१९९१ साली सोव्हिएत साम्राज्यच कोसळलं आणि त्याची प्रजासत्ताके स्वतंत्र देश बनले. म्हणून युरोपीय विद्वानांचं म्हणणं असं की, हे सगळे देश या वर्षी ३० वर्षांचे झाले. पण त्या देशांना तसं वाटत नाही. त्यांना आपला किमान ५०० वर्षांचा इतिहास चांगलाच अवगत आहे आणि हे ते ठणकावून सांगत आहेत. चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून मांडत आहेत.पाहा एक भक्कम किल्ला. अमुदर्या आणि सिरदर्या नद्यांच्या खोर्यांमधून अरल समुद्राकडे जाणार्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणारं एक लष्करी ठाणं. पण, ते पाहा, त्या किल्ल्याजवळच्या एक खिंडीतून आक्रमकांचं एक सैन्य गर्जना करीत त्या किल्ल्यावर चाल करून येतंय. भाले आणि तलवारी परजीत आक्रमक घोडेस्वार किल्ल्याकडे दौडत सुटलेत. त्यांची म्होरकी एक स्त्री आहे. तिच्या अंगात चिलखत आहे. मस्तकावर शिरस्त्राण आहे. हातात धनुष्य आहे आणि पाठीवर पोलादी बाणांनी भरलेला भाता आहे. चौखूर घोडा उधळीत ती स्त्री सेनापती किल्ल्याच्या पहिल्या संरक्षक फळीवर तुटून पडते आहे. आता हातघाईची कचाकची होणार.तेवढ्यात कुठूनतरी आवाज येतो, “ओके कट!” कॅमेरा थांबतो, कॅमेर्याच्या कक्षेबाहेरचे प्रॉडक्शनवाले लोक पुढे येतात आणि पुढच्या दृश्याची तयारी करू लागतात. रणावेश संचारल्याचा अभिनय करणारी ती स्त्री शांतपणे आपल्या घोळदार झग्यातून मोबाईल बाहेर काढते आणि ‘व्हॉटसअॅप’वरचे संदेश पाहू लागते.
बरोबर. ते खरं युद्ध नव्हतं, तर युद्धाच्या प्रसंगाचं चित्रीकरण होतं. स्थळ होतं कझाकस्तान या मध्य आशियाई देशाची राजधानी अस्ताना उर्फ नूर सुलतान या अत्याधुनिक शहरातला एक स्टुडिओ. कझाकस्तानच्या इतिहासातील एका कथेवर आधारित चित्रपट बनवणारे निर्माता-दिग्दर्शक-लेखक त्या चित्रपटाद्वारे लोकांना सांगू इच्छितात की, आमचा देश किमान ५०० वर्षांचा आहे.
युरोपीय लोक आणि युरोपचाच विस्तार असलेले अमेरिकन लोक यांना आशिया खंडाबद्दल एक प्रकारचा न्यूनगंडही आहे आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून अहंगंडही आहे. न्यूनगंड अशासाठी की, युरोप खंडाचा इतिहास आणि संस्कृती ही ग्रीक गणराज्यांपासून सुरू होते, म्हणजेच इ.स.पूर्व ४०० ते ५०० वर्षांच्या मागे काही ती जात नाही आणि आशिया खंडातले एकेक देश पाहा; तो इराक, तो इराण तो सीरिया, पॅलेस्टाईन, चीन, मंगोलिया सगळ्यांचे इतिहास, त्यांची अफाट साम्राज्यं, त्यांचे उपासना संप्रदाय सगळे बघावे, तर इ.स.पूर्व दोन-चार हजार वर्षांमागे जाऊन पोहोचतात, म्हणजे आपल्याला असा प्राचीन वारसा नाही, याची युरोपियन गोर्या लोकांना खंत वाटते. हा न्यूनगंड.
पण, इ.स.पूर्व चौथ्या शतकात होऊन गेलेल्या युरोपीय अलेक्झांडरने नेमकी हीच सगळी साम्राज्यं जिंकून धुळीला मिळवली. शिवाय, नजीकच्या इतिहासात म्हणजे इ.स.च्या १६ व्या शतकापासून पुढच्या काळात स्पेन, पोर्तुगाल, इटली, इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, डेन्मार्क, जर्मनी या युरोपीय गोर्या देशांनी जगातले सगळे जुने देश जिंकले. अमेरिका, ऑस्ट्रेलियासारखे नवे देश निर्माण केले आणि जगभर आपली साम्राज्ये पसरवली. म्हणजे ‘सगळं जग जिंकण्याची अलेक्झांडरची महत्त्वाकांक्षा आम्ही पूर्ण केली आणि आता या आधुनिक कालखंडात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, धर्म इत्यादी सर्वच बाबतीत आम्ही श्रेष्ठ आहोत. तेव्हा आम्ही गोरे श्रेष्ठ लोक या काळ्या आशियाई-आफ्रिकी लोकांना सुधारणार. ते आमचं दैवदत्त कार्य आहे.’ हा अहंगंड!
