मुंबई : ९०च्या दशकात एकेकाळी भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम खेळाडू असलेल्या सचिन, सेहवाग, गांगुली आणि द्रविड सारख्या फलंदाजांना हैराण करणाऱ्या न्यूझीलंडचा माजी खेळाडू मृत्यूशी झुंज देत आहे. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिस केर्न्स याची प्रकृती चिंताजनक आहे. ऑस्ट्रेलियातल्या रुग्णालयामध्ये केर्न्स लाईफ सपोर्ट सिस्टीमवर असल्याची माहिती माध्यमांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षांच्या क्रिस केर्न्सवर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रीय झाल्या असून त्याची प्रकृती मागील काही काळापासून चिंतेचा विषय राहिली आहे. ख्रिसला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्या असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आल्या. मात्र या शस्त्रक्रीयांना त्याच्या शरीराने म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने दिवसोंदिवस त्याची प्रकृती खालावत गेली. यानंतर त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले आहे.
न्यूझीलंडच्या क्रिस केर्न्स या अष्टपैलू खेळाडूने ६२ कसोटी आणि २१५ एकदिवसीय खेळल्या. २०००मध्ये विस्डनने केर्न्सची वर्षाच्या सर्वोत्तम ५ खेळाडूंमध्ये निवड केली. २००४ साली २०० विकेट आणि ३ हजारहून अधिक धावा करणारा तो जगातला सहावा खेळाडू ठरला होता. १९८९मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या केर्न्सने ६२ कसोटीमध्ये ३,३२० धावा आणि २१५ एकदिवसीयमध्ये ४,९५० धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केर्न्सच्या नावावर ९ शतके आणि ४८ अर्धशतकेही आहेत.
निवृत्त झाल्यानंतर क्रिस केर्न्सवर संघाच्या इतर खेळाडूंनी फिक्सिंगचे आरोप केले होते. यामध्ये लू विन्सेंट याचा समावेश होता. लू विन्सेंट स्वत: मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. केर्न्सने आपल्याला फिक्सिंगची ऑफर दिली होती, असा आरोप विन्सेंटने केला होता. पण हे आरोप कधीही सिद्ध होऊ शकले नाहीत. मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यानंतर केर्न्सची आर्थिक स्थिती खराब झाली. घर चालवण्यासाठी त्याला ऑकलंड नगरपालिकेचे ट्रक चालवावे लागले, तसंच बस धुणे आणि बारमध्येही काम करावं लागलं.