शिक्षणाची धनं‘जय’ वारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2021   
Total Views |

manse 18 aug_1   
 
आर्थिक अडचणी असतानाही परदेशात ‘मास्टर्स’ पदव्या मिळवून यशस्वी झालेल्या कल्याणच्या धनंजय रूपश्री एकनाथ सोनवणे यांच्याविषयी...


अगदी ९० टक्के पडूनदेखील विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत अडकल्याच्या बातम्या कानावर आदळतात; अशा वेळी बदलत्या परीक्षेचे रौद्ररूप आपल्या समोर येते. असाच एक मुलगा बारावीला कमी मार्क मिळाल्याने निराश झाला होता. धनंजय रूपश्री एकनाथ सोनवणे असे त्याचे नाव. पण, आलेली ही निराशा झटकत त्याने मेहनतीने यशाच्या पायर्‍या चढल्या. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय मार्केटिंग’ विषयात ‘मास्टर्स’ करणार्‍या धनंजय यांचा प्रवास उत्तरोत्तर त्याच्या नावाप्रमाणे शिक्षणात जय मिळवणारा आहे.

 
धनंजय यांचा जन्म दि. ३ जून, १९९५ रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सर्वसामान्य कुटुंबातील सदस्याप्रमाणेच धनंजय यांचे बालपणदेखील जेमतेम गेले. अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते माध्यमिक व उच्च माध्यमिकपर्यंत वर्गात सतत वरच्या क्रमांकावर उत्तीर्ण होऊन त्यांनी आपले उच्च स्थान कायम राखले. बारावीचा निकाल लागल्यावर त्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून त्यांनी दोन-तीन दिवस तर मौनव्रतच धारण केले होते. परंतु, कुटुंबीयांनी समजूत काढल्यानंतर ते शांत झाले. पुढे तब्बल आठ ते दहा वर्षं धनंजय आजीच्या वात्सल्यात घडले.त्याकाळी मास मीडियामध्ये पदवीच्या अभ्यासक्रमास नुकतीच सुरुवात झाली होती. धनंजय मुळात विज्ञान शाखेचा विद्यार्थी, तरीदेखील त्यांच्या इच्छेप्रमाणे मुलुंड येथील वझे-केळकर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथेच त्यांच्या पुढील जीवनाची दिशा ठरली.

धनंजय हळव्या स्वभावाचे असून, अगदी समजावून सांगणारे तसेच सगळ्यांना सामावून घेणारे समंजस असल्याने शालेय ते महाविद्यालयीन प्रवासात त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. लहान असतानाच ‘तायक्वॉडो कराटे’चे प्रशिक्षण घेत होते. त्या माध्यमातून तालुका व ‘जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप’ स्पर्धेत सहभागी झाले. पुढे मास मीडिया शिकत असताना पत्रकारितेची कास न धरता, धनंजय यांनी शेवटच्या वर्षाला ‘अ‍ॅडव्हरटायझिंग सायन्स’ पूर्ण केले.

मुंबईच्या एका परदेशी कंपनीत ‘स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग एक्स्पर्ट’ म्हणून काम करत असताना ‘डिजिटल मार्केटिंग’चा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेटा सायन्स’ पदव्युत्तर यशस्वीपणे पूर्ण केला. हे एवढे करूनदेखील आयुष्यात पुढे जाण्यासाठी सरस्वती त्यांना खुणावत होती. त्यातच परदेशी शिक्षणाची संधी चालून आली. प्रारंभीची प्रवेश परीक्षा दिल्यानंतर मार्च २०१९ मध्ये त्यात यश आले. पण, घरची कौटुंबिक स्थिती जेमतेम असल्याने पुढील सर्व आर्थिक आघाड्यांवर मात कशी करायची? याचे फार मोठे दिव्य समोर ठाकले होते. परंतु, संकटकाळी त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेकदा योग्य दिशा मिळेलच असे नाही. परंतु, धनंजय यांच्या बाबतीत कठीण परिस्थिती असूनही त्यात सुकरता आली, ती म्हणजे धनंजय यांची आई रूपश्री व आजी विजया या पदर खोचून मदतीसाठी उभ्या ठाकल्या. त्यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम धनंजयसाठी देण्याचे ठरवले. इतकेच काय तर ‘ठाणे लघुउद्योग संघटना’ (टिसा) व या संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ यांनीदेखील हात दिला. या सर्वांनी दिलेल्या भरीव मदतीच्या पाठिंब्यामुळे तसेच सोबतीला असलेल्या ‘ठाणे जनता’ (टीजेएसबी) बँकेच्या अर्थसाह्यामुळे धनंजय यांची ही समस्या दूर झाली अन् त्यांच्या परदेशवारीच्या विमानाने उड्डाण केले.

कोरोनाकाळात कल्याणहून ठाणे येथे परदेशात पैसे पाठवण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत पोहोचणे कठीण होते. पण, ‘टीजेएसबी’चे चांगले सहकार्य ‘ऑनलाईन’द्वारे मिळाले आणि धनंजय यांना ऑगस्ट २०१९ मध्ये बोस्टन येथील ‘हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूल’मध्ये प्रवेश मिळाला. बोस्टन येथे अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभामध्ये त्याने ‘आंतरराष्ट्रीय मार्केटिंग’मध्ये ‘मास्टर्स ऑफ सायन्स’ तसेच ‘मास्टर्स ऑफ सायन्स इन बिझनेस अ‍ॅनलिटिक्स’ (एमएस) या पदव्युत्तर मास्टर्स पदव्या चांगल्या ग्रेडसह पूर्ण केल्या. संपूर्ण जगभर कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असताना अमेरिकासुद्धा याला अपवाद नव्हता. तरीही अशा बिकट परिस्थितीत अथक परिश्रमाच्या जोरावर परदेशात प्रत्यक्ष उपस्थित राहून तर कधी ‘ऑनलाईन’द्वारे वेगळ्या शिक्षण पद्धतीत तेही नामवंत शिक्षण संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण करून धनंजय यांनी यशाची पताका फडकवली. हा एकप्रकारे मराठी युवकाचा पराक्रम म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
‘हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूल’ने दुसर्‍या पदव्युत्तर कोर्सची संपूर्ण फीची सुमारे २४ हजार डॉलरची स्कॉलरशिप दिली होती. हेदेखील धनंजय आणि त्याचे कुटुंबीय आवर्जून नमूद करतात. बोस्टनमधील यशस्वितेनंतर धनंजय यांच्या नशिबाचे दारही किलकिले झाले आहे. उत्तीर्ण झाल्यानंतर आता अमेरिकेतील बड्या कंपन्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये धनंजय यांनी मुलाखतीदेखील दिल्या आहेत आणि त्यातही यशस्वी होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. अशा या धनंजय यांना भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!








 
 
 
@@AUTHORINFO_V1@@