. तालिबान्यांशी लढण्यासाठी पंजशीरच्या सैनिकांकडे पुरेसा वेळ आहे. त्यांना इथून आंतरराष्ट्रीय मदतीची गरज आहे.
१९९६ मध्ये तालिबानने काबूलवर ताबा मिळवला होता. तिथे सत्ता आल्यानंतर राष्ट्रपती बुरहानुद्दीन रब्बानी आणि संरक्षणमंत्री अहमद शाह मसूद हे आपल्या सहकार्यांसह अफगाणिस्तानात आले. त्यावेळी ‘नॉर्दन अलायन्स’ची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून तालिबान्यांच्या विरोधातील ही लढाई सुरू आहे. याच ‘नॉर्दन अलायन्स’च्या मदतीने तालिबान्यांना हुसकावण्यात आले होते. आता ही लढाई ३२ वर्षीय अहमद मसूद करत आहेत. चारही बाजूंनी तालिबान्यांनी वेढल्यावर आता लढाई एक लहानसा प्रदेश कसा करणार? तालिबान्यांशी लढून इतिहास रचणार की इतिहास होणार हे येणारा काळ ठरवेल!