मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला वर्ष उलटल्यानंतर त्याच्या फेसबूक अकाऊंटद्वारे कुणीतरी त्याचा प्रोफाईल फोटो अपडेट केल्याचे त्याच्या चाहत्यांना निदर्शनास आले होते. सुशांतच्या आत्महत्येचा तपास सुरू असताना अशाप्रकारे फोटो बदलल्याने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या. सुशांतच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये तू पुन्हा यायला हवंसं, तु आत्महत्या करायला नको होती, अशा आशयाच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. मात्र, हा फोटो कुणी बदलला याबद्दलचा खुलासा फॅशन ब्लॉगर लकी गुप्ता याने केला आहे.
"सुशांत सिंह राजपूतची टीम त्याचे अकाउंट सांभाळत आहे. तुझ्यासारखा अभिनेता अजरामर असतो", अशी प्रतिक्रीया त्याने यावर दिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या टीमने त्याचं फेसबुक प्रोफाइल अपडेट केले होते. १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी एका वेबसाईटबद्दलची घोषणा केली होती. हे सोशल मीडिया पेज सुशांतला समर्पित आहे, असे म्हणत एक पोस्ट शेअर केली. सुशांत या जगात जरी नसला तरीही तो आमच्या सोबत आहे, असेही त्यांनी म्हटले. तसेच सुशांतच्या आयुष्याचे पैलू उलगडणारी www.ImmortalSushant.com वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे.