रुग्णसेवेचा अविरत व्रतकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2021   
Total Views |

Jitendra  _1  H

कोरोना महामारीचा काळ हा वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींसाठी ‘लॉकडाऊन’ म्हणून घरी बसण्याचा नव्हे, तर आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून, प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करण्याचा होता. वैद्यकीय क्षेत्रातील असेच एक नाव म्हणजे नाशिकचे डॉ. जितेंद्र कोडीलकर. अशा या तीन महिने घरातील सदस्यांपासून लांब राहून अविरतपणे कोरोना रुग्णांची सेवा करणार्‍या डॉ. जितेंद्र कोडीलकर यांच्या कार्याविषयी...
 
 
वैद्यकीय कार्यक्षेत्रात असणार्‍या अनेक व्यक्ती या आपल्या कौशल्यावर रुग्णांना सेवा देण्याचे कार्य करत असतात. काही वैद्यकीय तज्ज्ञ हे सामाजिक कार्य करत आपल्या वैद्यकीय क्षेत्राचे, तसेच समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करत असतात. कोरोनाकाळात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांची खरी गरजदेखील या काळात समाजाला कळली आहे. वैद्यकीय क्षेत्रात असणार्‍या अनेक डॉक्टर्सनी कोरोनाकाळात उत्तम रुग्णसेवा करत आपले कर्तव्य उत्तमरीत्या बजावले आणि आजही प्रामाणिकपणे बजावत आहेत.
 
 
नाशिक येथील डॉ. जितेंद्र विष्णू कोडीलकर यांनी याच प्रकारे रुग्णसेवेत स्वत:ला झोकून दिले. दिवसभर प्रत्येक रुग्णाला भेटत त्यांना योग्य उपचार देत, तसेच गोळ्या-औषधांचा योग्य डोस, केव्हा-कोणते औषध दिले पाहिजे, याची योग्य वेळ, योग्य काळजी, किती प्रमाणात दिले पाहिजे, यावर लक्ष ठेवणे असे एक नाही, तर अनेक रुग्ण त्यांच्या दक्षतेखाली बरे होत गेले आणि एका वेळेस अशा प्रत्येक रुग्णाकडे पुरेपूर लक्ष देणे हे खरंच खूप आव्हानात्मक होते. याच समाजभावनेने ते नेहमी रुग्ण आणि त्याची काळजी, यावरच लक्ष देत. घरपरिवार सोडून त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, ती फक्त रुग्ण बरा कसा होईल यासाठीच!
 
 
असाच एक प्रसंग डॉ. कोडीलकर यांनी सांगितला आणि हा प्रसंग ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतील असा होता तो प्रसंग. ते सांगतात, “रोजच्या दैनंदिनीमध्ये मी जणू माझ्या परिवाराला विसरलोच होतो. माझा लहान पाच वर्षांचा मुलगा मला फोन करून नेहमी विचारायचा की, “पप्पा तू केव्हा येणार घरी, मला खूप खेळायचंय” आणि मी नेहमी त्याला काहीतरी कारण देऊन टाळायचो आणि एकदा त्याच्या फोनने मला हलवून ठेवले. तो फोनवर म्हणाला की, “पप्पा तू जर नाही आला तर मी बोलणार नाही, जेवणार नाही, खेळणार नाही, आपली कट्टी होईल” आणि त्याने फोन ठेवला. त्याने मला बोलायला वेळच दिला नाही.
 
