मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत ही नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. तिची ट्विटर बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामवरून आपले विचार लोकांसमोर मांडत असते. अशामध्ये नुकतेच तिने अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाबद्दल एक इंस्टा स्टोरी शेअर केली. यामध्ये तिने हिंदू - मुस्लीम विवाहावर अनेक काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात तिने म्हंटले आहे की, "एखाद्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर महिलेलाच धर्म का बदलावा लागतो?"
आमीर आणि किरण यांच्या घटस्फोटानंतर तिने स्टोरीमध्ये म्हंटले आहे की, "एक काळ असा होता जेव्हा पंजाबमधील कुटुंबांमध्ये एका मुलाला हिंदू तर दुसऱ्या मुलाला शीख धर्माचे पालन करावे लागत होते. तशी परंपराच होती. परंतु अशी परंपरा हिंदू आणि मुस्लीम, मुस्लीम आणि शीख समाजामध्ये नाही. आमिर खान सरांनी घटस्फोट घेतल्याचे मला आश्चर्य वाटले. त्यानंतर असा विचार मनात आला की, हिंदू आणि मुस्लीम आंतरधर्मिय लग्नातून जन्माला आलेली मुले नेहमीच मुस्लीम का होतात?"
पुढे ती म्हणाली आहे की, "महिला हिंदू धर्माचे पालन का करू शकत नाही. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात. ही एक जुनी प्रथा आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मुस्लीम का नाही राहू शकत? एखाद्या मुस्लीम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?" असे विधान तिने केले आहे.