थोडं अमेरिकेत सध्या काय चाललंय ते सांगतो, हॅम्पटनच्या एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री दहा जणांची पार्टी सुरू होती. पार्टी म्हटली की, नाचगाणे आलेच, त्यावेळी अनेकांच्या चेहर्यावर मास्क लावण्यात आला नव्हता. मात्र, हॉटेलचे कर्मचारी, वेटर आणि बारटेंडर मात्र, मास्क वापरत होते. त्यांनी आपले नाक आणि तोंड अगदी दोन-दोन मास्क वापरून बंद केलेले होते. आता एका शोरूममध्ये काय परिस्थिती काय असते तेही जाणून घेऊ म्हटलं, तर तिथे दरवाजावर लिहिलेले आहे की, ‘लसीकरण झालेल्यांना दुकानात विनामास्क प्रवेश करण्याची मुभा.’
तर दुकानातील कर्मचारी मात्र, निळ्या रंगाचे सर्जिकल मास्क वापरून नेमून दिलेली कामे करत आहेत. लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत. पण, मास्क वापरण्याची सक्तीही संपली आहे, तरीही अमेरिकेच्या उच्चभ्रू भागात एक दरी निर्माण झाली आहे. मास्क वापरणारे आणि मास्क न वापरणारे. नियम सर्वांना लागू का नाहीत, लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही दुकानातील कर्मचार्यांना मास्क आणि ग्राहकांना सक्ती का नाही, याबद्दल प्रश्न पडणे साहजिकच आहे. पण, त्याचे मूळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आणखी धक्कादायक वास्तव उघडकीस आले.
अमेरिकेत आता मास्क वापरावरून अनेकांची ओळख ठरवली जाते. वर्णभेदाविरोधात आवाज उठवणार्या अमेरिकेत, जिथे ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’सारखी आंदोलने झाली, तिथे ही नवी ठिणगी पडतेय. कारण अजूनही अमेरिकेत जे लोक मास्क वापरत आहेत, त्यात लेखपाल, वेटर, मसाज करणारे, सुरक्षारक्षक, स्वागत कक्षात बसणारे, केशकर्तनालय व स्पा कर्मचारी आणि वाहनचालक इत्यादींचा सामावेश आहे. तर दुसरीकडे हॉटेलांमध्ये मौज करणारे, मॉल्समध्ये शॉपिंग करणार्यांना मास्कची आवश्यकता नाही. मात्र, कर्मचार्यांना या मास्कची अट घालणे योग्यच कारण अद्याप 50 टक्के जणांच्या लसीकरणाचा टप्पाच पूर्ण झालेला नाही.
हा आकडा दिलासादायक असला तरीही अमेरिकेबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. लीजा मरागाकिस यांनी अमेरिकेतील कोरोना विषाणूच्या ‘व्हेरियंट’बद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे विषाणू लसींपेक्षाही प्रभावी ठरू शकतील, असाही धोका त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी मात्र, अमेरिकेची बाजू सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. वेटर, रिटेल क्लर्क, कॅशिअर आणि अन्य कर्मचारी दिवसभर ग्राहकांच्या संपर्कात येत असतात. ग्राहकांच्या आणि त्यांच्याही जीवाला धोका असू शकतो. अशातच कर्मचार्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली तर त्याचा फटका मालकाला बसू शकतो.
मुळात म्हणजे अनेक कंपन्या, दुकाने, मॉल्सतर्फे मास्क हटवण्याचा पर्याय कामगारांपुढे ठेवला आहे. पण, तरीही कर्मचारी मास्क वापरणे पसंत करतात, असेही त्या म्हणतात. कर्मचार्यांनी मास्क वापरले म्हणजे मॅनेजमेंट आपल्या ग्राहकांचा आणि कर्मचार्यांचा किती विचार करते, असा संदेश जातो, असेही स्पष्टीकरण याबद्दल देण्यात आले. काही कंपन्या अशाही आहेत, जिथे मास्क वापरण्याची गरज नाही, असे सांगण्यात आलेले आहे. पण, ग्राहकांना मास्क नाही आणि कर्मचार्यांना सक्ती, हा दुजाभाव आता निश्चितपणे दिसू लागलेला आहे.
कोरोना काळातील ‘मास्क-वर्गभेद’ न कळण्या इतका दूधखुळा कुणी राहिलेला नाही. मास्क आता असमानतेचे प्रतीक म्हणून उभे राहिलेले आहे. याबद्दल भाष्य करताना अनेक जण म्हणतात की, ग्राहकांच्या आयुष्याबद्दल कंपन्या, शो-रूम्स, मॉल्सबद्दल जास्त चिंतीत आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. याउलट परिस्थिती म्हणजे कर्मचार्यांमुळे ग्राहकांना रोगाची लागण होऊ नये यासाठी हा भेदाभेद सुरू आहे.
पहिल्या लाटेपासून सुरू असणार्या मास्कसक्तीचा असा शेवट होणे, ही दुर्दैवी बाब आहे. चीनमध्ये या विषाणूच्या प्रसाराची सुरुवात झाली. त्यावेळीही अशाच एका ‘मास्क हटाओ’ मोहिमेची सुरुवात झाली होती. तो व्हिडिओ दिलासादायकही वाटला होता. पण, हा प्रकार एक सामाजिक दरी निर्माण करणारा आहे. पण, अतिश्रीमंत वर्गाचा बेफिकीरपणा आणि गरीब वर्गाला मास्क वापरण्याचे बंधन घालून आणखी एका वर्गभेदाला अमेरिका जन्म घालतेय हे नक्की. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन त्यांच्या सभांमध्येही आता विनामास्क फिरताना दिसतात, त्यांच्या पाठी असणारा गोतावळाही तसाच असतो. पण, एक नियम दोघांना वेगवेगळा का हा प्रश्न कायम राहतो. तुलनेने भारतात लसीकरण झाले तरीही मास्क वापरणे बंधनकारक हा नियम स्वागतार्ह आहे.