भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीचे एन. मुत्तुकृष्णन हे सलग दोन वर्षे कोरोनाकाळात मदतकार्य राबवित आहेत. समाजातील विविध घटकांना मदत करण्याची ही प्रेरणा त्यांना नेमकी कुठून मिळाली, याबद्दल विचारले असता, “एका स्वयंसेवकाला मदतकार्याची प्रेरणा आणखी कुठून मिळणार,” असे म्हणत, “रा. स्व. संघातूनच सेवाकार्याची प्रेरणा मिळाली,” असे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या सेवाकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...
एन. मुत्तुकृष्णन... वडिलांचे नाव नटराजन. बालपणापासूनच आध्यात्मिक संस्कार रुजल्याने साधारणतः ३० वर्षांपूर्वीच मुत्तुकृष्णन यांनी रा. स्व. संघाच्या शाखेत जाण्यास सुरुवात केली. मुंबईत संघाचे काम करत असताना सुरुवातीला भाषेची अडचण येऊ लागली. तामिळ आणि मल्याळम् या दोन भाषा त्यांना अवगत होत्या. पण, मराठीची अडचण होई. ही अडचण दूर केली ती नगर कार्यवाह वेद प्रकाश मिश्रा यांनी. त्यांनी सांगितलं, “दुसरं काहीही करायचं नाही, फक्त चहा प्यायला सुरू कर.” मिश्रा यांचा सल्ला ऐकून मुत्तुकृष्णन यांना काही समजेनाच. चहा पिण्याचा आणि भाषेची अडचण दूर करण्याचा काय संबंध? मिश्रांनी कोडं उलगडून सांगायला सुरुवात केली.
संघकार्यासाठी त्यावेळी वाड्या, वस्त्या, चाळी फिरताना अनेक कुटुंबांना त्यांना भेटी द्याव्या लागत होत्या. पण, त्यावेळी एन. मुत्तुकृष्णन हे चहा पीत नसतं. मुंबईतील पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी ‘चहा-संस्कृती’ जोपासण्यासाठी चहा न पिण्याची सवय त्यांना मोडावी लागणार होती. मुंबईत चहाला ‘नको’ म्हणणार्यांकडे आजच्या प्रमाणेच त्या काळातही तिरकस नजरेने पाहिले जाई. त्यामुळे लोकांमध्ये मिसळायचे तर चहा घ्यायलाच हवा, असा सल्ला त्यांना वरिष्ठांकडून मिळाला. एन. मुत्तुकृष्णन यांनी जसा चहा स्वीकारला, तसे इथल्या संस्कृतीनेही त्यांना स्वीकारले. मराठी भाषा त्यांना समजू लागली. पुढे अयोध्या दौरा आणि राष्ट्रीय कार्यात सक्रिय झाल्यावर हळूहळू हिंदीवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले.१९९१च्या काळात मुंबईतील भांडुप आणि शीव या परिसरातील संघसेवेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. त्या काळात ते विभागाचे संपर्कप्रमुख बनले.