हा अहंगंड वेळोवेळी उफाळून येत असतो. आता स्वतंत्र झालेले आणि स्वाभिमानी असणारे आशियाई-आफ्रिकी देश या अहंगंडाला व्यवस्थित थपडा मारतात. पण, स्वाभिमानशून्यता म्हणजेच आधुनिकता असं ज्यांना वाटतं, असे लोक आजही तो अहंगंड मूर्खासारखा कुरवाळून, आपल्या मानसिक गुलामगिरीचं प्रदर्शन करीत असतात. असं केल्यामुळे आपण फार उदारमतवादी-लिबरल आहोत, असं त्यांना वाटत असतं.
हं! बरोबर ओळखलंत तुम्ही! भारतीय म्हणजे हिंदू लोक आपल्या लिबरलपणाचं प्रदर्शन करण्यात अगदी आघाडीवर असतात. आता परवाचंच उदाहरण घ्या. परवा २४ ऑगस्ट, २०२१ या दिवशी काही लबाड लिबरल लोकांनी (ही द्विरुक्ती होतेय का?) समाजमाध्यमांवर संदेश सोडले-आज कोलकाता महानगराचा जन्मदिवस! अभिनंदन! जॉब चारनॉकला धन्यवाद! इत्यादी आपल्याकडचे बहुसंख्य लोक अजून मेंढरांच्याच मानसिकतेत आहेत. पुढच्या मेंढराने उडी मारली की, मागचं मेंढरूही उडी मारणारं. तसे लोकांनी दणादण हे संदेश अग्रेषित केले नि मोकळे झाले.
आता वस्तुस्थिती पाहा हं! जॉब चारनॉक हा इंग्रजांच्या ‘ईस्ट इंडिया’ कंपनीचा एक अधिकारी होता. बंगालमध्ये हुगळी या ठिकाणी कंपनीची व्यापारी वखार होती, जशी ती पश्चिम किनार्यावर सुरतेला आणि मुंबईला होती. आता बंगालचा राज्यकारभार मुघलांच्या म्हणजे औरंगजेबाच्या हाती होता. त्याचा प्रतिनिधी म्हणजे बंगालचा सुभेदार हा ढाका या सुभ्याच्या मुख्य ठाण्याहून राज्यकारभार चालवीत असे. तर १६८९-९० साली मुघल सुभेदार इब्राहिमखान आणि ‘ईस्ट इंडिया’ कंपनीचे संबंध बिघडले. सुभेदाराने कंपनीचा स्थानिक प्रमुख जॉब चारनॉक याला हुगळीमधून अक्षरश: हाकलून दिलं. इंग्रजांनी गंगेच्या प्रवाहातून दक्षिणेकडे जात ४३ किमी वरच्या सुतानूती नावाच्या एक दलदलयुक्त खेड्यात आश्रय घेतला. पुढेे २४ ऑगस्ट, १६९० या दिवशी इंग्रजांनी इथेच आपली नवी वखार वसवली. त्यासाठी त्यांनी स्थानिक जमीनदार सवर्ण रायचौधरी याच्याकडून सुतनूती, कालिकत्ता आणि गोबिंदपूर ही तीन खेडी विकत घेतली. पुढच्या काळात या तीन खेड्यांचंच कलकत्ता किंवा कोलकाता हे महानगर झालं, म्हणजेच ही तीन खेडी पूर्वीपासून तिथे होतीच. मग त्यांचा जन्म नव्याने झाला आणि तो इंग्रजांनी घडवून आणला, असं कसं म्हणता येईल? पण, आपण साम्राज्यसत्ता आहोत, या मिजाशीत इंग्रज तसं म्हणत असत. आज ‘अंग्रेज तो चले गये, पर औलाद छोड गये’ असं ज्याचं वर्णन केलं जातं, असे मॅकॉलेपुत्र आपल्या देशात बरेच आहेत. ते २४ ऑगस्टला कोलकाता शहराचा जन्मदिवस साजरा करत असतात. अशाच धर्तीवर ९ मे किंवा ११ मे या दिवशी मुंबईला जन्मदिवस साजरा करावा, अशी या लबाड लोकांची सूचना आहे. का? तर म्हणे, ९ मे किंवा काहींच्या मते ११ मे १६६१ या दिवशी पोर्तुगीज राजकन्या कॅथरिन ब्रॅगान्झा हिच्याबरोबर इंग्रज राजा चार्ल्स दुसरा याच्या लग्नाचा करार झाला नि आंदण म्हणून पोर्तुगिजांनी इंग्रजांना मुंबई दिली. अरेच्या! पण, म्हणजे मुंबईचा तो जन्मदिवस कसा होऊ शकतो? मुंबई त्यापूर्वीपासून अस्तित्वात होतीच की! असेल, पण तरी इंग्रजांकडे मुंबई आली, तोच खरा मुंबईचा जन्म!! यंव रे गब्रू!
