अखंड भारताचे ऋणानुबंध उलगडणार्या वयाच्या शंभरीत पदार्पण करणार्या स्वातंत्र्यपूर्व काळाच्या साक्षीदार स्नेहलता वझे यांच्याविषयी...
पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील एका छोट्या गावात आजच्या दिवशी म्हणजे ३ ऑगस्ट, १९२२ रोजी जन्मलेल्या देशभक्त कुटुंबातील एका गोंडस कन्येची ही चित्तरकथा. लाहोरमध्ये शिकलेली, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याचा संघर्ष जवळून पाहिलेली ही मुलगी महाराष्ट्राची सून झाली. त्यानंतर पुढे अखंड भारताचे ऋणानुबंध तब्बल १०० वर्षे ‘स्नेहलता’ होऊन जपते आहे. मुंबईमध्ये शिक्षक म्हणून संपूर्ण आयुष्य वेचून नवी पिढी घडवण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. वयाची शताब्दी साजरी करण्यासाठी सज्ज असलेल्या स्नेहलता याना अखंड भारताची ‘स्नेहलता’ म्हटल्यास वावगे ठरू नये.
पंजाब राज्यातील जालंधर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या, प्रेमळ व मध्यमवर्गीय कुटुंबात हरदत्त शर्मा उर्फ बाबूजी यांच्या घरी स्वातंत्र्यापूर्वी पहिल्या मुलानंतर एका गोंडस मुलीचा जन्म झाला. मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मी असते असे म्हणतात, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. परंतु, मुलीच्या जन्मानंतर तिच्या नामकरण समारंभामध्ये जन्मपत्रिका बनवताना ग्रहदशा पाहून पंडितही अवाक झाले. कुटुंबीयांना ही मुलगी ‘अल्पायुषी’ असल्याचे सांगितल्याने घरच्यांना धक्का बसला. परंतु, त्यानंतरही आई-वडिलांनी मुलीचे नाव ‘स्नेहलता’ अर्थात स्नेह म्हणजे प्रेम आणि लता म्हणजे वेल अशा प्रेमाचा वेल, असे नाव ठेवले. परंतु, हीच मुलगी आपल्या आयुष्याचे भाकित खोटे ठरवून दीर्घायुषी ठरत आज आयुष्याची शताब्दी साजरी करीत आहे.
स्वातंत्र्यपूर्वीचा काळ असल्याने सगळीकडे देशभर स्वातंत्र्यासाठी आंदोलने, मोर्चे, सभा चालू होत्या. स्नेहलता यांचे वडील हरदत्त शर्मा आणि श्रीधर गणेश वझे दोघेही ‘सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी’चे सक्रिय सभासद व लाईफ मेंबर होते. एक लाहोरमध्ये आणि दुसरे पुण्यामध्ये कार्यरत होते. दोघेही सोसायटीच्या मिटिंगनिमित्त देशभरात पुणे, मुंबई येथे वारंवार प्रवास करीत असत. हरदत्त शर्मा उर्फ बाबूजी आणि श्रीधर गणेश वझे उर्फ काका दोघे मित्र एकत्र काम करीत होते. त्यांचे स्वभाव सारखे, दोघांतही एकवाक्यता, एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि दोघांनीही ब्रिटिशांची चाकरी ठोकरली होती. स्नेहलता यांचे बालपण, संगोपन तसेच प्राथमिक, माध्यमिक शिक्षण लाहोर येथे झाले, मध्यमवर्गीय कुटुंबातील बाबूजींची कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच होती. तरीही त्यांनी मुलांना कधी काहीही कमी पडू दिले नाही. स्नेहलता यांना अध्यापन क्षेत्राची फार आवड होती म्हणून त्यांनी १९४३ मध्ये कला शाखेची (बीए) पदवी धारण केल्यानंतर १९४४ मध्ये ‘बॅचलर ऑफ टीचिंग’ (बीटी) म्हणजे आताचे ‘बी.एड.’ लाहोर कॉलेज ऑफ वुमन युनिव्हर्सिटी, लाहोर येथून पूर्ण केले. बाबूजी एकदा मिटिंगच्या निमित्ताने पुण्याला आले होते. तेव्हा त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्नेहलता बाबूजींबरोबर पुण्यात आल्या होत्या. तेथूनच त्यांचे महाराष्ट्राशी असलेले नाते अधिक वृद्धिंगत झाले. श्रीधर वझे यांच्या कुटुंबाशी असलेले मैत्रीचे संबंध अखेर नात्यामध्ये रूपांतरित झाले. श्रीधरपंत यांचा मुलगा मोरेश्वर वझे यांच्याशी स्नेहलता यांचा विवाह झाला अन् त्या महाराष्ट्राच्या स्नुषा बनल्या.
