नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) काबुल एयरपोर्टवर झालेल्या बॉम्ब हल्ल्या प्रकरणी आपली भूमिका जाहीर केली आहे. याबद्दल जाहीर केलेल्या एका परिपत्रकातून तालीबानचे नाव हटविण्यात आले आहे. ज्यावेळी काबूलवर तालीबानने कब्जा केला त्यानंतर आता युएनची भूमिका बदलत आहे. यापूर्वी केलेले विधान आणि आत्ताचे विधान यात तफावत आढळल्याने युएनच्या भूमिकेवरच आता साशंकता व्यक्त केली जात आहे.
तालीबान्यांनी काबूल विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर जाहीर केलेल्या सुरक्षा परिषदेत चेतावनी दिली होती. तालीबान्यांनी इतर देशांतील दहशतवाद्यांशी कुठलेही संबंध ठेवू नयेत, असा इशारा देण्यात आला होता. आता नव्या विधानात तालीबानचे नावच हटवून टाकले आहे. त्याऐवजी असे म्हटले आहे की, कुठल्याही अफगाणी समुहाने देशात दहशतवाद पसरवणाऱ्यांशी सहकार्य करू नये, असे म्हटले आहे.
या वक्तव्यावर भारतातर्फेही स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारत १ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदावर आहे. गेल्या वर्षी एप्रिलपर्यंत संयुक्त राष्ट्र संघांचे प्रतिनिधी असलेल्या सय्यद अकबरुद्दीन यांनी युएन परिषदेच्या तफावत असलेल्या विधानावर बोट ठेवले आहे. १९ ऑगस्ट रोजी जेव्हा भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, "आम्ही सध्या तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत."
भारताने काबुलहून आपल्या मिशन स्टाफला पहिल्यांदाच बाहेर आणले. गेल्या आठवड्यात तालिबानी अफगानिस्तानातील भारतीय दूतावासात घुसले होते. त्यानंतर त्यांना मिळालेली कागदपत्रे घेऊन पार्कींगमध्ये घेऊन गेले होते. याबद्दल सरकारी सुत्रांनी चिंता व्यक्त केली होती.