अगदी याच प्रकारे युरोपियन आणि अमेरिकन विद्वानांचं असं म्हणणं आहे की, कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिजस्तान हे पाच मध्य आशियाई देश १९९१ साली जन्माला आले. ही काय भानगड आहे? हे समजून घेण्यासाठी आशिया खंडाचा नकाशा पाहणं अत्यावश्यक आहे. ते पाहा भारताच्या वायव्येकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान नंतर रांगेने हे पाच देश आहेत. त्यांच्या सरहद्दी इराण, रशिया आणि चीनला जाऊन भिडल्या आहेत. भारतावर आक्रमण करणार्या युरोपीय अलेक्झांडरच्या नंतर अनुक्रमे कुशाण, शक आणि हूण यांनी भारतावर आक्रमणं केली होती. पैकी शकांचं आक्रमण तर सिंध, राजस्थान, गुजरातवरून पश्चिम किनारपट्टीने थेट महाराष्ट्रापर्यंत भिडलं होतं. हे कुशाण, शक आणि हूण मूळचे या मध्य आशियाई देशांमधलेच. त्यांच्यातले अनेक जण इराणी नि चिनीसुद्धा होते. पुढे त्यांना ‘तुर्क’ म्हटलं जाऊ लागलं. इसवी सनाच्या साधारण चौथ्या-पाचव्या शतकामध्ये ते चीनच्या तँग साम्राज्याचे मांडलिक बनले. त्यांचा धर्म बौद्ध होता. इ.स.751 मध्ये बगदादच्या अरब अब्बासी खिलाफतीचा इराणी सेनापती अबू मुस्लीम अब्द अल रहमान याने तँग साम्राज्यावर स्वारी केली.
आजच्या किर्गिजस्तानातल्या तलास या ठिकाणी घनचक्कर लढार्ई झाली. तिच्यात या तुर्कांनी अबू मुस्लीमला मदत केली. कारण त्यांना तँग घराण्याचं राज्य नको होतं. अबू मुस्लीम जिंकला. त्याने तुर्कांना चीनच्या जोखडातून स्वतंत्र केलं आणि इस्लामचीही दीक्षा दिली. मग या विशाल प्रदेशात तुर्कांची अनेक राज्यं निर्माण झाली. इंग्रजीत त्यांना ‘खानेट’ असा शब्द आहे. बाबर हा असाच समरकंद खानेटचा एक राजपुत्र होता. त्याच्या नशिबाने तो भारताचा बादशहा बनला. पण, बाबराच्या अगोदर भारतावर आक्रमणं करणारे गझनी, घोरी, खिलजी हे सगळे तुर्क मूळचे इथलेच.
१८ व्या नि १९ व्या शतकात रशियन झार राजांनी क्रमाक्रमाने या सगळ्या खानेट जिंकल्या. झार सम्राटांचा पाडाव करून १९१७ साली कम्युनिस्टांनी रशिया ताब्यात घेतल्यावर त्यांना सोव्हिएत प्रजासत्ताक राज्ये असा दर्जा मिळाला. १९९१ साली सोव्हिएत साम्राज्यच कोसळलं आणि त्याची प्रजासत्ताके स्वतंत्र देश बनले. म्हणून युरोपीय विद्वानांचं म्हणणं असं की, हे सगळे देश या वर्षी ३० वर्षांचे झाले.
पण त्या देशांना तसं वाटत नाही. त्यांना आपला किमान ५०० वर्षांचा इतिहास चांगलाच अवगत आहे आणि हे ते ठणकावून सांगत आहेत.चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून मांडत आहेत.अफगाणिस्तानातल्या जनतेची मानसिकता अजूनही टोळीवाल्यांचीच आहे. त्यामुळे तिथे एकात्म अफगाण राष्ट्रीय भावना नाही. पण, पलीकडच्या या पाचही देशांमध्ये, तिथल्या जनतेमध्ये राष्ट्रीय भावना चांगलीच प्रबळ आहे. रशियन वर्चस्वाचा एक सकारात्मक परिणाम म्हणजे हे देश आधुनिक झालेले आहेत.
आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे हे सगळे देश मुसलमान असले तरी अतिरेकी धार्मिक नाहीत. जुलै २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पाचही देशांना भेटी दिल्या. त्यावेळी झालेले विविध व्यापारी आणि मुख्यत: लष्करी करार हे देश उत्तम रीतीने पाळत आहेत. विशेषत: कझाकस्तान आणि भारत यांच्या लष्करांमध्ये खूपच दृढ संबंध निर्माण झाले आहेत. पाकिस्तान आणि त्याच्या जोरावर पुढारलेले अफगाणी-तालिबान यांच्या डोक्यावरच असलेले हे देश भारताचे मित्रदेश आहेत.