विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील मंदिरं बंद असण्यावरून सरकारविषयी रोष व्यक्त केला
पंढरपूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर राज्य सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार दुकाने, मॉल, हॉटेल आदींसाठी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळं पुढील आदेशापर्यंत बंदच असतील असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारविषयी रोष व्यक्त केला.
मंदिर बंद ठेवण्यामागचं कारण मला अजून लक्षात येत नाहीये. जेवढी गर्दी मॉलमध्ये असते, जेवढी गर्दी शॉपिंग सेंटरमध्ये असते त्यापेक्षा कमीच गर्दी मंदिरात असते. सोशल डिस्टंसिंग पळून मंदिर सुरु करता येऊ शकतात. वारंवार हे सांगितलं आहे की मंदिर धार्मिक भावनांसाठी सुरु करणे म्हणून ही मागणी नाहीये. आम्ही तर हिंदू आहोत, हिंदूंना ३६ कोटी देव आहेत.आमच्यासाठी दगडातही देव आहे. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. गरिबातील गरीब कुटुंब मग ते हारवाला, कुंकू विकणारा, प्रसाद विकणारा, मंदिरातील पुजारी तेथील सफाईवाले अशा अनेकांची उपजीविका ही मंदिरांवर अवलंबून असते. त्यांच्यासाठी सरकारने काय विचार केला. सरकारने त्याच्यासाठी एका नव्या पैशाची मदत केली नाही. त्यांना झिडकारून टाकणं बरोबर नाही. त्या लोकांचा विचार तर करा ना.त्यांच्यासाठी तरी मंदिरं उघडा.नाहीतर सांगा त्याच्यासाठी आम्ही मदत देतो मग ठेवा बंद मंदिर. मला असं वाटत की सरकारची ही नीती चूक आहे. तुम्ही दारुची दुकानं सुरु ठेवता आणि मंदिरं बंद ठेवता, अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
राज्यातील शाळांच्या निर्णयाबाबत सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. सरकारला त्यासंदर्भात पालकांना विश्वासात घेऊन एक ठोस निर्णय करावा लागेल. रोज निर्णय बदलला तर पालक गोंधळून जातात, विद्यार्थी गोंधळून जातात, त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन काहीतरी ठोस निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.