पृथ्वीच्या तापमान वाढीमुळे भारतात कसा हाहाःकार माजेल याबद्दल नासाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. पुढील ८० वर्षांत म्हणजेच २१०० पर्यंत जगाचा नकाशा कसा असेल, आज आपण राहतो ती जागा पाण्याखाली असेल की, सुरक्षित असेल याबद्दलचे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. समुद्रातील जलस्तर वाढून भारतातील १२ तटबंदी असलेली शहरे तीन फूट पाण्याखाली जातील, असा अंदाज आहे. सततचे वाढणारे तापमान, धुव्रांवर विरघळणारा बर्फ वितळल्याचा हा परिणाम असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
विशेष म्हणजे नासाने सांगितल्यानुसार, भारतातील ओखा, मोरमुगाओ, कंडला, भावनगर, मुंबई, मंगळूर, चेन्नई, विशाखापट्टणम, तूतीकोरन, कोच्ची, पारादीप आणि पश्चिम बंगालच्या किडरोपोरचा समुद्रा लगतचा भाग या जगबुडीच्या भक्ष्यस्थानी पडणार आहे, इथे राहणाऱ्यांना या जागा येत्या काही दशकांत सोडाव्या लागणार आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम येत्या काळात जितका भौगोलिक होईल, तितकाच अर्थकारण आणि समाजकारणावरही दिसून येणार आहे.
आता आपल्या मुंबईचेच उदाहरण घेऊयात. मुंबई ही कोट्यवधी नागरिकांच्या पोटाची खळगी भरणारी आई... तिच्या जीवावर लाखो लोक आपला उदारनिर्वाह करत असतात. काही जण देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. मिळेल तिथे राहतात. रस्ते, फलाट, अनधिकृत झोपडपट्ट्या मिळेल तिथे राहतात. मुंबई शहर काही वसवलेले शहर नाही पण तिथे पूर्वीपासूनच आगरी-कोळी समाज मासेमारी करत आला आहे. किनाऱ्यावरील महत्वाचे प्रकल्प आहेत. विकासकामे आहेत, खाडी लगतच्या भागातील पर्यावरणाची परिसंस्था आहे, अशा सर्व घटकांवर याचा एकत्रित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
नासाने आपल्या अहवालासाठी एक 'सी लेव्हल प्रोजेक्शन टूल' तयार केले आहे. समुद्री तटांवर येणाऱ्या संकटांची आधीच चाहूल लागते. तसेच संकट काळात बाहेर निघण्याचीही पूर्वसूचना मिळते. याच यंत्रणेनुसार, भविष्यात येणारी नैसर्गिक आपत्ती, समुद्राची पातळी यांचाही अभ्यास केला जाणार आहे. याच अहवालात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
नासाने इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (IPCC) हवाल्यानुसार म्हटले आहे की, भविष्यात कित्येक शहरे समुद्राची पातळी वाढल्याने पाण्याखाली जाणार आहेत.
या संस्थेचा हा सहावा अहवाल आहे. ९ ऑगस्ट रोजी हा अहवाल जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात वातावरण बदलाचे संकेत, आव्हाने आणि प्रकार उलगडून सांगितले आहेत. IPCC 1988 पासूनच जागतिक स्तरावरील वातावरण बदलाचा अभ्यास करत आहे. या पॅनलद्वारे पाच ते सात वर्षांत जगभरातील पर्यावरण स्थितीचा अहवाल केला जातो. मात्र, यंदाचा अहवाल हा भयानक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे.
अहवालानुसार, २१०० या वर्षांपर्यंत जगाचे तापमान सातत्याने वाढत जाईल. लोकांना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण न रोखल्यास सरासरी तापमान ४.४ अंश सेल्सिअंश वृद्धी केली जाणार आहे. दोन दशकांत हे तापमान १.५ अंशांनी वाढणार आहे. या गतीने तर हिमपर्वतही विरघळू लागणार असून त्याचे पाणी समुद्रात मोठा हाहाःकार घेऊन येणार, असा अंदाज आहे.
नासाचे अधिकारी बिल नेल्सन यांच्या मते, समुद्राचे क्षेत्रफळ वाढेल हे वैज्ञानिकांनी आणि नेत्यांनी सांगून टाकले पण भविष्यात, असा हाहाःकार माजणार आहे की, पुढील शतकात जमीन कमी पडेल इतकी भयानक अवस्था असेल. परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. कित्येक बेटे जगाच्या नकाशावरून लुप्त पावतील. आत्ताच बरीच उदाहरणे जगापुढे आहेत. भविष्यात समुद्र अशा लहान बेटांना, भोवतालच्या शहरांना वस्त्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करेल, अशी भीती या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.
आशियासह भारतालाही याचा मोठा फटका बसणार आहे. हिमालयाच्या क्षेत्रात सातत्याने हिमनगांचे वितळणे, बर्फाने आच्छादीत तलावांचे कवच सातत्याने फाटत असल्याने पर्यावरण, परीसंस्था, मानव यांना मोठा फटका बसणार आहे. सरासरी पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. दक्षिणेकडील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे. नुकतेच आपण कोकणात तौक्ते, निसर्ग या दोन वादळांना आणि आत्ताच आलेल्या महापूराचा वाईट अनुभव घेतला. शंभर वर्षांत पर्यावरणात होणारे बदल आता १० ते २० वर्षांत घडत असल्याने चिंता आणखई वाढत आहे.
आता प्रश्न हा आहे की, दरवेळी प्रमाणे विकासकामे, कार्बन उत्सर्जन, ग्रीन हाऊस गॅस, प्लास्टीक कचरा प्रदुषण ही कारणे दिली जाणार का याबद्दलचा आणखी कुठला तर्कसंगत शोध लावला जाणार की, पुन्हा एकदा या पर्यावरण संवर्धनासाठी मोहिमा, मोर्चे काढून विषय थंड होणार हा येणारा काळच ठरवणार आहे. कारण दुष्काळ, अतिवृष्टी या गोष्टी मानवाने प्रगतीपथावर पाऊल ठेवण्यापूर्वीही होत्या. निसर्ग प्रकोप तेव्हाही दिसत होता आणि आजही तसाच आहे. माणूस त्यापुढे कायम हतबल ठरला आहे २००० हजार वर्षांत जितकी तापमान वाढ झाली नाही तितकी वाढ ५० वर्षांतच झालेली आहे. ही भविष्यात आपल्यासाठीच धोक्याची घंटा आहे. कारण आज ज्या जमिनीच्या तुकड्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावलेले असेल तोच जर पाण्याखाली जाणार असेल तर हा स्वतःहून खड्डा खणण्या सारखा तर नाही ना हाही विचार करायला हवा. मुंबईकर म्हणून तर प्रत्येकानेच करायला हवा.