
दै. मुंबई तरुण भारतच्या 'कोविड योद्धा उद्योजक ५१' आणि 'कोविड योद्धा देवदूत' विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई: दै. मुंबई तरुण भारतच्या 'कोविड योद्धा उद्योजक ५१' आणि 'कोविड योद्धा देवदूत' या विशेषांकाचे प्रकाशन सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व कोविड योद्धया उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पुणे, रायगड, ठाणे, नाशिक, पालघर आणि मुंबई यासर्व भागातून उद्योजकांची उपस्थिती होती. या उद्योजकांनीही दै. मुंबई तरुण भारताच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रविराज बावडेकर यांनी केले.
यावेळी उद्योजकांच्या कार्याचा गौरव करताना राज्यपाल म्हणाले, हे जे कोरोनाचे संकट देशावर आले. या काळात अनेक लोकांचे धैर्य खचले. कोरोनाकाळात लोकांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली, निराशेचे वातावरण सर्वत्र होते. मात्र यासंपूर्ण काळात भारतमातेच्या सुपुत्रांची खरी परीक्षा होती. एक सामान्य परिचारिकच नाही तर रुग्णालयातील सुरक्षा रक्षक, एका वार्डबॉयपासून ते मोठ्या डॉक्टरांपर्यंत, पोलीस शिपायापासून ते मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच एकत्र येत काम केले. संपूर्ण देश संकटात असताना काही उद्योजकांनी नेटाने अर्थचक्र सुरु ठेवले. अनेक उद्योगांनी कामगार कपात तसेच वेतन कपात न करता दुपटीने काम केले. करोना सारखी संकटे देशावर अधून मधून येत असतात. मात्र सर्वांनी अंतःकरणपूर्वक काम केले तर देशाला कुठल्याही संकटावर मात करता येईल.आपल्या मातृभूमीसाठी तुम्ही योगदान दिले आहे ते नक्कीच कौतुकास प्राप्त आहे. या अशा सन्मानातून तुमचीही काम करण्याची प्रेरणा वाढते. आपण सर्वानी येणाऱ्या काळातही अशा संकटसमयी निर्भयपणे आणि साहसी वृत्तीने समाजासाठी योगदान द्यावे,असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. तसेच दै. मुंबई तरुण भारतने यासर्वांना सन्मान केला. त्याबद्दल राज्यपालांनी दै. मुंबई तरुण भारतच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
संपादक किरण शेलार यांनी राज्यपालांचे स्वागत केले. या विशेषांकामागील भूमिका स्पष्ट करताना संपादक किरण शेलार म्हणाले, कोरोनाच्या काळातही राज्यपालांनी महाराष्ट्राचे दौरे केले. जनराज्यपाल अशी त्यांची प्रतिमा आहे. महाराष्ट्राला इतका सक्रिय राज्यपाल महाराष्ट्राला लाभला आहे. राज्यातील जनतेची आपुलकीने विचारपूस केली, हे अभिमानस्पद आहे. या अंकामागची भूमिका सांगताना असे म्हणता येईल की, या अंकाच्या दोन श्रेणी आहेत. पहिला अंक 'कोविड योद्धा उद्योजक ५१' यामध्ये अशा उद्योजकांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. या श्रेणीचा सन्मान घडवून आणण्याचे कारण म्हणजे, हे सर्व उद्योजक आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कोरोनाकाळात खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले नाही, कोणतीही पगार कपात केली नाही, आपल्या कंपन्या सुरु ठेवल्या आहेत. ही सर्व जोखीम उचलून आज हे सर्व त्या प्रसंगाचा सामना करून आज त्याच उमेदीने इथेपर्यंत पोहोचले आहेत. मला वाटत हा कार्यक्रम अशा व्यक्तींच्या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दै मुंबई तरुण भारतचे असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर आनंद वैद्य तसेच सुधीर लवांडे, रविंद्र जाधव, प्रशांत कांबळे, प्रदीप गुरव, रमेश गोरुबोल,प्रशांत गायकवाड यांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे चित्रीकरण केतन वैद्य व छायाचित्रण सुरज बंगाल आणि योगेश कुंभार यांनी केले.
"राज्यपालांच्या हस्ते आमचा सत्कार झाला हे आमच्या आयुष्यभर स्मरणात राहिलं. दै. मुंबई तरुण भारतने केलेला हा सन्मान आमचा उत्साह वाढविणारा आहे. यामुळे भविष्यातील कामाची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे. राज्यपालांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आमचा कामाचा हुरूप वाढला आहे. देशासाठी आत्मप्रेरणेतून आणखी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असेल."
- डॉ. कविता खडके, उद्योजक
"इतके महान राज्यपाल महाराष्ट्राला लाभले आहेत. मी पहिल्यांदाच इतका मोठा सन्मान स्वीकारत आहे. हा सन्मान नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. दै. मुंबई तरुण भारतमुळेच हे शक्य झाले."
- अमित पवार, उद्योजक