जनसेवी युवानेती!

Total Views | 66

Divya Dhole_1  
 

धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागामध्ये कठोर निर्बंधकाळात ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या संचालिका व भाजपच्या युवा नेत्या दिव्या ढोले नागरिकांच्या मदतीला दिवसरात्र न बघता तत्परतेने धावून गेल्या. या काळात उल्लेखनीय मदतकार्य करत त्यांनी येथील नागरिकांच्या मनात आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविला. त्यानिमित्ताने ‘कोविड योद्धा देवदूत’ ठरलेल्या दिव्या ढोले यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
 
कोरोनाच्या दोन्ही लाटांचा मुंबईने आणि मुंबईकरांनी अगदी नेटाने सामना केला. यावेळी अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींनी मदतकार्यात आणि सामाजिक प्रबोधनात मोलाचे कार्य केले. धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये तर कठोर निर्बंध होते. अशा वेळी ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या संचालिका व भाजपच्या युवा नेत्या दिव्या ढोले नागरिकांच्या मदतीला धावून गेल्या.दिव्या ढोले या मागील अनेक वर्षांपासून धारावी व वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील विकासकामांमध्ये आपले बहुमोल योगदान देत आहेत. २००२ मध्ये दिव्या यांनी भारतीय जनता पक्षासोबत काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई सचिवपदाचे काम पाहणार्‍या दिव्या सध्या महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून भाजपच्या कोअर कमिटीमध्ये कार्यरत आहेत. २००४ मध्ये त्यांनी स्वतःच्या ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू केले. याच माध्यमातून दिव्या यांनी कोरोनाकाळातही धारावी व वर्सोवा या भागात मोठ्या प्रमाणावर मदतकार्य राबविले.
 
 
गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. मुंबई आणि महाराष्ट्रासमोर धारावीच्या दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाचा फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. म्हणूनच या भागात सर्वप्रथम कडक ‘लॉकडाऊन’ लावण्यात आले. दि. २२ मार्च, २०२० रोजी पहिला ‘लॉकडाऊन’ घोषित झाला. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील मजूर व कामगार वास्तव्यास आहेत. कंपन्या अचानक बंद झाल्याने या हातावर पोट असणार्‍या मजुरांकडे रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते.बिहार, झारखंड या राज्यातील या मजूरवर्ग आपापल्या राज्यात परतण्याची मागणी करू लागले. एवढंच नाही तर या मजुरांनी आपापल्या राज्यातील नेत्यांना संपर्क साधून आम्हाला मुंबईत मदत पोहोचती करावी, अशी मागणीही सुरू केली. अशा वेळी दिव्या यांच्या धारावीतील यापूर्वीच्या समाजकार्याची दखल घेत, झारखंड आणि बिहार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयातून मुंबईत अडकलेल्या मजुरांना मदत मिळावी, याकरिता दिव्या यांच्याशी संपर्क साधण्यात आला. बिहारचे आमदार मनोज शर्मा आणि झारखंडच्या खासदार अन्नपूर्णा देवी यांच्या कार्यालयातून दिव्या यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी दिव्या यांनी धारावी आणि वर्सोवा भागातील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेत शक्य ती सर्व मदत पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन त्यांना दिले आणि दुसर्‍याच दिवसापासून मदतकार्यास सुरुवात केली.
 
