टोकियो : एकीकडे भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदकाची कमाई केली. तर, दुसरीकडे भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरी गाठून पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे केले आहे. भारताने ब्रिटनला ३ - १ असे नमवत १९७५नंतर तब्बल ४१ वर्षांनी उपांत्य फेरी गाठली आहे. आता भारताला सुवर्ण पदक जिंकण्यासाठी आणखी २ सामने जिंकणे महत्त्वाचे असून बेल्जिअमसोबत त्यांचा सामना होणार आहे.
भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. यानंतर भारताकडून दिलप्रीत सिंहने ७व्या मिनिटाला, गुरजंत सिंहने १६व्या मिनिटाला आणि हार्दिक सिंहने ५७व्या मिनिटाला गोल केला. ग्रेट ब्रिटनकडून सॅम वॉर्डने ४५व्या मिनिटाला गोल केला. भारताचा गोलकीपर पी. आर. श्रीजेशने एक अभेद भिंत बनून समोर कीपिंग केली. त्याने ग्रेट ब्रिटनचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. यामुळे भारताचा विजय अधिक सोपा झाला.
उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, जर्मनी, भारत आणि बेल्जियम हे चार संघ पात्र ठरले आहेत. भारताची गाठ बेल्जियम संघाशी होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध जर्मनी असा दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. भारताचा सामना ३ ऑगस्ट रोजी होईल. दरम्यान, भारतीय संघाने अ गटातील ५ पैकी ४ सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
भारताने १९८० मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. पण या ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी हा प्रकार नव्हता. मॉस्को ऑलिम्पिकमध्ये राउंड रॉबिन फॉरमॅट होता. सर्वाधिक मॅच जिंकलेल्या दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता. भारत आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना झाला होता. भारताने हा सामना ४-३ असा जिंकून सुवर्ण पदक पटकावले होते.