मासे जाणून घेऊया; मत्स्यावताराचे संपूर्ण डिकोडिंग !

    11-Aug-2021   
Total Views | 239
fish_1  H x W:


माशांचा सर्वांगिण विचार करायला लावणारे पुस्तक!


मुंबई (किरण शेलार) - 
मासे! हौस म्हणून घरातील टँकमधून पाळलेल्या शोभिवंत माशांपासून ते खवय्यांच्या ताटात वाफाळत येऊन पडणार्‍या व्यंजनांपर्यंत... प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मासा हा जलचर कधी ना कधी तरी येऊन गेलेला असतोच. पर्यावरणाचा विचार करणारे एक प्रजाती म्हणून, हौसेने पाळणारे पदार्थ म्हणून, भाविक मंडळी श्रीविष्णूचा अवतार म्हणून, तर उत्साही मंडळी माशांना गंमत म्हणून पाहातच असतात. सृजनाच्या अभिव्यक्तीतही मासे सुळकन येऊन जातातच. परंतु, या सहजीवांच्या अस्तित्वाचा अष्टपैलू विचार करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल म्हणून ‘मासे जाणून घेऊया...’ या पुस्तकाची दखल घ्यावी लागेल.
 
विनय देशमुख व नंदिनी देशमुख या दाम्पत्याने हे पुस्तक ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’साठी लिहिले आहे. प्राध्यापकी व संशोधन या दोन्ही विषयात काम करणार्‍या या जोडीतल्या विनय देशमुख यांचे गेल्या वर्षी अकाली निधन झाले. मात्र, त्यांच्या पश्चात डॉ. नंदिनी देशमुख आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक नेटाने पूर्ण केले. ‘विद्यार्थी प्रिय’ या ‘विद्यार्थीप्रिय’ दाम्पत्याने आपल्या ज्ञानाचा वापर केवळ पुस्तकापुरता न राहता तो सर्वसामान्यांना विशेषत: मासेमारीवर उपजीविका असलेल्या जनजातीपर्यंतच्या मंडळींना कसा होईल, यासाठी प्रयत्न केला. हे पुस्तक त्या वर्षानुवर्षं केलेल्या ज्ञानार्जनाचेच प्रतिबिंब मानावे लागेल.
 
 
नऊ भागांमध्ये केलेल्या या पुस्तकाच्या मांडणीत माशांच्या सर्वच अंगांचा आणि उपयुक्ततेचा पूर्ण विचार केला आहे. पहिल्या तीन भागांमध्ये माशांची शरीररचना ते बाजारातल्या माशांची ओळख आणि ताजे मासे कसे ओळखावे, याचे ज्ञान देण्यात आले आहे. मस्त्याहार चांगलाच आणि माशांची स्वच्छता आणि आरोग्य या दोन मत्स्याहाराचे तर्कसुसंगत समर्थन करण्यात आले आहे. मासे विक्री आणि त्याच्या विविध व्यवस्थांचाही तपशीलवार विचार या पुस्तकात केला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’च्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ‘कांदळवन प्रतिष्ठान’चे कार्यकारी संचालक विरेंद्र तिवारी व ‘फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉपारेशन ऑफ महाराष्ट्र’चे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेव यांच्या सहकार्याने हे पुस्तक प्रकाशित झाले. ‘फिल्ड गाईड’ म्हणूनही या पुस्तकाचा उपयोग करता येऊ शकतो. कारण, यातील चित्रे माशांच्या विविध प्रजातींची शास्त्रशुध्द पद्धतीने काढलेली छायाचित्रे व माहिती ही या विषयात अभ्यास करणार्‍या सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरावी.
 
 
एका वेगळ्या अर्थाने हे पुस्तक महत्त्वाचे आहे. कारण, पर्यावरणाबाबतच्या वाढत्या जागृतीबरोबरच पर्यावरणविषयक अतिरेकही वाढत आहे. मासेमारी करू नका वगैरे अतिरेकी विचारही यातून मांडले जातात. भरल्यापोटी पर्यावरणाच्या नावाखाली नव्या-नव्या अंधश्रद्धा पसरविणार्‍या या मंडळींचे उदरनिर्वाहासाठी मासेमारीवर अवलंबून असलेल्या जनजातीय मंडळींशी काहीच देणेघेणे नसते. या पुस्तकामुळे पर्यावरणप्रेमी, मत्स्यप्रेमी, खवय्ये यांना एक वेगळा दृष्टिकोन मिळेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. वाचकांसाठी हे पुस्तक ‘अ‍ॅमेझॉन’वर उपलब्ध आहे.
 
 
पुस्तकाचे नाव - मासे जाणून घेऊया
लेखक - डॉ. विनय देशमुख, डॉ. नंदिनी देशमुख
प्रकाशक - कांदळवन प्रतिष्ठान
पृष्ठसंख्या- १२९
मूल्य - २५० रु. 

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121