एका प्रसंगाने हादरून गेलेल्या आणि यापुढे एकाही रुग्णाला आपला प्राण सोडावा लागणार नाही, असे मनाशी अगदी पक्के ठरवत, त्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत, मागील दीड वर्षांपासून समाजातील शेवटच्या घटकासाठी लोकप्रतिनिधी म्हणून अविरतपणे मदतकार्य करणारे मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक अतुल शाह. त्यांच्या कोरोनाकाळातील या अतुलनीय सेवाकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
“पहाटे ३ वाजता एका रुग्णाला प्रचंड ताप होता. त्याला थंडी वाजून आली. ती गंभीरता बघून त्या रुग्णाला मी रस्त्यावरच उशी आणि गादी आणून दिली. पण, केवळ अर्धा तासात त्या रुग्णाने प्राण सोडला. या प्रसंगाने मी हादरून गेलो.” कोरोनाच्या पहिल्या लाटेची ही भीषणता अनुभवली ती नगरसेवक अतुल शाह यांनी. या प्रसंगाने हादरून गेलेल्या शाहंनी यापुढे एकही रुग्णाला असा प्राण सोडावा लागणार नाही, असे मनाशी पक्के ठरविले आणि त्यादृष्टीने ते कार्यरत आहेत.
डिसेंबर २०१९च्या २७-२८ तारखेदरम्यान शाह ऑस्ट्रेलियाला गेले होते. तेव्हा चीनमधील वुहानमध्ये अशा प्रकारच्या विषाणूने थैमान घातले असल्याच्या बातम्या झळकल्या. तीच भीषणता बघून शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते की, “या जगभरात पसरणार्या विषाणूची तीव्रता बघता हा विषाणू भारतातही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा, आपण दहिसर आणि मुलुंडला ‘आरटीओ’चा चेकनाका आहे, तिथे मोकळ्या जागांमध्ये खाटा उपलब्ध करुन तंबू बांधा.” पण, त्या पत्राचे शाह यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर एक-दोन महिन्यांतच कोरोना विषाणूची भीषणता आणि बेडची कमतरता सर्वांनीच अनुभवल्याचे शाह सांगतात.
शाह यांच्या प्रभागात मोठ्या संख्येने फेरीवाले, छोटे दुकानदार, ठेले चालविणारे, सुतार, रंगारी वास्तव्यास आहेत. त्यांचे जीवनमान म्हणजे बाहेरचं खायचं आणि बाहेरच झोपायचं! पण, अचानक झालेल्या ‘लॉकडाऊन’मुळे या वर्गाचे हाल झाले. हॉटेल, छोटे रेस्टॉरंट्स बंद असल्याने अनेकांच्या जेवणाचे हाल होऊ लागले. सुरुवातीचे १५ ते २० दिवस शाह यांनी स्वतः अशा हजारो गरजूंच्या जेवणाची सोय करून दिली. त्या प्रत्येकाला दोन्ही वेळचे जेवण मिळेल, याची जबाबदारी शाह यांनी अगदी चोखपणे बजावली.
महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा वेगळा फंड असतो. हा जवळपास दहा लाखांचा फंड शाह यांनी मंजूर करून घेतला. या फंडातून त्यांनी त्यांच्या प्रभागातील लोकांची तपासणी करण्यासाठी ऑक्सिमीटर, टेम्परेचर गन, मास्क आणि सॅनिटायझरच्या बाटल्या विकत घेतल्या. आपल्या प्रभागातील प्रत्येक इमारतीत सॅनिटायझर बॉटल, मास्क आणि टेम्परेचर गनचे वाटप केले. इतकेच नाही तर वापराबाबतच्या सूचनाही दिल्या. ऑक्सिमीटर आणि टेम्परेचर गनचा वापर नेमका कशासाठी, हेच तेव्हा अनेकांना माहीत नव्हते. म्हणून कोणीही आजारी पडले की, सर्वप्रथम त्यांची ‘ऑक्सिजन’ पातळी तपासली जावी, ही खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी इमारतीतील सदस्यांना केले. हे काम पाहता, शाहंप्रमाणेच महानगरपालिकेने इतर नगरसेवकांनाही १५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला, म्हणजेच अतिरिक्त पाच लाखांचा निधी प्रत्येक नगरसेवकाला मंजूर करून देण्यात आला. तसेच आपल्या परिसरातील सर्व डॉक्टरांशीही शाह यांनी या काळात उत्तम संपर्क ठेवला.
