शास्त्रोक्त आयुर्वेदाचा वापर

Total Views | 332

ayurveda_1  H x
 
 
आयुर्वेदिक औषधे खूप महाग असतात. आयुर्वेदिक औषधोपचारांचा गुण येण्यास खूप वेळ लागतो. आयुर्वेदिक औषधांचा काही ‘साईड इफेक्ट’ नसतो. एकच औषध सगळ्यांनी घेतले, तर काय बिघडले, यांसारखी आपलीही काही मते असल्यास आजचा लेख तुम्हा सर्वांसाठी आहे.
 
 
आयुर्वेदिक औषधे ही ‘औषधे’ आहेत, आहारीय द्रव्ये नाहीत. त्यामुळे त्यांचा वापर ठरावीक मात्रेत, ठरावीक काळापुरते निश्चित केलेल्या अनुपानाबरोबर व सर्वात महत्त्वाचे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा. ’Over-the-counter' (OTC) सारखे स्वत:हून/दुकानदाराने सांगितले म्हणून, शेजारचे घेत आहेत व गुण आला म्हणून आयुर्वेदिक औषधे घेऊ नयेत.
 
 
आयुर्वेदिक औषधाची मात्रा ही वयसापेक्ष बदलते. म्हणजेच तारुण्यावस्थेतील मात्रा लहान मुलांमध्ये देता येत नाही. रोग जर चिरकालीन असला, तरीदेखील औषधाची मात्रा बदलते. औषध कुठल्या वेळेस घ्यावे, याचेही नियम शास्त्रात दिले आहेत. उदा. झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर, वारंवार, जेवणापूर्वी-जेवणानंतर इ. ज्या काळात औषध घ्यायला सांगितले असते, त्या काळात घेतल्यास त्याचा इष्ट गुण नक्कीच मिळतो. तसेच किती कालावधीसाठी घ्यायला सांगितले आहे, तेवढे घेणे गरजेचे असते. २१ दिवस, ४२ दिवस, १ महिना इ. जे तज्ज्ञ वैद्यांनी सांगितले आहे, त्यानुसारच घ्यावे.
 
 
काही रोग विशिष्ट प्रकृतीमध्ये अधिक प्रमाणात होताना आढळतात, तसेच दमट वातावरण, कोरडे वातावरण यावरही त्या रोगाची तीव्रता व प्रखरता निर्धारित असते. उदा. दमा व अन्य श्वसनाचे त्रास दमट वातावरणात अधिक होतात. चिघळणारे दमट वातावरणात लवकर आटोक्यात येत नाहीत, तर कोरड्या वातावरणात मूळव्याध, भगंदर, बद्धकोष्ठता, रक्तस्राव इत्यादीचे त्रास अधिक बघण्यास मिळतात. एखादी व्यक्ती शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त लग्नानंतर व अन्य कारणाने दमट वातावरणातून कोरड्या वातावरणात स्थलांतरित झाली, तर तिच्या काही आधीच्या तक्रारी कमी होतात व काही वेळेस नवीन लक्षणे, रोग उत्पन्न होतात, याच पद्धतीने उष्ण व थंड वातावरणाचाही विचार करावा.
 
 
औषध घेताना वैद्य विशिष्ट अनुपान सांगतात, म्हणजे औषध कशा बरोबर घ्यायचे - गरम पाण्यातून, दुधाबरोबर, मधातून चाटण करून तुपाबरोबर, गुलकंदातून इ. या अनुपानाचे विशेष महत्त्व आहे. त्याचा अवलंब/पालन केल्यास रोग लक्षण लवकर आटोक्यात येतात. असेच महत्त्व पथ्याचेही आहे. काही विशिष्ट अन्नपदार्थ व विहारात्मक बदल वैद्य प्रत्येक रुग्णाला सांगत असतात. कारण, बहुतांशी वेळेस यानेच तो रोग ओढावलेला असतो किंवा त्याची प्रखरता वाढलेली असते. एका बाजूने औषध खात राहायचे व दुसर्‍या बाजूला पथ्याचे पालन न करता स्वैर वागायचे, याने तो रोग पूर्णतः बरा कधीच होऊ शकत नाही.
 