 
कारण, त्याला कळून चुकले होते की, पप्पा बोलले तर फक्त कारणंच देतील आणि माझी समजूत काढतील आणि तो दिवस मला आजही आठवतो. त्याने खरंच तीन दिवस माझ्याशी रुसवा-फुगवा दाखवला. मी त्याला कितीतरी खेळणी आणून दिली, तरी तो बोलला नाही. कारण, त्याला त्या खेळण्यापेक्षा मी आणि माझा सहवास हवा होता. पण, मी हतबल होतो. माझ्याकडे असलेले रुग्ण हे खूप मोठ्या संख्येत होते. मी करणार तरी काय, शेवटी नैराश्यच!” पण, याही परिस्थितीत त्यांनी शेवटी नाशिकमधील कोरोना रुग्णांची सेवा अतिशय उत्तमरीत्या केली.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत नाशिक शहरात सामाजिक आणि आर्थिक प्रश्न जास्त पाहावयास मिळाले. मात्र, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असणार्‍या आणि विशेषत: कोरोना उपचारात महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या महत्त्वाच्या घटकांची वानवा अनेकांना भासली. यात विशेष करून ‘ऑक्सिजन’ची, ‘व्हेंटिलेटर’ची, रुग्णखाटांची, औषधे, इंजेक्शन यांची कमतरता त्रासदायक ठरत होती, तर दुसरीकडे याउलट वाढत होती ती रुग्णसंख्या. अशा भीषण स्थितीत डॉ. कोडीलकर यांनी त्यांचे रुग्णसेवेचे कार्य आपल्या अभियंता नगर, सिडको भागात असलेल्या ‘ग्लोबल हॉस्पिटल’च्या माध्यमातून अविरतपणे केले.
 
नाशिकमध्ये कोरोनाकाळात सरकारी रुग्णालयांच्या बरोबरीनेच खासगी रुग्णालयांनीदेखील महत्त्वाची भूमिका रुग्णसेवेत बजावली. त्यापैकी एक प्रख्यात रुग्णालय म्हणजे नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय. या रुग्णालयातील अद्ययावत लॅब, प्रशिक्षित डॉक्टरवर्ग, उत्तम सेवाकार्य करणारा कर्मचारी वर्ग यामुळे या हॉस्पिटलमध्ये अनेक कोरोनाबाधितांनी उपचार घेतले. याच कॉलेजमध्ये कोडीलकर सर हे ‘असोसिएट प्रोफेसर’ म्हणून आहेत आणि त्यांच्या अनुभवाचे आणि अभ्यासाचे प्रशिक्षण ते विद्यार्थ्यांना आजही देत आहेत.आपल्या ‘ग्लोबल हॉस्पिटल’बरोबरच डॉ. कोडीलकर यांनी कोरोनाकाळात संस्थेच्या माध्यमातूनही रुग्णसेवा केली. मागील आठ वर्षांपासून डॉ. कोडीलकर हे वैद्यकीय सेवेत असून, त्यांचा हा अनुभव कोरोनाकाळात अनेक रुग्णांसाठी वरदानदायी ठरला.
 
 
कोरोनाकाळात रुग्णांना तपासताना त्यांचे केवळ शारीरिक आरोग्य कसे आहे, हेच डॉ. कोडीलकर यांनी जाणून घेतले नाही, तर त्यांनी अनेक रुग्णांना मानसिक आधार देत त्यांचे मानसिक खच्चीकरण कसे होणार नाही, यावरदेखील लक्ष केंद्रित केले. औषधोपचार करत असताना काही रुग्णांना आर्थिक भार सहन करावा लागत होता. अशा वेळी डॉ. कोडीलकर यांनी आपल्या प्रयत्नांतून अनेक रुग्णांचा हा भार कसा कमी होईल, यासाठी निष्ठेने प्रयत्न केले. काही हजारांच्या घरात डॉ. कोडीलकर यांनी उपचार करत अनेकांना या कठीण काळात आधार दिला. जे अगदी हतबल होते, त्यांनादेखील योग्य उपचार दिले आणि त्याच्या मोबदल्याचादेखील त्यांनी विचार केला नाही.
 
 
आधीच नमूद केल्याप्रमाणे नाशिकमध्ये ‘ऑक्सिजन’ची मोठ्या प्रमाणात कमतरता या काळात भासली. रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यास आपल्याकडील साधने ही तोकडी असल्याचे या काळात डॉ. कोडीलकर यांना जाणवले. त्यामुळे आगामी काळात दुर्दैवाने जर अशी पुन्हा परिस्थिती ओढवली, तर ‘ऑक्सिजन’सारख्या नेमक्या आवश्यक असणार्‍या बाबींची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी आगामी काळात प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे डॉ. कोडीलकर यांनी आवर्जून नमूद करतात.
 