कालांतराने महानगरपालिकेने ‘कोविड वॉररूम’ उभारल्या, ‘कोविड सेंटर’ उभारले. सुरुवातीला मलबार हिलमध्ये नंतर वरळीला ‘नेस्को’मध्ये ‘कोविड वॉर्ड’ उभारण्यात आले. मात्र, इथेही एक अडचण होती की, रुग्णांना बेड आहे की नाही, याची व्यवस्थित माहिती मिळत नव्हती. मात्र, शाह यांनी इथेही वॉररूमसोबत समन्वय साधत रुग्णांची नोंद करून त्यांना बेड उपलब्ध करून दिले. संपूर्ण ‘कोविड’ साथीच्या काळात त्यांनी आपल्या मदतकार्यातून एकही दिवस उसंत घेतली नाही. पहिल्या लाटेदरम्यान इमारतीत एखाद्या कुटुंबात कोरोना रुग्ण सापडला की, संपूर्ण इमारत सील व्हायची. त्यावेळी शाहंनी कार्यकर्त्यांच्या मदतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले, जेणेकरून काही नाहीतर डाळभात तरी बनवतील, हा हेतू त्यामागे होता. या किटमध्ये डाळ, तांदूळ, साखर, चहा यांचा समावेश होता. शाहंसोबत २५ ते ३० कार्यकर्ते अहोरात्र मदतकार्यात धावपळ करत होते. युवावर्ग या मदतकार्यात मोठ्या संख्येने सहभागी होत होता. जेवणाची पाकिटं वाटणे, घरोघरी आवश्यक वस्तू पुरविणे, या सर्वांमध्ये अनेक संस्थांनी यावेळी सहभाग घेतला. ‘सत्यपूर युवा मोर्चा’ने खूप सहकार्य केले, त्यांच्यासोबतच शाहंनी रक्तदान शिबिरांचे देखील आयोजन केले. रक्ताचा मोठा तुटवडा या काळात जाणवत होता, म्हणून शाहंनी आपल्या भागात अनेक वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. मृत्यू झालेल्या ठिकाणी महानगरपालिका येऊन फवारणी करत, त्यावेळी शाह आणि त्यांचे कार्यकर्ते यातही पालिकेला मदत करत होते. शाह यांची ९३ वर्षीय आई घरी होती. शाह रात्रंदिवस मदतकार्यासाठी बाहेर असत. मात्र, घरी आल्यावर आपल्यामुळे आईला कोरोनाचा संसर्ग तर होणार नाही ना, अशी भीती त्यांच्या मनात कायम असे. यासाठी ते योग्य ती खबरदारी घेत होते. “लोकप्रतिनिधी म्हणून माझं लोकांसाठी काम करणं हे प्रथम कर्तव्य होतं आणि यात कुटुंबीयांचीही उत्तम साथ लाभली,” असे ते सांगतात. जनतेनेही शाहंच्या मदतकार्याला उत्तम प्रतिसाद दिला. आज हे संकट ओसरले असले, तरी शाहंनी या काळात केलेले कार्य जनता विसरलेली नाही.
अतुल शाहंनी आपल्या प्रभागात सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे लसीकरण केंद्र उभारले आहे. हे उभारण्यामागे एक घटना कारणीभूत ठरली. याबाबत ते सांगतात, “मी ‘कोविड’चा दुसरा डोस घेण्यासाठी नायर हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे एक ज्येष्ठ नागरिक महिला प्रचंड गर्दीत उभी होती. उन्हाचा तडाखा अशातच लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती. ते बघून वाटत होत की काय हे? याचदरम्यान महापालिकेचे प्रत्येक प्रभागात एक लसीकरण केंद्र उभारण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळीच मी ठरवले की, माझ्या प्रभागातील लसीकरण केंद्र हे ‘मेडिकल स्टॅण्डर्ड’नुसार सर्वोत्कृष्ट लसीकरण केंद्र असेल. माझ्या प्रभागातील माधवबाग येथील सर्वात जागृत आणि जुन्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या कम्पाऊंडमध्ये वातानुकूलित लसीकरण केंद्र उभारले. आजपर्यंत सात ते साडेसात हजार नागरिकांचे आम्ही लसीकरण केले आहे. माझी खंत एवढीच आहे की, लसीचे डोस आम्हाला कमी येतात. आम्ही दररोज ५०० लसीचे डोस देऊ शकतो. पण, अनेकदा लसीच उपलब्ध होत नाहीत. आज खासगीत इतके डोस उपलब्ध आहेत, तर गरीब-सर्वसामान्य लोक आम्हाला येऊन विचारतात. तिथे पैशाने डोस आहेत, तुमच्याकडे का नाही? तर माझं महानगरपालिकांनी ज्यांच्याकडे पैसे आहेत, अशा मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर अशा महापालिकांनी स्वतः लसी खरेदी करून जिथे कमतरता असेल तिथे त्यांचे वाटप करावे. केंद्राकडून कमी आले असे सांगून आपल्याला चालणार नाही, इतक्या मोठ्या महानगरपालिका तुम्ही सांभाळता म्हणून त्यांनी लसींची खरेदी केली पाहिजे. म्हणजे लोकांनाही धीर मिळेल की, आपली महानगरपालिका आमची काळजी घेते आहे,” अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. “भविष्यात अशी संकटं आली, तर त्याच्याशी दोन हात करायला आपण आणि आपल्या यंत्रणांनी तयार असणं गरजेचं आहे,” असे ते म्हणतात. प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड असणं आज गरजेचं आहे, सरकरनेही यावर भर द्यावा. ते पुढे म्हणतात, ‘If we, with all the information then we will fight with right solution'