कोरोनासारख्या संकटाच्या काळात आपल्या सेवेने नाशिक येथील तरुण सेवक अनिकेत सोनवणे यांनी अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले. कित्येक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला आणि त्यांच्या पाठिशी ते अगदी खंबीरपणे उभे राहिले. अन्नपदार्थांच्या वाटपापासून ते रुग्णांना रुग्णालयात ‘ऑक्सिजन’ पुरवण्यापर्यंत सोनवणे हे गरजूंचा आधारवड ठरले. तेव्हा, सर्वार्थाने गरजूंसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या अनिकेत सोनवणे यांच्याविषयी...
घरातील एखाद्या सदस्याला कोणत्याही आजाराने ग्रासले असता, औषधोपचाराबरोबरच त्या व्यक्तीला खर्या अर्थाने गरज असते ती आधाराची. ‘आधार’ या संज्ञेत मानसिक घटकाबरोबरच सेवेचादेखील अंतर्भाव होत असतो. सेवा ही व्यक्तीला असलेल्या अडचणीच्या प्रसंगातून बाहेर पडण्याचे मनोधैर्य देण्याबरोबरच समाजात सेवाभावाची शृंखला निर्माण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. कोरोनासारख्या सामाजिक संकटाच्या काळात आपल्या सेवेने नाशिक येथील तरुण सेवक अनिकेत सोनवणे यांनी अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केले. आपल्या ‘युनिक ग्रुप’ या संस्थेच्या माध्यमातून सोनवणे अविरत सेवाकार्याचा महामेरू आपल्या प्रभागात व इतर ठिकाणी उभारण्याचे कार्य अविरत करत आहेत.
अवघे २४ वय वर्ष असलेले सोनवणे यांच्या सामाजिक जाणिवा या समृद्ध अशाच आहेत. नाशिकमध्ये कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेचे अनेक दृश्य-अदृश्य परिणाम दिसून आले. यात अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. याच काळात सोनवणे यांनी ज्यांचे हातावर पोट आहे, अशा नागरिकांना अन्नवाटप करत त्यांचे जीवन सुसह्य होण्याकामी प्रयत्न केला. त्यांना पोषक आहार देत, त्यांनी त्यांची क्षुधातृप्ती केली. सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळा ५०० अन्नपाकिटांचे वाटप सोनवणे यांनी या काळात नियमितरीत्या केले.
‘म्हाडा’ कॉलनीजवळच्या महामार्गालगत असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली निर्वासितांना सोनवणे यांनी या काळात अन्नवाटप केले. सुमारे ६०० लीटर दुधाचे वाटप ते दिवसाच्या दोन्ही प्रहरांत ते करत असत. याशिवाय डाळ, तांदूळ, गहू, साखर, चहा, मसाल्याचे पदार्थ आदींनी युक्त अशा किटचे वाटप करत सोनवणे यांनी अनेकांच्या कुटुंबाला हातभार लावला. सुमारे १,२०० कुटुंबांना त्यांनी या काळात अन्नपदार्थांचे वाटप करत अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला. ‘कोविड’काळातील महत्त्वाच्या आणि अडचणीच्या अडीच महिन्यांच्या काळात सोनवणे यांचे हे कार्य असेच अव्याहतपणे सुरु होते.
‘कोविड’काळात सर्वात मोठे गंडातर आले ते सलून व्यवसायावर. या काळात सलून व्यवसाय हा पूर्णत: ठप्प झाला होता. पुढे शासनाच्या धोरणानुसार तो नियम व अटींसह सुरूदेखील झाला. मात्र, सलून व्यावसायिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न तेव्हादेखील निर्माण झाला होताच. हीच गरज आणि अडचण ओळखून सोनवणे यांनी सलून व्यावसायिकांना ‘पीपीई’ किटचे वाटप केले. तसेच, खरे ‘कोविड योद्धे’ असलेले सफाई कामगार, पत्रकार यांना त्यांनी ‘फेसशिल्ड मास्क’चे वाटप या काळात केले.
आपले वडील नगरसेवक असलेल्या प्रभागात त्यांनी नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी औषधफवारणी करण्यासदेखील या काळात प्राधान्य दिले. परिसरातील कोरोना रुग्णांचे घर सॅनिटाईज करण्याकामी व्यवस्था सोनवणे यांनी या काळात राबविली. सोनवणे यांच्या मदतकार्यामुळे सुमारे ६०० ते ६५० ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या वापरातील औषधे सहज उपलब्ध होण्यास मदत झाली. तसेच, रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्या ‘आर्सेनिक अल्बम’च्या अडीच हजार ते तीन हजार गोळ्यांचे वाटप सोनवणे यांनी या काळात केले.
नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेत अक्षरश: हाहाकार उडाला होता. अशा वेळी सोनवणे यांनी नागरिकांच्या सेवेसाठी सहा रुग्णवाहिका कार्यन्वित केल्या होत्या. त्यात दोन रुग्णवाहिका या ‘ऑक्सिजन’ सुविधायुक्त होत्या. ३० ‘ऑक्सिजन सिलिंडर बँक’, १५ ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’ यांची व्यवस्था सोनवणे यांनी केली. यामुळे रुग्णालयांत खाटा उपलब्ध न होणारे रुग्ण हे आपल्या घरीच फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने ‘ऑक्सिजन’ घेत उपचार करून घेत होते.
दुसर्या लाटेच्या गर्तेत अडलेल्या दोन हजार कुटुंबांना सोनवणे यांनी कोरडा शिधावाटप केले. त्यात मुख्यत्वे सलून व्यावसायिक, रिक्षाचालक, शालेय वाहतूक व्यवस्था करणारे चालक, हातगाडी व्यावसायिक यांचा समावेश होता. मनपा लसीकरण केंद्रांवर कार्यरत कर्मचारी वर्गाला ‘फेसशिल्ड मास्क’चे वाटप या काळात सोनवणे यांनी केले. तसेच, पहिल्या व दुसर्या लाटेदरम्यान सोनवणे यांनी कोरोना आजार व लसीकरणाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला.
स्वत:च्या वाहनाचा वापर करत अनेकांचे लसीकरण होण्याकामी सोनवणे यांनी पुढाकार घेतला. मार्चअखेर ते जूनपर्यंत सोनवणे यांचे सेवाकार्य हे अखंड सुरू होते. महापालिकेच्या लेखापरीक्षकाद्वारे अनेकांची रुग्णालयातील रक्कम कमी करणेकामीही सोनवणे यांनी या काळात पुढाकार घेतला. हलाखीच्या परिस्थितीत आठ नागरिकांना रोख स्वरूपात मदत सोनवणे यांनी या काळात केली. २५ कोरोनाबाधितांचे अंत्यविधी उभारलेल्या समूहामार्फत केले. दोन वेळा स्वतः त्यात सहभाग नोंदविला. ४० नागरिकांना स्वतःच्या वाहनातून नेत रुग्णालयात दाखल केले.
हे सर्व करत असताना रुग्णांचे होणारे मानसिक खच्चीकरण, खाटा उपलब्ध न होणे, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असणे, अशा आव्हानांचा सामना सोनवणे यांना करावा लागला. संवादावर भर देत शासकीय यंत्रणेशी संवाद साधत या अडचणीतून सोनवणे यांनी मार्ग काढला. आयुर्वेदावर भर देत त्यातील काही आरोग्यदायी उपचार रुग्णांनी घेण्याकामी सोनवणे यांनी भर दिला.
सहा जणांचे कुटुंब असलेल्या एका परिवारातील चार जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ होते. त्यात केवळ चार व सहा वर्षांची लहान मुले ‘निगेटिव्ह’ होती. त्यांच्याकडे लक्ष द्यायलादेखील कोणी नव्हते. त्यात केवळ त्या मुलांची आई बचावली. आजी व वडील यांचे निधन झाले. हा प्रसंग सोनवणे यांचे मन हेलावून टाकणारा ठरला. या प्रसंगानंतर संवेदनशील मनाच्या सोनवणे यांनी 12 मुलांना दत्तक घेतले असून, प्रथमत: या वर्षाचा त्यांचा शैक्षणिक खर्च ते स्वतः करणार आहेत.
नगरसेवक वडिलांचे आजवरचे समाजकार्य, परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांचे आदर्शवत आयुष्य, यांच्यामुळे प्रेरणा मिळाल्याचे सोनवणे आवर्जून नमूद करतात. कुटुंबातून आई व बहीण यांचे प्राप्त झालेले मानसिक बळ हे सोनवणे यांच्यासाठी मोलाची शिदोरी ठरले. याशिवाय रा. स्व. संघ जनकल्याण समिती, संघ स्वयंसेवक, ऋतूल जानी, सुरज मंडी, रोहित गीते, तन्वी खर्डे, शुभम जाधव, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघ यांची मोलाची साथ त्यांना लाभली. पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचे, असे मत असणारे सोनवणे यानिमिताने भारतात प्रोफेशनल वैद्यकीय सेवेची गरजदेखील प्रतिपादित करतात.
- अनिकेत सोनावणे