 
नाशिकमध्ये असलेल्या वैद्यकीय सुविधा, पटकन होणारे उपचार आणि निदान यामुळे जिल्ह्यातील अनेकांनी या काळात नाशिक शहरात येत कोरोना आजारावर उपचार करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे नाशिकसह आडगाव, संगमनेर, कळवण, निफाड आदी भागांतीलदेखील रुग्णांवर डॉ. कोडीलकर यांनी या काळात उपचार केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून डॉ. कोडीलकर यांचे सुरू असलेले हे सेवाकार्य आजही सुरू आहे. पहिली लाट आणि दुसरी लाट या दोन्ही लाटेत डॉ. कोडीलकर यांचे रुग्णसेवेचे असणारे हे योगदान अनेकांसाठी लाभकारक ठरले. डॉ. कोडीलकर हे सातत्याने कोरोना रुग्णांची सेवा करत होते. त्यामुळे त्यांना लागण होण्याचीदेखील दाट शक्यता होती आणि ती झालीही.
 
 
डॉ. कोडीलकर यांच्या पत्नीदेखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे घरातील अन्य सदस्यांना कोरोनाची लागण होऊ नये, अशाप्रकारे कार्य करणे, हेच डॉ. कोडीलकर यांच्यासमोर एक मोठे आव्हान होते. यावर उपाय म्हणून डॉ. कोडीलकर हे तब्बल तीन महिने घरापासून लांब राहिले. डॉ. कोडीलकर यांचा पाच वर्षांचा लहान मुलगा हे सर्व या काळात पाहत होता. त्याची समज त्याला आपल्या पित्याच्या कार्याबद्दल नेमकी माहिती व्हावी इतकी नक्कीच नसणार. मात्र, रोज आपल्यात मिसळणारे आपले वडील काही दिवसांपासून आपल्यात मिसळत नाहीत, ही भावना त्याला नक्कीच जाणवत असावी आणि तेच उदाहरण वर दिले आहे.
 
 
त्यातच कोरोना काय आहे, याची त्याच्या वयाच्या पातळीवर असणारी माहिती त्याला होतीच. मात्र, आपले वडील आपल्या जवळ असावे, यासाठी त्यांच्या मुलाने डॉ. कोडीलकर यांच्या समोर पर्याय ठेवत “पप्पा, तुम्ही कोरोना पेशंट तपासू नका,” असे त्यांना सांगितले. लहानग्याचे हे स्वर त्याला आपल्याबद्दल असलेली कणव समजण्यासाठी खूप मोलाचे होते, असे डॉ. कोडीलकर आवर्जून नमूद करतात. “वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करताना प्रत्येक डॉक्टरला रुग्णसेवेची शपथ घ्यावी लागते. ही शपथच डॉक्टरांना इतर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा वेगळे ठरवत असते. तसेच, मानवतेचा धर्म आणि अविरत रुग्णसेवेचे व्रत स्वीकारण्याची ताकद हीच शपथ आपल्याला देत असते,” असे डॉ. कोडीलकर विशेषत्वाने अधोरेखित करतात. त्यांच्यासाठी हीच शपथ कोरोनाकाळातील कार्यासाठी प्रेरणास्रोत ठरली.
 
 
 
“कोरोनाकाळातील कार्य हे कोण्या एकट्याचे कार्य नक्कीच नाही, ते एक सामूहिक कार्य आहे,” असे सांगताना डॉ. कोडीलकर, “आपल्या कार्यात आपल्याला ‘ग्लोबल हॉस्पिटल’च्या संपूर्ण चमूचे, संचालक मंडळ यांचे संपूर्ण सहकार्य लाभले,” असे सांगतात. डॉ. कोडीलकर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, पत्नी डॉ. अमृता कोडीलकर यांचे मोलाचे सहकार्य त्यांना या काळात लाभले. वैद्यकीय क्षेत्रात अनेक कंगोरे आहेत. अनेकांची मतमतांतरे आहेत. मात्र, सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्याकामी डॉक्टरांशिवाय पर्याय नाहीच. डॉ. कोडीलकर यांनी अविरत पद्धतीने कार्य करत आपल्यातील कौशल्याने अनेकांना या काळात व्याधीमुक्त करण्यात मोलाची बजावलेली भूमिका अभिमानास्पद आहे.



@@AUTHORINFO_V1@@