त्या काळी लग्न व सोयरीक करण्यात समाजाचा वेगळा पगडा होता, तर दुसरे म्हणजे परप्रांतातील मुलगी इकडे पंजाब आणि महाराष्ट्राची मने, संस्कृती, भाषा, राहणीमान, आवडी-निवडी कशा जुळवेल, अशा नानाविध शंका होत्या. परंतु, या शंका तिळमात्र ठरल्या. त्या काळात या लग्नाची शिफारस करणार्यांमध्ये स्वातंत्र्यसेनानी, भारतीय संविधान समितीचे सदस्य हृदयनाथ कुंझरू यांचा समावेश होता. स्नेहलता व मोरेश्वर याचे लग्न लाहोर येथे पूर्णपणे पंजाबी पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात पार पडले. लग्नास अनेक स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्रीयन मंडळी अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेमध्ये उपस्थित होती. योगायोग असा की, वझे यांच्या मुलाचं लग्न लाहोर येथे आहे, असे समजल्यावर त्यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू देवधर हे क्रिकेट सामन्यानिमित्त लाहोरला आल्यामुळे विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. अशी आठवणही त्या सांगतात.
स्नेहलताने परप्रांतातून येऊन मराठी भाषाच नाही, तर मराठी संस्कृतीदेखील लीलया आत्मसात केली, याचं सगळ्यांनाच कौतुक होतं. स्नेहलता यांनी अनेक वर्षं गिरगाव मुंबई येथील बाई रतनबाई पावरी शाळेत नोकरी केली. त्या गणित आणि इंग्रजी विषय शिकवायच्या. एकदम कडक शिस्तीच्या असल्यामुळे त्या स्वतःच म्हणायच्या की, “शाळेत काही मी ‘लोकप्रिय’ वगैरे अजिबात नाही. पण, मी ‘शिस्तप्रिय’ आहे.” मुलांना समजेल असे विषय सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. एकदा त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “प्रत्येकाने पारंपरिक भारतीय वेशभूषा करून भारतातील राज्यांचा नकाशा काढून आणायचा” आणि दुसर्या दिवशी शाळेत संपूर्ण भारताचा नकाशाच अवतरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक राज्याची आणि प्रांताची इत्थंभूत माहिती व्हायची, प्रामुख्याने या गोष्टीची दखल घेऊन शाळेनेही त्यांना प्रोत्साहित केले होते. देशाचा भूगोल आणि संस्कृतीची जाण विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न, तसेच भारताच्या नकाशामधील एकसंधपणाबद्दलचा आग्रह यातून दिसून येतो.
कौटुंबिक आयुष्यामध्येही त्यांनी अग्रेसर राहून आपल्या मुलांमध्येही शिक्षणाबद्दलचे प्रेम अधिक वाढवले. त्यामुळेच त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवास पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीला आणि मग अहमदाबाद येथे, तर कनिष्ठ चिरंजीवाला ‘आयआयटी’ कानपूरला पाठवलं. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला नाही, त्यामुळेच मोठा मुलगा अच्युत वझे ‘टीव्ही’ मालिकांमधील मनोरंजन विश्वात प्रख्यात आहे, तर कनिष्ठ पुत्र डॉ. विनोद ‘आयआयटीयन्स’ असून, मुलीनेही ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून ‘एमएससी इन केमिस्ट्री’ पूर्ण केली आहे. स्नेहलता वयाच्या शंभरीत प्रवेश करत असतानाही या आयुष्यामध्ये त्यांच्या प्रकृतीने त्यांना चांगली साथ दिली. आजपर्यंतच्या आयुष्यात कधीही त्यांना रुग्णालयाची पायरी चढावी लागली नसल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. त्यांच्या शिस्तबद्ध आयुष्यामुळे, संतुलित आणि पौष्टिक आहारामुळेच त्यांनी इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे. तसेच वयाच्या या उत्तरायणातही स्वयंपूर्ण असण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. मुले निवृत्त झालीत, तर नातवंडे, पतवंडेदेखील उच्चपदावर आहेत. अशा समाधानी जीवन जगणार्या स्नेहलता यांना उर्वरित आयुष्यासाठी तसेच वाढदिनानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या आरोग्यदायी शुभेच्छा!