विरारमधील पाणथळीवर वन्यप्राणी-पक्ष्यांची शिकार करण्यासाठी सापळ्यांचा वापर

    02-Aug-2021   
Total Views | 471
virar_1  H x W:



मुंबई (अक्षय मांडवकर) -
विरारमधील न्यू व्हिवा महाविद्यालयाच्या परिसराला लागून असलेल्या पाणथळ जमिनीवर वन्यजीवांची शिकार करण्याच्या अनुषंगाने लावलेले सापळे आढळून आले आहेत. स्थानिक पक्षीनिरीक्षकांना पक्षी निरीक्षण करतेवळी हे सापळे दिसले. वन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून तातडीने या परिसरात लावलेले सापळे काढून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
 
 
 
विरारमधील पाणथळ जागा या विविध पक्षी प्रजातींच्या अधिवासामुळे समृद्ध आहेत. शिवाय या पाणथळींवर कोल्हे, रानमांजर, रानडुक्करासारखे सस्तन प्राणीही आढळून येतात. मात्र, या पाणथळींवर शिकाऱ्यांची वक्र नजर पडल्याचे चित्र दिसत आहे. कारण, विरारमधील चिखल डोंगरी परिसराला लागून असलेल्या आणि न्यू व्हिवा महाविद्यालयाच्या परिसरातील पाणथळीवर सापळे आढळून आले आहेत. रविवारी (दि.१ आॅगस्ट) या पाणथळीवर स्थानिक पक्षीनिरीक्षक मयुर केळस्कर, राजन मोरे आणि संतोष भोये हे पक्षीनिरीक्षणाकरता गेले होते. त्यावेळी आम्हाला याठिकाणी वन्यजीव किंवा पक्ष्यांची शिकार करण्यासाठी लावलेले दोन सापळे आढळल्याची माहिती मयुर केळस्कर यांनी दिली. या सापळ्यात शिकार फसवण्यासाठी मांसाचा तुकडा लावल्याचे ते म्हणाले.
 
 
 
 
या पाणथळीवर पक्ष्यांच्या १५० प्रजाती आणि रानमांजर, रानडुक्कर, कोल्ह्यांसारखे सस्तन प्राणी सापडत असल्याचे केळस्कर यांनी सांगितले. सापळ्यात प्राणी फसवण्यासाठी त्याला लावलेले मांस लक्षात घेता, मासंभक्षी सस्तन प्राण्याची शिकार करण्यासाठी हे सापळे रचण्यात आल्याचा अंदाज आहे. हा परिसर विस्तीर्ण असल्याने त्याठिकाणी अजून काही सापळे असल्याची शक्यता आहे. वन्यजीवांची शिकार करण्याच्या उद्देशाने रचलेले सापळे हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याविषयी आम्ही मांडवीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आडे यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, "या प्रकरणाची माहिती आम्हाला मिळाली असून ही जागा वन विभागाच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्वप्रथम या जागेच्या मालकाला या प्रकरणाची माहिती आम्ही देणार आहोत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल."
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121