मिशन ऑलिम्पिक : आता जिंकायचंच...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2021   
Total Views |

sas_1  H x W: 0
 
 
 
टोकियो (संदीप चव्हाण) : जिंकायचे सर्वांनाच असते, पण जिंकण्यासाठी अपार मेहनत घेण्याची जिद्द काहीच जण दाखवतात. जे त्यात सातत्य राखतात, ते चॅम्पियन बनतात. पुरुष हॉकी पाठोपाठ महिला हॉकी संघानेही ‘ऑलिम्पिक’ची ‘फायनल’ गाठत जिंकण्याची ही जिद्द दाखवली. भारतीय महिलांच्या हॉकी संघाने तर यंदाच्या ऑलिम्पिकमधील सर्वात सनसनाटी निर्णय नोंदविला आहे. साखळीतील पहिल्या तीन सामन्यांत मानहानिकारक पराभव पदरी पडल्यावर खरेतर कोणताही संघ मोडून पडेल. पण भारतीय महिलांनी त्या निराशेच्या राखेतून जणू ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे झेप घेतली. साखळीत आपण चौथ्या क्रमांकावर कसेबसे पोहोचलो. शेवटच्या लढतीत ब्रिटनने आयर्लंडचा पराभव केल्यामुळे भारताला ब्रिटनच्या कृपेने ‘क्वार्टर फायनल’चे तिकीट मिळाले आणि समोर आव्हान आले ते ‘ब गटा’तील बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी. बलाढ्य म्हणजे किती तर ऑस्ट्रेलियाने साखळीतील आपले सगळे म्हणजे पाचही सामने जिंकले, तेही दणक्यात. म्हणजे या पाच सामन्यांत मिळून ऑस्ट्रेलियाने एकूण १३ गोल केले, तर प्रतिस्पर्धी पाच संघांना मिळून ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक गोल करता आला. आज भारताने दुसरा गोल नोंदविला आणि तीन वेळा ‘ऑलिम्पिक’चे सुवर्णपदक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास केला.
 
 
 
१९८० च्या मॉस्को ‘ऑलिम्पिक’मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने सहा देशांत चौथा क्रमांक पटकावला होता. ती आजवरची सर्वोत्तम कामगिरी होती. गेल्या ४१ वर्षांत पहिल्यांदा भारतीय महिला हॉकी संघ ‘सेमी फायनल’ला धडकलाय. पुरुष संघाच्या संघर्षपूर्ण विजयानंतर भारतीय महिला हॉकी संघाची ही कामगिरी मेडलच्या आशा तर उंचावणारी आहेच, पण एकूणच भारतीय हॉकीला आलेली मरगळ झटकून टाकणारी आहे. संघटनात्मक वादाने भारतीय संघपुरता पोखरून गेलाय. निवडणुकीचे वाद कोर्टापर्यंत धडकलेत. २००८ सालच्या बीजिंग ‘ऑलिम्पिक’ला तर भारतीय संघ ‘ऑलिम्पिक’लाही पात्र ठरू शकला नव्हता. ‘ऑलिम्पिक’च्या इतिहासातील भारतासाठी ही लाजिरवाणी घटना होती. पहिल्यांदाचा ‘ऑलिम्पिक’ भारताशिवाय होत होते. त्यानंतर लंडन ‘ऑलिम्पिक’मध्ये भारत बारावा आला एकही सामना भारताला जिंकता आला नाही. गेल्या ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये भारतीय हॉकी संघ आठवा आला होता. पण कॅप्टन मनप्रितसिंगने टीमचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. गोलकीपर श्रीजेशच्या रुपाने त्याला भिंतच लाभली आहे. हाच चमत्कार कॅप्टन राणी रामपालने महिलांच्या टीममध्ये करून दाखवला आहे. तुम्हाला शहारूख खानचा ‘चक दे इंडिया’ सिनेमा आठवतो का? त्यात त्याचा एक ‘डायलॉग’ आहे. “मुझे स्टेट के नाम ना सुनाई देता हैं ना दिखाई देते हैं । सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता हैं। इंडिया...” या दोन्ही टीमना संघटनेतील वादाचे काहीच पडले नाही. त्यांना फक्त इंडिया माहीतीय. आज ऑलिम्पिकच्या क्रीडा नगरीत गेलो होतो. तेथे या हॉकी टीममधील काही खेळाडू दिसले. त्यांची देहबोली हेच सांगत होती आता फक्त जिंकायाचेच...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@