१९९२ मध्ये अयोध्येला ‘रामजन्मभूमी आंदोलना’त सहभागी होण्याचा निश्चय एन. मुत्तुकृष्णन यांनी केला. संघ शाखेतर्फे त्यांना तशी जबाबदारीही मिळाली. अन्य १२ जण त्या कार्यात सहभागी झाले होते. राम मंदिराच्या निर्माणासाठी सुरू असलेल्या लढ्यामुळे ते प्रेरित झाले. अयोध्येतील आंदोलनात पाच हजार जणांच्या शिबिराचे नेतृत्व त्यांच्याकडे त्या काळी होते. याच काळात होणार्या बैठका, प्रचार यात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. त्यामुळे साहजिकच हिंदी भाषा तोडकी- मोडकी जमेल, तशी त्यांनी स्वीकारली होती. विहिंपच्या शंकर गायकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले होते. अयोध्येत आंदोलनासाठी जात असताना तिथल्या स्थानिकांनी एक खोचक त्यांना प्रश्न विचारला होता. “भगवान राम स्वतः त्यांचे मंदिर तयार करण्यास समर्थ नाहीत का?” यावर त्यांनी चांगले उत्तर दिले होते, “देव त्याचे मंदिर बनवण्यासाठी सक्षम आहेच, ते भविष्यात इथे साकार होईलच; पण ज्यावेळी माझ्यासारख्या लाखो भक्तांकडून त्याचे मंदिर व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त केली जाईल, तेव्हा आमच्या मनातील कळवळही त्याला जाणवेल. परमेश्वराच्या इच्छेने हे कार्य वेगाने होईल. आज इतकी वर्षे उलटली आणि राम मंदिर निर्माणाची कथा आपण सारे जण जाणतोच. त्यामुळे संघसमर्पित जीवन असल्याने सेवाकार्य कधी सुटले नाही. भाजपप्रवेश केल्यानंतरही पक्षाने जे काम दिले ते सेवाकार्य म्हणून करत राहिलो,” असेही ते म्हणतात. कोरोनाकाळातील सेवा याहून वेगळी नव्हती.
धारावीतील कोरोनाच्या हाहाकाराच्या बातम्या २०१९ डिसेंबरनंतर येऊ लागल्या होत्या. दक्षता म्हणून धारावी विभागातील प्रत्येक गल्ली बंद करण्यात आली होती. कोरोना पसरू नये म्हणून लोकांचे बाहेर येणे बंद झाले होते. हातावर पोट असणार्यांवर उपासमारीची वेळ आली होती. धारावीतील याच गोरगरीब जनतेच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करण्याचा आदेश त्यांना पक्षातर्फे आला आणि एन. मुत्तुकृष्णन यांनी कंबर कसली. तांदूळ, डाळ आणि कडधान्य, असा दोन टनांचा माल गोरगरिबांकडे पोहोचवला. श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून अन्नधान्य किट्सचे वाटप त्यांनी धारावी, शीव या विभागांत केले. ते ‘भारतीय तामिळ संघा’चे प्रांतीय सचिव, ‘शबरीमला अय्यपा सेवा समाजम्’ या संस्थेचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही ते काम पाहतात. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातूनही अन्नधान्यवाटप त्यांनी केले. मुंबईतील रक्ताच्या तुटवड्यावर मात करावी म्हणून २०० जणांच्या यशस्वी सहभागातून त्यांनी रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. मुंबई असो वा महाराष्ट्रातील कुठल्याही खेड्यापाड्यातील रुग्णांनी मागितलेल्या मदतीला योग्य तो प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची टीम उभी केली.
रवि हिंमतुल्ला, शैलेंद्र सावनी, गुरुनाथजी, वीणा शेणॉय आदींच्या माध्यमातून अविरत सेवा सुरूच आहे. विशेष म्हणजे, भाजप मुंबईतर्फे मंगलप्रभात लोढा, आमदार तमिळ सेल्वन यांच्या मार्गदर्शनातून या सेवाकार्याला बळ मिळाल्याचे ते सांगतात. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण आवश्यक. तेव्हा लसीकरण शिबीर त्यांनीही सुरू केले. लसीकरणासाठी जाताना ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. कोरोना महामारी संपेपर्यंत ही सेवा अविरत सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. “‘चॅरिटी स्पोर्ट्स’ धारावी, जनकल्याण सेवा समितीसह भाजप मुंबईच्या विविध हेल्पलाईन्सचा या सेवाकार्यात मोलाचा वाटा आहे,” असे ते म्हणतात. “आमच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे देशभरातून कुठूनही मदत येवो, आपण आपल्या माणसांसाठी धावून येऊ शकतो, त्यांच्या अडचणीत उभे राहू शकतो, याचे समाधान मला मिळते,” असे ते सांगतात. त्यांच्या या अविरत सेवाकार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम.