पराभवाचे भय भारतीय खेळाडूंच्या मानगुटीवरून उतरायलाच तयार नव्हते. टोकियोत नीरज चोप्राच्या भाल्याने या भयाचा वेध घेतला आणि थेट ‘गोल्डमेडल’ला गवसणी घातली. ‘ऑलिम्पिक’च्या १२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय तिरंगा डौलाने मुख्य स्टेडियममध्ये फडकला आणि त्यावेळी स्टेडियममध्ये वाजवण्यात आलेल्या राष्ट्रीय गीताच्या धूनमध्ये ज्या मोजक्या भारतीयांचा आवाज अभिमानाने घुमला. त्यापैकी मी एक होतो. नीरजच्या त्या सुवर्णमय कामगिरीने ‘अॅथलेटिक्स’च्या मैदानावरील स्वातंत्र्याची नवी पहाट अवघ्या भारताने अनुभवली.
भय हीच खरी गुलामी आहे आणि या भयापासून मुक्तता हेच खरे स्वातंत्र्य आहे.
म्यानमारच्या स्वातंत्र्यलढ्यात मुख्य भूमिका बजावणार्या नोबल पुरस्कारप्राप्त अँग सॅन सु की यांचे हे वाक्य वाचनात आले होते. हे वाक्य जपानमधील टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये खर्या अर्थाने जगण्याची संधी भारतीय खेळाडूंनी दिली. या गुलामीची साखळी तोडण्याची सुरुवात केली ती मीराबाई चानूने आणि त्यावर सुवर्ण कळस चढवला, तो भालाफेकपटू नीरज चोप्राने...
बॅरेन पिअर द कुबरर्तिनने आधुनिक ‘ऑलिम्पिक’ला १८९६ ला सुरुवात केल्यापासून ‘ऑलिम्पिक’च्या मुख्य स्टेडियममध्ये स्वतंत्र भारताचा तिरंगा कधी फडकला नव्हता ना राष्ट्रगीत कधी वाजले होते. ‘ऑलिम्पिक’मधील ‘अॅथलेटिक्स’च्या स्पर्धा या मुख्य स्टेडियममध्ये खेळवल्या जातात. १९०० च्या ‘ऑलिम्पिक’मध्ये नॉर्मन पिचड या जन्माने ब्रिटिश खेळाडूने भारताच्या नावाने सहभाग नोंदवून मेडल जिंकले होते. पण त्या मेडलला स्वदेशीचा मान नव्हता. भारत पारतंत्र्यात असतानाही भारतीय खेळाडू ‘ऑलिम्पिक’मध्ये सहभागी होत असत. पण मैदानी खेळांचा राजा मानले गेलेल्या ‘अॅथलेटिक्स’मध्ये भारतीय खेळाडूला कधीही गेल्या १२५ वर्षांत मेडल जिंकता आलेले नव्हते. हॉकीत आपण आपला दबदबा राखून होतो. पण मैदानी ‘अॅथलेटिक्स’मध्ये मात्र १२५ कोटींचा आपला देश मेडलपासून सदैव वंचित राहत होता. पराभवाचे भय भारतीय खेळाडूंच्या मानगुटीवरून उतरायलाच तयार नव्हते. टोकियोत नीरज चोप्राच्या भाल्याने या भयाचा वेध घेतला आणि थेट ‘गोल्डमेडल’ला गवसणी घातली. ‘ऑलिम्पिक’च्या १२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय तिरंगा डौलाने मुख्य स्टेडियममध्ये फडकला आणि त्यावेळी स्टेडियममध्ये वाजवण्यात आलेल्या राष्ट्रीय गीताच्या धूनमध्ये ज्या मोजक्या भारतीयांचा आवाज अभिमानाने घुमला. त्यापैकी मी एक होतो. नीरजच्या त्या सुवर्णमय कामगिरीने ‘अॅथलेटिक्स’च्या मैदानावरील स्वातंत्र्याची नवी पहाट अवघ्या भारताने अनुभवली.
भारताने यंदाच्या टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये एकूण सात मेडल्स जिंकली. त्यात एक ‘गोल्ड’, दोन ’सिल्व्हर’ आणि चार ‘ब्राँझ मेडल’चा समावेश आहे. १२५ वर्षांच्या ‘ऑलिम्पिक’च्या इतिहासातील भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी लंडन ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताने दोन ’सिल्व्हर’ आणि चार ‘ब्राँझ मेडल’ जिंकली होती.
वैयक्तिक खेळात ‘गोल्ड मेडल’ जिंकण्याची भारताची ही तशी दुसरी वेळ. यापूर्वी २००८ मध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत भारताने ‘गोल्ड मेडल’ जिंकले होते. बिंद्रा आणि नीरज या दोघांचीही ‘ऑलिम्पिक’ची ‘गोल्ड मेडल’ची कामगिरी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहणारा मी एकमेव भारतीय पत्रकार ठरलोय. नीरजने हे ऐतिहासिक ‘ऑलिम्पिक गोल्ड मेडल’ जिंकल्यानंतर त्याची जर्सी आठवण म्हणून मला स्वाक्षरी करून दिली. ‘ऑलिम्पिक’च्या पाच वर्तुळाप्रमाणे माझ्या ’ऑलिम्पिक’ पत्रकारितेचेही पाच वर्तुळ पूर्ण झाले होते. नीरजच्या त्या टी-शर्टच्या रुपाने मलाही माझे पत्रकारितेतील ‘गोल्ड मेडल’ मिळाले होते.
