प्रत्येक पुस्तक तुम्हाला एक नवा अनुभव देते. एक नवी कहाणी सांगते. पण, एखादे पुस्तक असे असते जे एखाद्या भाषेच्या साहित्यविश्वात घटना ठरावे, अशी घटना जिचे पडसाद दीर्घकाळ जाणवत राहतील, दूरगामी ठरतील अशी एक महत्त्वाची साहित्यिक घटना म्हणजे डॉ. अरुणा ढेरे लिखित ‘लल्ला’ हे पुस्तक असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
खरेतर हे पुस्तक म्हणजे सर्वस्वी अपरिचित प्रदेशाची मुशाफिरी आहे. पुस्तकाचे शीर्षक असणारी ‘लल्ला’ आपल्याला सर्वथा अपरिचित अशी. ही लल्ला म्हणजे चौदाव्या शतकात काश्मीरमध्ये होऊन गेलेली एक संतकवयित्री. ही एक फिरस्ती जोगीण. गातगात हिंडणारी. तिच्या रचना म्हणजे वाक्. ६०० वर्षांहूनही अधिक काळ काश्मिरी जनतेने तिचे वाक्मौखिक परंपरेने जपले. मराठी संतांचे अभंग जसे जनमानसाने सांभाळले तसेच लल्लाचे वाक्, तिची कहाणी झेलमच्या काठी रुजली, बहरली. काश्मीरच्या खोर्यातील बायका व्हरांड्यात बसून शाली विणताना लल्लाची गाणी गात. सणा समारंभाला, धार्मिक कार्यक्रमांमधून त्यांचे एकत्रित गायन होई. आजही होते. काश्मीरबाहेर मात्र लल्ला आजही फारशी परिचित नाही. महाराष्ट्रातील मुक्ताई-जनाबाई किंवा राजस्थानच्या मीराबाईंच्याच गोत्रातील ही संतकवयित्री. तिचे काव्य काश्मिरी बोलीभाषेतले. ग्रांथिक भाषेचा तिला स्पर्श झालेला नाही. अरुणाताईंच्या प्रयत्नातून ही अपरिचित लल्ला आपल्याला भेटते. कोर्या कागदावर चित्रकाराच्या सफाईदार कुंचल्याने काही फटकारे उमटावेत आणि बघता बघता अगम्य रेषांमधून सुबक आकार दृष्टीस पडावेत, तसे आपण लल्लाच्या कहाणीत गुंतत जातो. कहाणी असे म्हटले तरी हे पुस्तक दोन भागांत विभागले आहे. पहिला भाग आहे लल्लाचा परिचय करून देणारी दीर्घ प्रस्तावना आणि दुसरा भाग म्हणजे लल्लाचे वाक्. या दुसर्या भागात लल्लाचे मूळ काश्मिरी वाक् रोमन लिपीत छापले आहेत, त्याखाली शफी शौक यांनी केलेला इंग्रजी अनुवाद आणि त्या खालोखाल अरुणाताईंचा मराठी अनुवाद अशी साधारण रचना आहे. तसेच पुढे कठीण वाक् स्पष्ट करणार्या टिपाही दिल्या आहेत. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हा खरेतर अनुवादाचा अनुवाद आहे. अशा प्रकारचा अनुवाद साधणे ही तारेवरची कसरत आहे, यात शंका नाही. मूळ काश्मिरी भाषा ठाऊक नसल्यामुळे इंग्रजी अनुवादच आधाराला घेणे येथे क्रमप्राप्त होते. पण, हे मराठी वाक् अतिशय वेधक झाले आहेत. इथे संस्कृत भाषेत अनुवाद या शब्दाचा जो मूळ अर्थ त्याची नकळत आठवण होते. अनु+वाद = पाठोपाठ म्हणणे, गुरूने केलेल्या गोष्टींचा त्याच्या पाठोपाठ पुनरुच्चार करणे हा अनुवादाचा मूळ अर्थ. त्या अर्थाच्या आधारे म्हणावेसे वाटते की, लल्लाच्या उद्गारांचा अरुणा ढेरे अनुवाद करत आहेत. केवळ शब्दांचा नव्हे तर त्यामागे असणार्या निर्भयतेचा, विवेकाचा, संवेदनशीलतेचा, परिपक्वतेचाही पुनरुच्चार इथे होतो आहे.