 
काही औषधे विशिष्ट ऋतूत, विशिष्ट प्रकृतीच्या व्यक्तींना दिल्यास त्याचा अपाय होऊ शकतो. उदा. ‘त्रिभुवन कीर्तीरस’ हे औषध सर्दी-ताप-पडसे असताना उत्तम गुणकारी आहे, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने उन्हाळ्यामध्ये कोरड्या हवामानाच्या क्षेत्रात घेतले, तर याचा अपाय होऊ शकतो. या सगळ्याचा विचार करूनच तज्ज्ञ वैद्य औषध देत असतो, पथ्य सांगत असतो. औषधाची मात्रा, वेळ, अनुपान व कालावधी ठरवत असतो. वैद्यांचे मार्गदर्शन न घेता, त्यात काय झाले, असा विचार करुन औषधोपचार केले तर मग ते अंगाशी येऊ शकते.
 
 
औषधनिर्माण विधीदेखील आयुर्वेदशास्त्रात अ‍ॅलोपॅथीपेक्षा भिन्न आहे. आयुर्वेदात संपूर्ण भाग (पान, मूळ, पंचाग, कांड इ. वापरले जाते. त्यातील केवळ एखादा घटक घेऊन औषध निर्माण केले जात नाही.) त्यामुळे औषध निर्माण प्रक्रियेच्या वेळेस त्याची शुद्धीकरण प्रक्रिया ही आयुर्वेदाने सांगितल्या पद्धतीनेच केली जाते. वनस्पती (स्थावर) जंगम व खनिज या सर्वांचा वापर औषधनिर्मितीमध्ये होतो. प्रत्येक वनस्पतीची जमवाजमव विशिष्ट ऋतूत सांगितली आहे. कुठल्या अवस्थेत (कोवळे वा जून इ.) घ्यावी, कशी निवडावी आणि कुठल्या स्वरुपात वापरावी, तसेच खनिजांबद्दलही सांगितले आहे. विशिष्ट पद्धतीने प्रत्येक खनिजाचे शोधन, जारण, मारण केले जाते, असे केल्यानंतरच ते मनुष्यास औषध स्वरुपात देण्यास योग्य होते. पण, यातील एकही प्रक्रिया नीट केली नाही, तर औषध सेवनास अपायकारक ठरु शकते. यात त्या औषध निर्माण कंपनीचा दोष असतो, शास्त्राचा नाही.
 
 
प्रत्येक औषधाचे (चूर्ण, काढे, वटी, भस्म, आसव-आरिष्ट, घृत, तेल इ.) सर्वांचे विशिष्ट कालांतराने ‘एक्सपायरी डेट’ असते. त्या आधीच ते औषध घ्यावे. ‘एक्सपायरी डेट’नंतरचे औषध घेतल्यास अपेक्षित परिणामांपेक्षा वेगळे परिणाम होऊ शकतात. तसेच प्रत्येक औषध ‘सील’ बंद पिशवीत/डबीत ठेवावे. त्यावर थेट सूर्यप्रकाश येऊ नये. त्याला उष्णता लागेल. अशा ठिकाणी ठेवू नये इ. खबरदारी घेणे गरजेचे आहे.
 
 
औषधोपचार करताना ते तज्ज्ञ वैद्याने सांगितले आहे का? त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते का? याचा विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. विविध प्रसारमाध्यमातून विविध उपाय सुचविले जातात. बेंबीत विविध तेलांचा वापर करा. नाकात लिंबाच्या रसाचे थेंब घाला इ. या गोष्टींचा डोळेझाक करून अवलंब करु नये. आपण त्यातले तज्ज्ञ नाही आणि आपले शरीर म्हणजे प्रयोगशाळा नाही, हे ध्यानात ठेवावे.
 
 
हल्ली अजून एक ‘फॅड’ आहे, ते म्हणजे विविध पाककृतीमध्ये वैविध्यता आणणे. त्यातील एक जे बघण्यात आले ते म्हणजे च्यवनप्राश, कुकीज तसेच च्यवनप्राश फ्रूट सॅलड, जॅम इ. प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे की, आहार आणि औषध हे दोन भिन्न प्रकार आहेत. औषधाच्या मात्रेत आणि स्वरुपात आहार घेऊ नये, तसेच आहाराअंतर्गत औषधाचा वरीलप्रमाणे वापर करू नये, ते फायदेशीर ठरत नाही. बर्‍याच वेळा अपायकारक ठरते.
 
 
हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली काहीही खपविले जाते, खाल्ले जाते. तसे करु नये. शास्त्राधार असल्याशिवाय असे केल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. 'OTC' म्हणून औषधे घेऊ नयेत. गरजेपेक्षा अधिक काळ व मात्रा घेऊ नये व सर्वात महत्त्वाचे, स्वत:च्या मनाने औषधोपचार करून औषधांचा दुष्परिणाम टाळण्यासाठी वरील सर्व बाबींचा विचार होणे गरजेचे आहे.
 
- वैद्य कीर्ती देव

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द. 
अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121