तसे माझे हे पाचवे ‘ऑलिम्पिक.’ अॅथेन्स, बीजिंग, लंडन, रिओ आणि आता टोकियो ‘ऑलिम्पिक’ पत्रकार म्हणून ‘कव्हर’ केले. या पाच ‘ऑलिम्पिक’मधील भारतीय खेळाडूंच्या जिद्दीची कहाणी थक्क करून टाकणारी आहे. ‘ऑलिम्पिक’च्या मेडलच्या संख्येपलीकडील हे वास्तव स्तिमित करणारे आहे.
आधुनिक ‘ऑलिम्पिक’ला १८९६ साली सुरुवात झाली आणि त्यात भालाफेकीचा समावेश १९०८ च्या लंडन ‘ऑलिम्पिक’मध्ये करण्यात आला. त्यानंतर झालेल्या गेल्या २५ ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताचे फक्त दोनच खेळाडू आजवर ‘ऑलिम्पिक’च्या भालाफेकीसाठी पात्र ठरले. १९८४ च्या कॅलिफोर्निया ‘ऑलिम्पिक’मध्ये गुरुतेज सिंग ७०.०८ मीटर दूर भालाफेक करत गटातील १४ खेळाडूत बारावा आला. त्यानंतर २००० च्या सिडनी ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताच्या जगदीन बिष्णोईने ७०.८६ मीटर भालाफेक करीत ३६ खेळाडूंमध्ये ३० व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. अशा या आजवर फक्त दोन खेळाडूंचा ‘ऑलिम्पिक’ सहभाग आणि तेही गटातच गारद झालेल्या या क्रीडा प्रकारात ‘ग्लॅमर’ ते काय असणार. पण तरीही नीरजने हा खेळ निवडला आणि नुसताच निवडला नाही, तर आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्याने ऐतिहासिक ‘ऑलिम्पिक गोल्ड मेडल’ला गवसणी घातली. टोकियोत ’तो’ आला. ‘त्याने’ पाहिले आणि ‘तो’ जिंकला.
पात्रता फेरीत अव्वल आल्याने पहिला प्रयत्न नीरजचा होता. त्याने ८७.०३ मीटर दूर भालाफेक केली. दुसर्या प्रयत्नात त्यात सुधारणा करीत ८७.५८ मीटरवर भालाफेक केली. संपूर्ण ‘फायनल’मध्ये त्याच्या पहिल्या प्रयत्नातील ८७.०३ मीटरचा टप्पाही कुणाला पार करता आला नाही. नशीब शुराला साथ देते म्हणतात, अगदी तसेच झाले. जर्मनीचा ‘व्हेटर’ हा ‘वर्ल्ड चॅम्पियन’ खेळाडू. यंदाच्या वर्षात त्याने तब्बल सातवेळा ९० मीटर पार भालाफेक केलेली. पण सहा प्रयत्नांसाठी निवडण्यात येणार्या अंतिम फेरीतील १२ पैकी आठ खेळाडूंतही त्याला जागा मिळवता आली नाही. त्याची सर्वोत्तम कामगिरी होती ८२.५२ मीटर. त्यानंतर नीरजला धोका होता, तो झेक प्रजासत्ताकच्या वॅडलेच आणि वेस्सेलीकडून. वॅडलेचची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती ८९.७३, तर वेस्सेलीची ८८.३४ मीटर. त्यात वेस्सेलीचे गुरू होते माजी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि ‘ऑलिम्पिक’ भालाफेकीमध्ये तीन ‘गोल्ड’ आणि एक ‘सिल्व्हर’ मिळवणारे महान भालाफेकपटू झेलेंझी. त्यांचा ९८.४८ मीटरचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ अजूनही कायम आहे. अशा स्थितीत या दोन्ही झेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंच्या शेवटच्या प्रयत्नापर्यंत काहीही होऊ शकले असते. स्टेडियममध्ये उपस्थित आम्हा शे-दोनशे भारतीय लोकांचाच नव्हे, तर तमाम भारतीयांच्या हृदयाची धडकन जोरात सुरू होती.
आणि तो क्षण आला... भारतीय ‘अॅथलेटिक्स’साठी ती सुवर्ण पहाट होती. नीरजच्या कोणत्याच प्रतिस्पर्ध्याला त्याची ८७.५८ मीटरची कामगिरी मागे टाकता आली नाही आणि त्याला विजयी घोषित करण्यात आले. नीरजने त्याच्या भाल्याने ‘ऑलिम्पिक’ सुवर्णाचा वेध घेतला होता. ‘ऑलिम्पिक’च्या मुख्य मैदनात फक्त ‘अॅथलेटिक्स’चे खेळ होतात. गेल्या १२५ वर्षात या मुख्य स्टेडियममध्ये कधीच तिरंगा लहरला नव्हता. यापूर्वी महान धावपटू मिल्खासिंग आणि पी. टी. उषा यांनी चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. या मुख्य स्टेडियममध्ये तिरंगा फडकताना पाहण्याची मिल्खासिंग यांची प्रबळ इच्छा होती. पण दोनच महिन्यापुर्वी त्यांचे निधन झाले. हे ‘गोल्ड मेडल’ नीरजने मिल्खासिंग यांना समर्पित केले. त्यांनी आम्हाला जिजानसे खेळायला शिकवले. आज ते असायला हवे होते. पण ते जिथे कुठे असतील तेथून माझे हे यश पाहत असतील, असे सांगताना नीरज भावनिक झाला. नीरजच्या या यशात त्याचे कोच जर्मनीचे युवे होन यांचा मोठा वाटा होता. जुन्या भाल्यासह १०० मीटर पार करणारे ते पहिले भालाफेकपटू होते. त्यांनी त्यावेळेचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला होता, पण पुढे १९८६ मध्ये नव्या डिूझाईनचा भाला आल्यावर त्यांचा हा रिकॉर्ड पुसून नव्याने नोंद ठेवण्यात येऊ लागली. १९८४ सालच्या ‘ऑलिम्पिक’वर पूर्व जर्मनीने बहिष्कार टाकल्यामुळे ‘ऑलिम्पिक’ खेळण्याचे होन यांचे स्वप्नही अधुरे राहिले. पण त्यांचा शिष्य नीरजने अखेर ‘ऑलिम्पिक मेडल’ जिंकून दाखविले.
अर्थात, नीरजचा हा प्रवास तितका सोपा नव्हता. ३ मे, २०१९ ला त्याच्या दुखर्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दिनशॉव पारडीवाला यांनी ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली होती. दोन तास शस्त्रक्रिया चालली होती. पारडीवाला म्हणतात, जर शस्त्रक्रिया अपयशी ठरली असती तर तो पुन्हा उभ्या आयुष्यात भालाफेक करू शकला नसता. पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्याने चक्क ‘गोल्ड मेडल’लाच गवसणी घातली.
यंदाच्या ‘ऑलिम्पिक’मध्ये अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या
मीराबाई चानूने ‘वेटलिफ्टिंग’मध्ये ‘सिल्व्हर मेडल’ जिंकले. भारताचे हे ‘वेटलिफ्टिंग’मधील पहिलेच ‘मेडल’ ठरले. इतकचे नव्हे, तर ‘ऑलिम्पिक’च्या पहिल्याच दिवशी ‘मेडल’ जिंकण्याचीही भारताची ही पहिलीच वेळ होती. बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूने ‘ब्राँझ मेडल’ जिंकले. ‘ऑलिम्पिक’चे दोन मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. रिओ ‘ऑलिम्पिक’मध्ये तिने ‘सिल्व्हर मेडल’ जिंकले होते. कुस्तीपटू सुशील कुमारने यापूर्वी दोन मेडल जिंकली होती. लंडनमध्ये ‘सिल्व्हर’ तर बीजिंगमध्ये ‘ब्राँझ मेडल.’ हॉकीत तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘मेडल’ जिंकले आहे. भारतीय महिला हॉकी संघाची ‘सेमी फायनल’ला धडकण्याची कामगिरी लक्षात राहण्यासारखी.
कुस्तीमध्ये रवी कुमारने ‘सिल्व्हर’, तर बजरंग पुनियाने ‘ब्राँझ मेडल’ जिंकले. खरंतर बजरंग पुनिया आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट हे यावेळी ‘गोल्ड मेडल’चे दावेदार मानले जात होते. पण फोगटचे आव्हान धक्कादायकरित्या संपुष्टात आले, तर बजरंगला ‘ब्राँझ मेडल’वर समाधान मानावे लागले.
बॉक्सिंगमध्ये लवलिनाने एकहाती भारतीय पथकाचा भार वाहिला. गुवाहाटीची ही खेळाडू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करीत येथपर्यंत पोहोचली आणि भारताला ‘मेडल’ जिंकून दिले. आपले दुसरे ‘मेडल’ जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अधुरेच राहिले. पुरुष बॉक्सरनी मात्र साफ निराशा केली. हीच निराशा नेमबाजी आणि तिरंदाजीतही पाहायला मिळाली. ‘ऑलिम्पिक’पूर्वी पदकाचे मजबूत दावेदार असलेल्या या खेळातील खेळाडूंना मेडलविना मायदेशी परतावे लागले.
यंदाच्या ‘ऑलिम्पिक’ने भारताला काय दिले तर मी इतकेच म्हणेन की, जिंकण्याची नवी जिद्द दिली. ही जिद्दच उद्याचा विजयाचा ‘एव्हरेस्ट’ सर करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. कारण....
जिंदगी की जंग मे हैं हौसला जरूरी,
जितने के लिए सारा जहान बाकी हैं...!