माझ्या गुरूने मला फक्त एक शिकवला धडा,
आत वळायचे तर बाहेरची साथ सोडून जा
हेच मी सांगते, माझ्या वचनांतून आणि गीतांतून
आणि फिरत राहते कोणत्याही आवरणावाचून
हे तिचे अध्यात्म आहे. बाह्यजगाचा तिने विचारपूर्वक त्याग केला आहे. पण, आजूबाजूच्या जगात काय घडतंय याची तिला जाण आहे. प्रस्थापित समाजाला थेट प्रश्न विचारण्याचे धाडसही आहे.
तुमचे देऊळ दगडाचे आणि मूर्तीही दगडाची!
सगळे वरपासून खालपर्यंत दगडच आहे. तुम्ही पूजा करता कुणाची?
तुम्हाला पांघरण्याची लोकर देतो, थंडीपासून तुमचे संरक्षण करतो.
तुमच्याकडे काहीही न मागता गवत खाऊन, पाणी पिऊन जगतो.
त्या जीवंत बकर्याला निर्जीव दगडापुढे बळी देता, मूर्ख पंडितांनो?
यासारख्या वाक् तिच्या बंडखोर वृत्तीची साक्ष देतात. तिच्या उपमा, प्रतीके, प्रतिमा मोहून टाकणार्या आहेत. अर्थ न समजून घेता पाठांतर म्हणजे पाणी घुसळणे किंवा अज्ञानी माणसाला उपदेश करणे म्हणजे चांदीच्या शुभ्र बैलाला साखर चारणे असे ती सहज लिहून जाते.
व्यक्ती म्हणून लल्लेविषयी फार माहिती उपलब्ध नाही. तिच्या जन्म-मृत्यूविषयीही निश्चित माहिती नाही. मध्ययुगात संपूर्ण भारत देशात स्त्रियांची जी स्थिती होती तीच तिचीसुद्धा होती. सासरी होणारा छळ, संशय, उपासमार तिच्याही नशिबी होते. पण, ज्याप्रमाणे कृष्णध्यासाने मीरेने राजमहालातील सौख्याचा, सासर-माहेराचा त्याग केला, तसेच धाडस अंतिम सत्याचा शोध घेणार्या लल्लेने केलेले दिसते. लल्ला असामान्य यासाठी ठरते, कारण व्यावहारिक परीघ ओलांडून असिमाची वाट चालू लागण्याचे आध्यात्मिक सामर्थ्य तिच्याकडे आहे. लल्लाने घर त्यागले आणि ती सार्या काश्मीर खोर्यात भटकत राहिली. तिचे वाक् काश्मीर खोर्यात निनादले आणि काश्मिरी जनतेने ते आपलेसे केले. कारण जीवनसत्यांना स्पर्श करणारे तिचे वाक् काव्याचा उत्कृष्ट नमुना तर आहेतच; पण विलक्षण प्रत्ययकारी आहेत. त्यामध्ये कबिराच्या दोह्यांसारखे शहाणपण साठवले आहे, मीराबाईंच्या भजनासारखी भक्तीतील उन्मनी भावना आहे, जनाबाईंच्या अभंगात डोकावते तसे नकळत डोकावणारे बाईपण आहे आणि मुक्ताईच्या अभंगासारखे परिपक्व ज्ञातृपदही आहे. लल्ला साधकही आहे आणि मार्गदर्शकही. वाक्चा हा खजिना मराठीत उपलब्ध होणे, हे गुप्तधन प्राप्त होण्यासारखेच आहे. समग्र लल्ला भाषांतरित स्वरूपात मराठीत आणण्याचा हा प्रयत्न सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एक महत्त्वाची साहित्यिक घटना आहे.
आणखी एका दृष्टीने या पुस्तकाचे मोल मोठे ठरते. हे पुस्तक वाचताना आपल्याच भारत देशाची आपल्याला किती अल्प ओळख आहे, याची नव्याने आणि प्रकर्षाने जाणीव होते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेला संदर्भग्रंथाचे मूल्य आहे, असेच म्हणायला हवे. काश्मीर हे प्राचीन काळापासून गाजलेले शारदापीठ. कविता आणि केशर जिथे एकसाथ उगवते, अशी ही शारदेची भूमी. तिथे पांडित्याची एक मोठी परंपरा जोपासली गेली. स्त्रियाही या परंपरेचा दीर्घकाळ भाग असलेल्या दिसतात. लल्लाही एका ज्ञानोपासक पंडिताची शिष्या होती. काश्मीरच्या शैव संप्रदायाशी ती निगडित होती. लल्लेच्या निमित्ताने प्रस्तावनेत मांडलेला काश्मीरच्या तत्त्वज्ञानाचा इतिहास मुळातून वाचण्यासारखा आहे. चौदावे शतक हा काश्मीरमध्ये सुफी संप्रदाय विसावण्याचाही काळ. त्याचेही पडसाद या काव्यात आढळतात. पण, आपल्याला विलक्षण मोहित करतो तो काश्मीर आणि महाराष्ट्राला जोडणारा नाथसंप्रदायाचा धागा. काश्मीरचे भूषण मानले गेलेले, संस्कृत साहित्य, तत्त्वज्ञान याचे मुकुटमणी मानले जाणारे अभिनवगुप्त यांचे पणजोबा महाराष्ट्रातून काश्मीरला गेले, यांसारख्या संदर्भांनी कोण रोमांचित होणार नाही! अरुणा ढेरे यांनी अलीकडेच प्रशांत तळणीकर यांच्या समवेत कल्हणाच्या ‘राजतरंगिणी’ या महाग्रंथाचा अनुवाद प्रसिद्ध केला. तीही एक फार मोठी साहित्यिक भर आहे. हे पुस्तक त्याच धारेतील एक पुढील तरंग म्हणता येईल. हे दोन्ही ग्रंथ प्रत्यक्ष अवतरण्यामागे प्रमुख भूमिका असलेले संजय नहार यांचा विशेष उल्लेख करायला हवा.
माझे हे लिखाण म्हणजे काही रूढार्थाने या पुस्तकाचे समीक्षण नव्हे उलट हा ‘युरेका, युरेका’ असा आनंद चित्कार आहे. साहित्यिका, समीक्षिका, संस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक म्हणून अरुणा ढेरे यांच्याकडून आपल्या वाचक म्हणून ज्या अपेक्षा आहेत, ते हे पुस्तक पूर्ण करतेच. त्यांच्या प्रासादिक, रसाळ शैलीमुळे, वेचक-वेधक शब्दकळेमुळे वाक्-ना दाद देताना ही दाद लल्लाला की अरुणा ढेरे यांना, असा प्रश्न पडतो. हे पुस्तक जाणिवांना समृद्ध करणारा अनुभव देते, मनाच्या गाभार्यात ओंकारासारखे भरून राहते, एका प्रकाशाच्या प्रदेशात घेऊन जाते. म्हणून साहित्यविश्वातील ही महत्त्वाची घटना रटाळ ब्रेकिंग न्यूजच्या पसार्यात हरवू नये, उलट तीच ठळक घटना ठरावी, हीच एक रसिक वाचक म्हणून मनापासून इच्छा.
लल्ला - अरुणा ढेरे
प्रकाशक - मुद्रक - चिनार पब्लिशर्स, सरहद, पुणे
प्रथम आवृत्ती - फेब्रुवारी २०२१
- डॉ. समिरा गुजर-जोशी