 
यावेळी दिव्या यांच्यासमोर आव्हान होतं ते म्हणजे कोरोनाचा संसर्ग होऊ न देता मदतकार्य पोहोचविणे. यात प्रशासनाची परवानगी मिळविणे हेदेखील आव्हान होतं. मात्र, सिनिअर अधिकारी रमेश नागरे दिव्या यांच्या मदतीला धावून आले. दुर्दैवाने त्यांचे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाल्याने दिव्या यांनी शोक व्यक्त केला. नागरे यांनी दिव्या यांना अन्नधान्याचे पाकीट बनवून ते पोलीस स्थानकात पाठवण्याच्या सूचना केल्या. जवळपास ५००च्या आसपास मजुरांना या काळात दिव्या यांनी मदत पोहोचवली. १५ दिवस पुरेल इतके धान्य दिव्या यांनी या मजुरांपर्यंत पोहोचविले. पोलिसांच्या सहकार्यामुळेच हे मदतकार्य पोहोचविणे शक्य झाले, हे दिव्या ढोले आवर्जून सांगतात. जेव्हा हे मजूर त्यांच्या गावी पोहोचले, तेव्हा या नागरिकांनी भाजपचे आणि दिव्या ढोले यांचे अगदी मनापासून आभार मानले. याबाबत बिहारचे आमदार आणि खासदार यांनी देखील दिव्या ढोले यांच्याप्रति आभार मानणारे पत्र लिहित कृतज्ञता व्यक्त केली.
 
 

Divya Dhole 1_1 &nbs 
 
 
दिव्या म्हणतात, “भाजप परिवार आहे. जेव्हा देशावर संकट येते, तेव्हा हा संपूर्ण परिवार एक असतो.” दिव्या यांच्या धारावीतील मदतकार्याविषयी माहिती मिळताच वर्सोवामधूनही मदतकार्य मिळावे, अशी मागणी होऊ लागली. वर्सोवात दिव्या यांचे ‘नागरिक सेवा केंद्र’ आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिव्या यांच्याशी संपर्क साधून मदतकार्य पोहोचवावे, अशी मागणी केली. मात्र, यावेळी दिव्या यांना निधीची कमतरता भासली. यावरही मात करत दिव्या यांनी काही कंपन्यांशी संपर्क साधला. दिव्या यांच्या कामाची व्याप्ती आणि विश्वासार्हता याच्या जोरावर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढे येत जमेल तेवढा निधी ढोले यांच्या संस्थेला दिला. ज्यामुळे वर्सोवा विधानसभेत येणार्‍या सर्व झोपडपट्टी भागात गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. या भागात मोठ्या प्रमाणावर रिक्षाचालक, टॅक्सीचालक, हातावर पोट असणारी कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिव्या यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने केला. वर्सोवातील सात बंगला परिसर, सागर कुटीर परिसर, जोसेफ पटेलवाडी त्या भागातील दीड हजार नागरिकांना अन्नधान्याचे वाटप दिव्या ढोले यांनी केले. एका महिला म्हणून या सर्व कामाचे व्यवस्थापन करताना अनेक आव्हानं समोर असल्याचे दिव्या सांगतात. यामध्ये महानगरपालिकेकडून परवानग्या मिळवण्यापासून ते गरजूंना मदतकार्य पोहोचविण्यापर्यंत सर्व कामात भरत शर्मा, मोहन नैनानी, कमल कक्कर या सर्व कार्यकर्त्यांनी दिव्या ढोले यांना साथ दिली. तांदूळ, डाळ याची कमतरता होती. अशा वेळी ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने उत्तम सहकार्य करत वेळेवर धान्य पाठविले. “वर्सोवामध्ये १०० ते १२५ आरोग्य सेविकांपर्यंत पोहोचणारी ‘संकल्प सेवा सिद्धी’ ही एकमेव संस्था होती. आम्ही २४ तास रुग्णसेवांमध्ये असणार्‍या या आरोग्य सेविकांना त्यांच्या कुटुंबीयांना मदत करू शकलो, याचा अभिमान आहे,” असे दिव्या ढोले सांगतात.
 
 
 
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही दिव्या यांनी आपला मदतकार्याचा वसा जपला. यावेळी त्यांनी एका खासगी कंपनीच्या बरोबरीने वर्सोवामध्ये एक हजार कुटुंबीयांना मोफत धान्यवाटप केले. त्यामुळे गरजू नागरिकही मोठ्या आशेने दिव्याताईंशी संपर्क साधतात. तसेच अनेक मोठ्या कंपन्या आज ‘संकल्प सिद्धी ट्रस्ट’च्या माध्यमातून मदतकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. धारावी व वर्सोवा या भागात बहुमोल मदतकार्य करणार्‍या दिव्या ढोले यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121